

सोपान हडगळे, शेतीप्रश्नांचे अभ्यासक
अल निनोच्या पार्श्वभूमीवर जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या मागे केवळ नगदी पिके म्हणून न धावता तितकाच नफा मिळवून देणाऱ्या, पण खूप कमी पाणी लागणाऱ्या तूर, ज्वारी, बाजरी, करडई, कोरफड, तीळ, सोयाबीन यांसारख्या पिकांचा विचार करण्याची गरज आहे.
बदललेल्या पर्जन्यचक्राचा विचार करता शेतकऱ्यांनी पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करतानाच कमी पाण्याच्या पिकांकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ या सूत्राचा वापर करून सिंचनपद्धतीत बदल करतानाच कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अल निनोचे चक्र पाहता तूर, कडधान्ये, गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, करडई, मूग, उडीद यांसारखी उत्पादने घेता येतील.
तूर-सोयाबीन
आज शेतकरी या पिकांना प्राधान्य न देण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना चांगला हमीभाव नसणे. वास्तविक, तुरीच्या पिकाचे इतर फायदे अनेक आहेत. एखाद्याने डाळी पिकवल्या तर त्या पिकाच्या मुळाला गाठी तयार असतात. त्यामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीत शोषला जातो. या नायट्रोजनचा फायदा पुढच्या पिकाला होतो. डाळी, सोयाबीन हे प्रथिनांचे नैसर्गिक उत्तम स्रोत आहेत. शहरात एखादी व्यक्ती जिममध्ये जाते तेव्हा प्रथिनांच्या पूरक आहारासाठी ३,००० रुपये मोजते. पण, त्याऐवजी त्याने सोयाबीनचा समावेश आहारात केला, तर त्याला नैसर्गिक प्रथिने मिळून आरोग्याला फायदा होतो. हे लक्षात घेता सरकारने तूरडाळ, सोयाबीन या पिकांकडे प्रथिनांचा पूरक आहार म्हणून पाहिले पाहिजे. तुरीच्या मुळाला सोटमूळ म्हटले जाते. कारण ते जमिनीत खोल जाते. त्यामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये वर येतात. त्यामुळे फेरपालट पीक म्हणून डाळी, सोयाबीन ही पिके घेता येतात. तुरीची डाळ करून विकावी लागते. अशा वेळी डाळ तयार करण्याचे मशिन हे उत्पादनबहुल भागातच उपलब्ध असायला हवे. त्यातून शेतीपूरक रोजगार वाढेल.
करडईचा पर्याय
करडई हे अत्यंत कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून सुप्रसिद्ध आहे. करडईच्या पिकाला काटे असतात. त्यामुळे हरभऱ्यासारख्या पिकाच्या कडेने करडईचे पीक लावल्यास जनावरे आत येण्याचा धोका उरत नाही. करडईचे तेल आरोग्यासाठी अत्यंत हितकारक असते. त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्याची विक्री आणि व्यवस्थापन योग्य केले तर देशभरातून नव्हे तर जगभरातून मागणी येईल. त्यासाठी धोरणात्मक योजना हव्यात. करडईच्या पिकातून तेल काढल्यानंतर उरलेला कडबा हा दुधाळ जनावरांसाठी उत्तम पेंढ ठरतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करडईचे पीक ज्वारीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते. पण, आंतरपीक म्हणून घेतलेल्या करडईवर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही. त्यामुळे उत्पादनात घट येते. तेव्हा करडईची लागवड करताना शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक आहे.
दुर्लक्षित तिळाचे पीक
याखेरीज तीळ हे अत्यंत कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यासाठी बी कमी लागते. तसेच जनावरे हे पीक खात नसल्यामुळे तो धोकाही उरत नाही. तीळ हे तेलबियाचे पीक आहे. परदेशात पावाला लावण्यासाठी तिळाची खूप मागणी आहे. असे असूनही त्याची निर्यात करून परकीय चलन मिळवण्याबाबत आपण खूप मागे आहोत. तिळाच्या अनेक जाती आहेत. पूर्वीच्या काळी बोंड फुटणाऱ्या जाती होत्या. त्यामुळे शेतकरी ते पीक घेत नव्हते. पण, आधुनिक संशोधनातून तिळाचे पीक कोरडवाहू शेतात घेतले, तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. अशाच प्रकारे ओवा, बडिशेप या पिकांचीही पालटून लागवड केली तर तीही कमी पाणी लागणारी आणि जास्त पैसे देणारी पिके आहेत.
