Calendar: दिनदर्शिका

Calendar: दिनदर्शिका
Calendar: दिनदर्शिकाPudhari
Published on
Updated on

नवीन वर्षाची चाहूल लागली की, पहिल्यांदा वेध लागतात ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे म्हणजेच कॅलेंडरचे. काही कॅलेंडरचे बँड तर दोन महिने आधीपासूनच जाहिराती करायला सुरुवात करतात. कॅलेंडरचा उद्देश दिवस, तारीख समजणे हा असला, तरी लोकांना संकष्टी चतुर्थी, एकादशी, शुभ दिवस, अमावस्या यांची पण माहिती पाहिजे असते. महानगरातील आणि विशेषत: महापालिका परिसरात राहणाऱ्या लोकांना आता कॅलेंडरची चिंता राहिलेली नाही. घरोघरी कॅलेंडर वाटपाची झुंबड उडालेली आहे.

ज्यांचे पक्षाचे तिकीट निश्चित झाले आहे, त्या भावी नगरसेवकांनी आधीच तुमच्या घरामधील कॅलेंडरची जागा पटकवण्यास सुरुवात केलेली आहे. महिन्याच्या प्रत्येक पानावर एव्हानापर्यंत सदरील उमेदवाराने केलेली कामे यांचे फोटो लावलेले असतात. या उमेदवारांनी कुठून कुठपर्यंत रस्ता केला, कोणते नाले बांधले, नळाचे कनेक्शन कसे आणले याचा आवर्जून उल्लेख केलेला असतो. याशिवाय या उमेदवाराच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे फोटोपण असतात.

साहेबांचा वाढदिवस कधी असतो, ते ठळक अक्षरांमध्ये त्या महिन्यात त्या तारखेला लिहिलेले असते. तिथे सोबत फोटो असतो. शिवाय आमचे प्रेरणास्थान, आमचे आधारस्तंभ, कार्यसमाट आमदार यांचे फोटो असतात. या सगळ्यांचा उद्देश कॅलेंडरच्या माध्यमातून थेट तुमच्या घरामध्ये आणि जमल्यास मनामध्ये जागा पटकावणे हा असतो.

निवडणुका जवळ आल्यामुळे येते पंधरा-वीस दिवस तरी उमेदवाराची छबी तुमच्या घरात झळकत राहील आणि त्याच्या कामाकडे तुम्ही रोज पाहत राहिला, तर त्याला मतदान करण्याचा तुम्हाला मोह होईल, ही इच्छा असते. सध्या उमेदवार आणि कार्यकर्ते जथ्थ्याने तुमच्या घरी येऊन तुम्हाला कॅलेंडर देऊन आम्हालाच मतदान करा, असा आग््राह करतील.

अपक्ष किंवा बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे कॅलेंडर पण तुमच्या घरी येत असतात; परंतु त्यावर पक्षाचे चिन्ह नसते. कारण, त्यांना कोण्या पक्षाने उमेदवारी दिलेली नसते. असे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले, तर कपबशी, क्रिकेटची बॅट, टीव्ही, पंख इत्यादी चिन्ह असते. तूर्त आपले नाव तुमच्यापर्यंत पोहोचावे एवढाच त्यांचा उद्देश असतो. बाकी एकदाचे चिन्ह मिळाले की, ते तुमच्या घरी येणारच असतात.

तूर्त मिळेल ते कॅलेंडर घेऊन ठेवा आणि ते घरात अडकून ठेवा एवढाच आमचा तुम्हाला सल्ला आहे. कोणी उमेदवार निवडून आला किंवा नाही आला, तरी तुम्हाला फरक पडत नाही. किमान तारीख, वार पाहण्यासाठी कॅलेंडर घरामध्ये असेल आणि ते तरी आपल्याला मिळाले, यावर खूश व्हायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news