समांथा हार्वे : पृथ्वी वाचविण्याची धडपड

समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ कादंबरीसाठी बुकर सन्मान जाहीर
British author Samantha Harvey wins Booker prize for Orbital
ब्रिटिश लेखिका समांथा हार्वेPudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. कृष्णकुमार रतू

दरवर्षी जाहीर होणार्‍या बुकर पुरस्कारांकडे संपूर्ण साहित्यविश्वाचे लक्ष लागून असते. यंदाच्या वर्षी ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ कादंबरीसाठी बुकर सन्मान जाहीर झाला आहे. ‘ऑर्बिटल’ ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी ठरली आहे. विशेष म्हणजे या वर्षी बुकर सन्मान नामांकनात सर्वाधिक पाच महिला लेखिका शर्यतीत होत्या आणि त्यात समांथा यांनी आघाडी घेतली. वेगळ्या धाटणीच्या लेखनासाठी आणि शैलीसाठी हार्वे यांना निवडण्यात आले.

बहुचर्चित ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांचे नाव निवडक इंग्रजी कादंबरीकारांत घेतले जाते आणि त्यांचे लेखन निसर्गाकडे नेणारे असून, ते जीवनातील अनुभव तसेच त्यातून मिळणारे अलौकिक सुख आणि दु:खाची संकल्पना अधोरेखित करते. त्यांनी लेखनशैलीच्या जोरावर इंग्रजी साहित्यकारांत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. यंदा त्यांच्या ‘ऑर्बिटल’ कादंबरीसाठी बुकर सन्मान जाहीर झाला आहे. समांथा यांचा जन्म 1975 मध्ये केंट, ब्रिटनमध्ये झाला. त्यांनी आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे वडिलांसमवेत व्यतीत केली. वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांची आई आयर्लंडला निघून गेली आणि समांथा यांनी किशोरवयीन जीवन यॉर्क, शेफील्ड आणि जपान येथे घालविले. या काळात येणार्‍या अनुभवांनी त्यांना आयुष्याकडे पाहण्याची वेगळी द़ृष्टी मिळाली आणि त्यातून अनोख्या लेखनशैलीचा उगम झाला.

कालांतराने त्यांचा इंग्रजी साहित्यातील नामवंत कादंबरीकार म्हणून लौकिक झाला. समांथा यांनी यॉर्क विद्यापीठ आणि शेफील्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी 2005 मध्ये बाथ स्पा विद्यापीठातून क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये एम.ए. पूर्ण केले व वैशिष्ट्यपूर्ण लेखनात पीएच.डी.ही केली. त्यांची पहिली कादंबरी ‘द वायल्डरनेस’ (2009) अल्झामयरग्रस्त व्यक्तीच्या द़ृष्टिकोनावर आधारित आहे. या आजारावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. दुसरी कादंबरी ‘ऑल इज साँग्ज’ (2012) नैतिकता, संततीचे कर्तव्य व त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करत असतानाच अनुरूप पर्याय सांगणारीही आहे. तिसरी कादंबरी ‘डियर थिफ’ ही एका महिलेचे प्रत्यक्षात हजर नसलेल्या मित्राच्या नावाने लिहिलेले दीर्घ पत्र आहे. यात प्रेमाच्या त्रिकोणात असलेल्या भावनात्मक परिणामाचे विवरण केलेले आहे. ही कादंबरी लियोनोर्ड कोहेन यांचे गीत ‘फेमस ब्ल्यू रेनकोट’वर आधारित आहे. चौथी कादंबरी ‘द वेस्टर्न विंड’ ही 15 व्या शतकातील समरसेटच्या एका उपासकाबाबत आहे.

समांथा यांनी रेडिओ तसेच टीव्ही शोच्या कार्यक्रमांत जे काही सांगितले किंवा मत मांडले, ते भारावून टाकणारे आहे. समांथा यांनी ‘द गार्डियन’ व ‘द न्यूयॉर्क टाइम्स’साठी समीक्षणे लिहिली आहेत. त्यांनी द न्यू यॉर्कर, द टेलिग्राफ, द गार्डियन आणि टाइम्समध्ये नियमित लेखन केले आहे. त्यांनी रेडिओ फोरच्या फ्रंट रो, ओपन बुक, अ गुड रीड, स्टार्ट द वीक व रेडिओ थ्रीच्या फ्री थिंकिंगमध्ये कार्यक्रम सादर केले. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यात बुकर सन्मान, बेलीज वूमन अ‍ॅवॉर्ड फॉर फिक्शन, जेम्स टेट ब्लॅक मेमोरियल पुरस्कार, वॉल्टर स्कॉट पुरस्कार आणि ऑरेज पुरस्काराचा समावेश आहे.

‘ऑर्बिटल’मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची तार्किक कल्पना मांडली असून, त्यातून पृथ्वीचे दर्शन घडत असताना कवितेचा भास होतो. या कादंबरीचा संपूर्ण कालावधी 24 तासांचा असून, कादंबरीच्या पृष्ठांची संख्या केवळ 136 आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर 6 अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित असलेली ही कादंबरी बुकर सन्मान मिळवणारी ठरली. हे अंतराळवीर पृथ्वीवरील 16 सूर्योदय आणि सूर्यास्तांचे निरीक्षण करतात. या कालावधीत ते विविध खंडांवर मार्गक्रमण करतात आणि त्यातून त्यांना विविध ऋतू पाहावयास मिळतात. ‘ऑर्बिटल’ कादंबरीत समांथा यांनी चितारलेले पृथ्वीचे सौंदर्य अशारीतीने मांडले आहे की, ते अन्य लेखकांना गवसले नाही. विशेष म्हणजे या वर्षी बुकर सन्मान नामांकनात सर्वाधिक पाच महिला लेखिका शर्यतीत होत्या व त्यात समांथा यांनी आघाडी घेतली. वेगळ्या धाटणीच्या लेखनासाठी व शैलीसाठी हार्वे यांना निवडण्यात आले.

British author Samantha Harvey wins Booker prize for Orbital
भारतात शिक्षा, परदेशी सन्मान : अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार जाहीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news