Mayor Challenges |महापौरांसमोरील आव्हाने

Mayor Challenges
Mayor Challenges |महापौरांसमोरील आव्हाने(Pudhari File Photo)
Published on
Updated on

तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले. प्रशासकराज येण्यापूर्वी भाजपची 13 महापालिकांमध्ये थेट सत्ता होती किंवा युती करून ते सत्तेत होते; तर काँग्रेसची पाच महापालिकांमध्ये सत्ता होती. काही ठिकाणी काँग्रेसने आघाडी केली होती. आता राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखत भाजपने क्रमांक एकचे यश मिळवले. भाजपचा स्ट्राईक रेट 64% असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 26% आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 12% इतका स्ट्राईक रेट आहे. बहुसंख्य महापालिकांत भाजप अथवा महायुतीची सत्ता आली असून, मुंबई महापालिकेत 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तुलनेत कमी यश मिळाले.

नगरपालिका, महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व स्तरांवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. देशातील मतदार आणि विशेषतः जेन-झी हे भाजपच्या विकासाच्या मॉडेलवर किती विश्वास करतात हे यातून स्पष्ट होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल सार्थ आनंद व्यक्त केला. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात भाजपला यश मिळाले. या विजयानंतर मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंवर चुकीच्या भाषेत टीका करणारा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर, कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद जरूर साजरा करावा; परंतु उन्माद करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विजयानंतर आम्ही कुठेही अतिआत्मविश्वासात जाणार नाही. कुठेही गर्वात जाणार नाही. ही जनतेने आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे आणि ती योग्य प्रकारे आम्हाला निभवायची आहे.

पुढच्या काळातही पारदर्शक कारभार सांभाळण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, सत्ताधारी पक्षांच्या काही नेत्यांनी अत्यंत उन्मादी आणि अविवेकी वक्तव्ये केली असून, त्यांना आवर घालणे आवश्यक आहे. ठाकरे शिवसेनेच्या पराभवानंतर आक्षेपार्ह स्वरूपाचे फलक लावण्याचे प्रयत्न झाले, त्याबद्दलही फडणवीस यांनी तत्काळ नापसंती व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षांनाही स्थान असले पाहिजे आणि विरोधकांचाही सन्मान करण्याची संस्कृती आहे. त्यास बट्टा लागता कामा नये, याचे भान सर्वच पक्षांनी बाळगले पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65, मनसेचे 6 नगरसेवक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षीयांची संख्या उपेक्षा करण्यासारखी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शिंदे यांच्या शिवसेनेस मुंबईत 29 ठिकाणी यश मिळाले असून, त्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे.

आपल्या नगरसेवकांची पळवापळवी होईल, अशी त्यांना भीती वाटत असावी, हे यावरून स्पष्ट होते. भाजपला बहुमतासाठी शिंदे यांची आवश्यकता असून, विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणार्‍यांना बरोबर घेऊन जाण्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आता पळवापळवी वगैरे काहीही नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत लवकरात लवकर महापौर निवडला जावा, अशी अपेक्षा आहे. सध्या सुरू असलेले प्रकल्प दोन-तीन वर्षांत पूर्ण करून नवीन प्रकल्प हाती घेतले जातील. मुंबई हे जगातील उत्तम शहर म्हणून गणले जाईल, असा लौकिक मिळवून, मुंबई हे लिव्हेबल आणि लव्हेबल शहर केले जाईल, हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन दिलासादायक आहे. 29 पैकी 23 महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर संख्याबळानुसार निवडून येऊ शकतात. सहा महानगरपालिकांमध्ये विरोधकांना सत्तेची शक्यता दिसत असली, तरी त्यापैकी दोन महापालिकांमध्ये घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंद्रपूरमध्ये 66 सदस्यीय पालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 27, तर भाजपचे 23 सदस्य निवडून आले आहेत. महापौरपदासाठी 34 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथे फोडाफोडीचे प्रकार होऊ शकतात.

90 सदस्यीय भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत सर्वाधिक 30 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले आहेत; तर भाजपचे 22 आणि शिंदे गटाचे 12 सदस्य विजयी झाले आहेत. याअगोदर काँग्रेसचे सर्वाधिक 40 नगरसेवक निवडून येऊनही, पक्षात फूट पडून अपक्ष महापौर झाला होता. यावेळीही तेथे असे काहीही घडू शकते! पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांना तेथे तडाखा बसला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाशी जुळवून घेऊनदेखील पक्षाचा बोर्‍या वाजला. सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी येथे कुठेही त्यांची ताकद दिसली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार यांचा प्रभाव आता ओसरत चालला आहे, याचीच ही खूण आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 34 जागांवर पक्षाने यश मिळवले असले, तरी सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, तरीदेखील पाटील यांनी कडवी झुंज दिली, हे नाकारता येणार नाही.

चंद्रपूर, लातूर अशा ठिकाणी जेथे जेथे स्थानिक नेत्यांनी कष्ट घेतले, तेथे काँग्रेसला यश मिळाले आहे. मुंबईतही काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी त्यांचे 31 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे कोणताही करिष्मा नसला, तरीदेखील संघटना विस्तारासाठी ते धडपडत असून, याची दखल घेतली पाहिजे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील शहरीकरणाचे प्रमाण 45 टक्के असून, 2030 पर्यंत ते 58 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे; मात्र पक्ष कोणताही असो, सर्व महानगरपालिका भ—ष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. बहुतेक शहरांचे बकालीकरण झाले असून, ठेकेदारशाहीमुळे शहरांची दैना झाली आहे. महापालिकांचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असून, जबाबदार्‍या मात्र वाढलेल्या आहेत. अशावेळी पालिकांमधील नवीन सत्ताधार्‍यांवरील जबाबदारी मोठी आहे. शहरांचा चेहरा बदलत्या काळाला साजेसा बनवण्याचे आव्हान नवीन महापौरांसमोर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news