

आजची मुले डिजिटल नेटिव्हस आहेत. म्हणजेच, त्यांचा जन्म अशा जगात झाला आहे, जिथे स्मार्ट फोन, टॅबलेट आणि इंटरनेट हा दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी मुले मैदानी खेळात आणि मित्रांसोबत वेळ घालवत असत. आज मात्र ती मोबाईलवर गेम खेळण्यात, व्हिडीओ पाहण्यात आणि सोशल मीडियावर गुंतलेली असतात.
तंत्रज्ञानाने शिक्षण आणि मनोरंजनाचे अनेक नवीन दरवाजे उघडले असले, तरी त्याचा अनियंत्रित आणि अतीव वापर मुलांच्या मानसिक आरोग्यावर घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, लहान वयात मोबाईल व इंटरनेटचा वापर मुलांच्या मेंदूच्या विकासावर, भावनात्मक समतोलावर आणि सामाजिक कौशल्यांवर विपरीत परिणाम करतो. मुलांचा मेंदू संवेदनशील टप्प्यात विकसित होत असतो. अशावेळी स्क्रीनचा अतिवापर त्यांच्या ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’वर परिणाम करतो.
मेंदूचा हा भाग भावना नियंत्रित करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करतो. मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियावरील वेगाने बदलणारी द़ृश्ये आणि तत्काळ मिळणारे बक्षीस किंवा गेममधील विजय किंवा ‘लाईक्स’ मुलांच्या मेंदूमधील डोपामिनच्या स्तरात वाढ करतात. परिणामी, ती मुले नेहमीच तत्काळ समाधानाची अपेक्षा ठेवतात. साहजिकच प्रत्यक्ष आयुष्यात तसे होत नाही, तेव्हा ती निराश, चिडचिडी आणि संतापी बनतात.
इंटरनेटवरील अनेक गेम्स आणि व्हिडीओंमध्ये हिंसा, आक्रमकता आणि असभ्य वर्तन दाखवले जाते. मुलांचा मेंदू अद्याप परिपक्व झालेला नसल्यामुळे ते अशा हिंसक वर्तनाला सामान्य मानू लागतात. अनेक लोकप्रिय मोबाईल गेम्समध्ये युद्ध, मारामारी आणि विध्वंसाचे द़ृश्य सर्रासपणे असते, जे मुलांमधील आक्रमक प्रवृत्तीला खतपाणी घालते. मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिरेकामुळे मुले प्रत्यक्ष नात्यांपासून म्हणजेच मित्र, पालक, शिक्षकापासून दूर जाऊ लागतात. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात; पण खर्या सामाजिक संबंधांतून मागे पडतात. यामुळे एकटेपणा आणि भावनिक पोकळी निर्माण होते.
तीच पुढे राग आणि आक्रमकतेच्या रूपात प्रकट होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याने निळ्या प्रकाशाचा परिणाम मुलांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते. अपुरी झोप चिडचिड, तणाव आणि राग वाढवते. एका संशोधनानुसार, जी मुले रात्री जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात, त्यांच्यात भावनिक अस्थिरता आणि आक्रमक वर्तनाची शक्यता जास्त असते. सोशल मीडियामुळे मुलांमध्ये सतत इतरांशी तुलना करण्याची सवय निर्माण होते. दुसर्यांचे ‘परफेक्ट’ आयुष्य, चेहरा किंवा यश पाहून ती स्वतःला कमी लेखतात. यामुळे आत्मविश्वासात घट होते आणि असमाधान वाढीस लागते. याचे रूपांतर पुढे राग किंवा असंतोषाच्या रूपात बाहेर पडते.
लहान वयात मोबाईल व इंटरनेटचा अतिरेक केवळ राग आणि आक्रमकतेपुरता मर्यादित राहत नाही. याचे दीर्घकालीन परिणामही अधिक गंभीर आहेत. मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे. सर्जनशीलता प्रभावित होत आहे आणि भावनिक स्थैर्य डगमगत आहे. याशिवाय, सातत्याने स्क्रीन वापरण्यामुळे लठ्ठपणा, डोळ्यांचे त्रास आणि चुकीच्या स्थितीत बसण्याच्या सवयी यासारखे शारीरिक त्रासही होत आहेत.
ही समस्या हाताळण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी रोज 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाईम टाळावा. मोठ्या मुलांसाठीही वयोमानानुसार मर्यादा ठेवावी. मुलांना मैदानी खेळ, संगीत, चित्रकला, वाचन यांसारख्या सर्जनशील आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी करून घ्यावे. पालकांनी मुलांसोबत रोज काही वेळ एकत्र घालवावा. एकत्र जेवण, गोष्टी सांगणे किंवा फेरफटका मारणे यामुळे भावनिक जवळीकता वाढते.