

संघर्ष हा चांगला शब्द आहे. मानवाचा संघर्षाचा इतिहास राहिला आहे. आपलेच बघा. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपण ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला. मराठवाडा भागातील लोकांनी निजामाशी संघर्ष करून स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघर्ष थांबेल, असे वाटले होते; परंतु तसे झाले नाही. सध्या राज्यात सर्वत्र मानव आणि बिबट्या यांचा संघर्ष सुरू आहे. बिबट्यांची संख्या अतोनात वाढल्यामुळे ते राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठेतरी माणसावर हल्ले करत आहेत. चंद्रपूर, गडचिरोली भागात माणूस आणि वाघ यांचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आता माकड आणि मानव यांच्या संघर्षाला नव्याने सुरुवात झाली आहे.
माकड हा मुळातच टीवल्याबावल्या करून उपद्रव करणारा प्राणी आहे. काहीही न करता माकडचाळे करीत आयुष्य व्यतीत करणे हे माकडांचे एकमेव ध्येय असते. कोकणासह राज्याच्या विविध भागांत माकडांनी आणि वानरांनी उच्छाद मांडला आहे. या माकडांचे करायचे काय, हा एक मोठाच प्रश्न आता आपल्यासमोर उभा राहिला आहे. वन विभागाने माकडे पकडण्यासाठी टीम तयार केल्या आहेत. या टीम पुरेशा ठरणार नाहीत म्हणून आता प्रशिक्षित लोकांना माकड पकडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. नागरी भागात धुमाकूळ घालणार्या माकडांना पकडणे आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडणे अशी योजना आहे.
तसा विचार करायला गेल्यास बर्याच काम नसलेल्या युवकांना हा एक नवीन रोजगार सुद्धा होऊ शकतो. तुम्ही म्हणाल हे कसे काय होईल? दहा उपद्रवी माकडे पकडणार्या व्यक्तीला प्रत्येक माकडामागे सहाशे रुपये मिळणार आहेत. युवकांनी टीम तयार करून दररोज पाच माकडे पकडण्याचे ठरवले, तर दिवसाला तीन हजार रुपये कमाई होऊ शकते.
शासकीय योजना आली की, त्याला निकष असतातच. प्रत्येक माकड पकडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. त्याशिवाय पकडलेल्या प्रत्येक माकडाचे किंवा वानराचे छायाचित्र काढावे लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, व्हिडीओ रेकॉर्डिंग कशासाठी करायचे? एकच माकड पकडून त्याला जंगलात न सोडता दुसर्या दिवशी पुन्हा तेच माकड पकडले, असे दाखवणार्या मानवी टोळ्या काही कमी नाहीत. माणसांची ही बदमाशी थांबवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंगची सक्ती केलेली आहे. ही योजना कितपत सफल होईल, ते माहीत नाही; परंतु माकड-मानव संघर्षाने निसर्ग आणि मानव यांचा संघर्ष अधिक टोकदार केला आहे, हे निश्चित!