ज्वारीची सुगी
ज्वारी हे दुष्काळी भागातील पीक म्हणून ओळखले जाते. पूर्वी मालदांडी नावाची एक जात प्रसिद्ध होती. बदलत्या काळात हायब्रीडायजेशन किंवा संकरीकरण झाले; पण जुन्या जाती या अत्यंत कमी पाणी लागणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर त्या सकसतेबाबतही सरस आहेत. तथापि, जुन्या जातींमधून मिळणारे उत्पन्न कमी असते. संकरीत जातींमधून मिळणारे उत्पन्न अधिक असते. ज्वारीची काढणी आणि कापणी केल्यानंतर शेताला पाणी दिले की ज्वारीचा नवा फुटवा येतो. त्यामुळे एकदा पेरा करून ज्वारीची दोन पिके घेता येतात. फास्टफूडच्या जमान्यातही ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व कायम आहे. पंचतारांकित हॉटेल्समध्येही भाकरीला मागणी वाढत आहे. कारण भाकरीचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व लोकांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच शहरी भागातही ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशातही ज्वारीला वाढती मागणी आहे. कृषी पर्यटनात आहारात आवर्जून ज्वारीच्या भाकरीची मागणी होते. विविध प्रदर्शने, जत्रा, मेळावे येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर ज्वारीच्या भाकरीची मागणी मोठी असते. अनेक बचतगटांच्या तसेच अन्य व्यावसायिकांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण केली जाते. एकंदर ज्वारीची बाजारपेठ व्यापक असून, तिचे अर्थकारणही मोठे आहे.
फळबाग लागवड
याखेरीज फळबागांचा पर्यायही फायदेशीर आहे. भारतात आणि जगभरातच फळांची मागणी वाढत आहे आणि फळांना चांगली किंमतही मिळत आहे. दुष्काळाचा सततचा फटका न बसणाऱ्या फलोद्यानाकडे शेतकरी वळले तर त्यांना चांगले पैसे मिळू शकतात. द्राक्ष, बोर, डाळिंब अशी पिके चांगले उत्पन्न देणारी ठरू शकतात. हिमाचल प्रदेशात पूर्वी केवळ मक्याची शेती केली जात असे. परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या बागा लावायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता वाया जाणाऱ्या सफरचंदाचा रस काढून तो विकण्याचा व्यवसाय सुरू केला. एका उपक्रमामुळे हिमाचल प्रदेश हे राज्य देशातील विविध राज्यांच्या यादीमध्ये पंजाबच्या खालोखाल स्थान मिळवून बसले आहे. हा फलोद्यान क्रांतीचाच प्रताप आहे. हीच गोष्ट कर्नाटक सरकारने कॉफीबाबत केली. तेव्हा तिथल्याही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे दिसून आले.
कमी पाण्यावर येणारे डाळिंब चांगले उत्पन्न मिळवून देणारे फळ आहे. कमी पाण्यात येणारे हे फळ सध्या सोलापूर, पुणे, सांगली, नगर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. कोणत्याही जमिनीत डाळिंबाचे पीक घेता येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडली तर या फळाचे मोठे उत्पादन होऊ शकते. अगदी मुरमाड, माळरान, डोंगर उताराच्या जमिनीतही हे फळ येऊ शकते. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न झाल्यास या फळावर रोग पडू शकतात. कोरडे आणि थंड हवामान या फळाच्या वाढीस उपयुक्त ठरते. फूल लागल्यानंतर फळ तयार होईपर्यंतच्या काळात कडक ऊन आणि कोरडे हवामान असल्यास या फळांची चव न्यारी लागते.
औषधी कोरफड
पाणीटंचाईच्या काळात कोरफडीसारखे पीक शेतकऱ्यांसाठी सशक्त आणि प्रभावी पर्याय ठरू शकते. आपण फारशी गुंतवणूक न करता अन्य नगदी पिकांएवढेच उत्पन्न कोरफडीमधून मिळवू शकतो. कोरफडीचा सर्वांत मोठा गुणधर्म म्हणजे ती कोठेही सहज उगवून येते. कोरफडीचे औषधी उपयोग अलीकडच्या काळात सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आहेत. सौंदर्यप्रसाधने आणि औषधांच्या बाजारात ॲलोव्हेराला महत्त्व आहे. बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलण्याची मोठी गरज आज निर्माण झालेली असताना कोरफडीच्या पर्यायाचा शेतकऱ्यांनी आवर्जून विचार करायला हवा. अर्थातच शासनानेही या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.