

पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा स्पष्ट आरोप करत, केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली आहे. आता भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील एकूण कर्मचार्यांची संख्या 55 वरून 30 वर आणली जाणार आहे. अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाक नागरिकांना तत्काळ माघारी जाण्यास फर्मावले आहे. सिंधू जलकरार स्थगित केल्याची अधिकृत माहितीही भारताकडून पाकला देण्यात आली आहे.
पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी करण्याचा निर्धार भारताने केला असून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह-अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून, पहलगाम घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि या संकटात आम्ही भारतामागे उभे आहोत, असे सांगितले आहे. जगातील कोणत्याही प्रतिष्ठित देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही आणि चीननेही आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचा विरोधच करतो, असे म्हटले आहे.
यापूर्वी रशियाने पाकिस्तानसोबतच्या युद्धात सातत्याने भारताला पाठिंबा दिला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत संबंधही मजबूत आहेत. कारगिल युद्धाच्या वेळी इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. गेल्या काही वर्षांत पाकने अमेरिकेशी मैत्री करण्याची धडपड केली; पण ती फोल ठरली. उलट अमेरिकेच्या द़ृष्टीने भारत ही मोठी बाजारपेठ असून, येथे त्या देशाची प्रचंड गुंतवणूक आहे. त्यामुळे संघर्षाच्या वेळी अमेरिका भारताच्या मदतीला येऊ शकते. देशाच्या शत्रूंनी केवळ नि:शस्त्र पर्यटकांवरच नव्हे, तर देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे दुःसाहस केले आहे.
दहशतवादी कारवायांनी देशाचे मनोधैर्य खच्ची होणार नाही, उलट हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल. त्यांची उरलीसुरली ताकदही संपवण्याची वेळ जवळ आली आहे, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सरकारकडून यासंदर्भात होणार्या कोणत्याही संभाव्य कारवाईला सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. ज्या घटनेत 28 निरपराध नागरिकांचे हकनाक बळी गेले, त्याबाबत कोते राजकारण करणे चुकीचेच ठरले असते.
केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. त्यावेळी गुप्तचर संस्थेच्या अधिकार्यांनी घटनेची तपशीलवार माहिती दिल्यानंतर, विरोधी सदस्यांनी काही प्रश्न विचारले व शंका उपस्थित केल्या. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर उत्तरे दिली. निकोप वातावरणात चर्चा झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जबाबदारीचे वर्तन केल्याबद्दल विरोधी पक्षांचेही अभिनंदन करावे लागेल. अमरनाथ यात्रेवेळी पर्यटक बैसरनला जातात. त्यामुळे तेथे जूनपासून सुरक्षा व्यवस्था तैनात असते; पण यावेळी एप्रिलपासूनच पर्यटक तेथे जाऊ लागले होते.
हजारो पर्यटक जात असताना, याची माहिती ना पोलिसांना होती, ना सैन्यदलांना. केंद्रीय राखीव पोलिस दलही बेदखल होते. गुप्तचर संस्थांनाही याची वार्ता नव्हती, याकडे ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी लक्ष वेधले आहे. काश्मीर खोर्यात त्रिस्तरीय सुरक्षा व्यस्था असताना, जेथे हजारो लोक जातात, त्याबाबत पोलिसांना कोणतीही माहितीच नसावी, हे कसे? असा रास्त सवाल राहुल गांधींनी विचारला. सुरक्षा व्यवस्थेकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची चूक झाली, हे गृहमंत्री शहा यांनी मान्य केले, हे बरेच झाले. चुका मान्य करण्यात काहीच कमीपणा नाही; पण सुरक्षा यंत्रणेतील फटी तातडीने बुजवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मुख्य म्हणजे, सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज आहे.
भारतावर या प्रकारचा हल्ला केला जात असतानाच, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारनेही पहलगाम घटनेचा निषेध करण्याचा नाटकीपणा केला. सिंधू जलकरारातील पाकच्या हक्काचे पाणी थांबवणे ही युद्धकृती असून, आम्हीही सिमला करार रद्द करत आहोत. तसेच, पाकची हवाई हद्द भारतीय विमानांना बंद करत असल्याचे पंतप्रधान शरीफ यांनी जाहीर केले. त्याने भारताचे फारसे काही वाकडे होणार नाही. भारताने पाकिस्तानसोबतचा जो काही व्यापार होता, तोही बंद केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधून येणार्या मालावर 200 टक्के शुल्क लागू केल्यामुळे पाकचे कंबरडे मोडले होते.
आताही सिंधूचे पाणी बंद झाल्यानंतर, पाकिस्तानच्या शेतीची वाताहत होणार आहे. भारताच्या एकूण व्यापारात पाकचा वाटा अर्ध्या टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे पाकिस्तान आपल्या द़ृष्टीने नाममात्र आहे. गेल्या काही वर्षांत भारताचा जागतिक राजकारणावरील प्रभाव वाढला असून, त्या तुलनेत हा देश कोणाच्या खिजगणतीतही नाही. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये अशांतता आहे. सत्तेमधील पंजाबी वर्चस्वाविरुद्ध सिंध प्रांतात नाराजी आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान संबंध विकोपाला गेले आहेत. पाकव्याप्त काश्मीरची तेथील सरकार उपेक्षा करत असल्यामुळे तेथे अस्वस्थता आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी सातत्याने त्या देशातच बॉम्बहल्ले करत असतात. 2019 मध्ये भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला, तेव्हा मिग-21 विमान पाकच्या हवाईदलाने पाडले आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले. अभिनंदन यांची सुटका न केल्यास, पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागण्यात येतील, असा दम भारताने देताच, त्यांची सुटका करण्यात आली. रशियाने युक्रेनवर आणि इस्रायलने गाझात आक्रमण केले, तरीही निषेधाचा स्वर काढण्यापलीकडे आंतरराष्ट्रीय संस्थांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे उद्या भारताने चढाई करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला, तरी त्यास चीन वगळता कोणी आक्षेप घेईल, असे वाटत नाही. पहलगाम हल्ल्याचा निषेध करत जगातील प्रमुख देशांनी भारताकडे नोंदवलेली सहानुभूतीही येथे महत्त्वाची आहे. तेव्हा आपली घटिका भरत आली आहे, हे पाकिस्तानने लक्षात घेतलेले बरे!