Cancer and Society: कर्करोग आणि आपण

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 2 कोटी (20 दशलक्ष) नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होत आहे
Cancer and Society
Cancer and SocietyPudhari
Published on
Updated on
प्रसाद पाटील

वैद्यकीय प्रगती असूनही कर्करोगाचे वाढते प्रमाण ही गंभीर जागतिक चिंता ठरत आहे. आज जागतिक कर्करोग दिन, त्यानिमित्त...

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 2 कोटी (20 दशलक्ष) नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होत आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या 2026 च्या अहवालानुसार, अमेरिकेत यावर्षी 21,14,850 नवीन रुग्ण आढळण्याचा आणि 6,26,140 मृत्यू होण्याचा अंदाज आहे. कर्करोगावर हमखास इलाज नाही. तो नेमका कसा होतो आणि नेमका कशाने होतो, याचा पूर्ण उलगडा अद्यापही वैद्यकशास्त्राला झालेला नाही. तंबाखू आणि धूमपानाने तो होतो, हे माहीत आहे. त्याच्या इतरही काही कारणांची कल्पना आहे; पण तो होण्याची नेमकी प्रक्रिया काय, याचा उलगडा झालेला नाही.

पूर्वी कॅन्सर हा विकार अपवादात्मक होता. लोक कॅन्सरला फार घाबरतही असत. आता तेवढी भीती राहिलेली नाही. त्यावर काही मर्यादेपर्यंत इलाज उपलब्ध झाला आहे; पण दुर्दैवाची बाब अशी की, कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोणाला रक्ताचा कर्करोग असतो, तर कोणाला आतड्याचा. महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर हे तीन प्रकार सर्वाधिक आढळतात.

सद्यस्थितीत भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या एकूण कॅन्सर प्रकरणांपैकी सुमारे 27 ते 30 टक्के वाटा एकट्या स्तनांच्या कॅन्सरचा आहे. शहरी भागात याचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे. भारतातील स्तनांच्या कॅन्सरचा मृत्यू दर जगाच्या तुलनेत अधिक आहे. कारण, बहुतांश प्रकरणांमध्ये निदान उशिरा म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. आयसीएमआर आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये देशात सुमारे 15 लाख नवीन कर्करोग रुग्णांची नोंद झाली होती, जी 2025 अखेरपर्यंत 17 लाखांवर पोहोचली असल्याचा अंदाज आहे. विशेषतः तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कॅन्सरने मरणाऱ्यांपैकी 43 टक्के रुग्ण हे तंबाखू खाण्याने कर्करोग होऊन मरत असतात. जगातच तंबाखूच्या वापराबाबत वारंवार इशारे दिले जात असतात. लोकांना त्यातला धोका कळावा म्हणून तंबाखू दिन साजरा करून त्या दिवशी लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात असतात; पण तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न मात्र कोणीही करीत नाही. वास्तविक, बदलत्या जीवनशैलीने कर्करोग वाढत आहे असे केवळ म्हणून चालणार नाही, तर या जीवनशैलीतल्या कोणत्या गोष्टी अनुचित आहेत, याची अचूक माहिती दिली गेली पाहिजे. नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्या अनेक पातळ्यांवर बदल करावे लागणार आहेत. सध्या जगात जास्तीत जास्त धान्य पिकवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेतून शेतावर रासायनिक खतांचा मारा केला जात आहे. पिकांवर रोग पडले की, एकापेक्षा एक विषारी जंतुनाशके मारली जाताहेत; पण त्यांचे अंश पिकांत उतरतात आणि खाण्यातून शरीरात जातात. कर्करोग होण्याचे हेही एक कारण आहे. पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण फार मोठे आहे. त्याची कारणे शोधली असता पिकांवर मारली जाणारी कीटकनाशके त्याला कारणीभूत असल्याचे आढळले; पण याबाबत म्हणावी तेवढी जागृती केली जात नाही.

आपण काय काळजी घ्यायची, हे महत्त्वाचे आहे. याबाबत सर्वांत पहिली आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे तपासणीस उशीर न करणे. पहिल्या टप्प्यात लक्ष दिले, तर कर्करोगाची लागण झालेला रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे वजन अचानक कमी होणे, शरीरावर गाठ येणे किंवा दीर्घकाळ बरा न होणारी जखम यांसारख्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. सजगता, प्रभावी उपचार आणि काटेकोर पथ्यपालन यांमुळे कर्करोगाला थोपवता येते. येणाऱ्या काळात कर्करोगावर प्रभावी लस विकसित करण्यासंदर्भात आधुनिक वैद्यकशास्त्राला यश आल्यास तो लाखो रुग्णांसाठी दिलासा ठरेल. रशियाने अशी लस विकसित केल्याचा दावा केला असला, तरी जागतिक आरोग्यतज्ज्ञांची याबाबत मतमतांतरे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news