Famous British Writer | जेफ्री आर्चर

Famous British Writer |
Famous British Writer | जेफ्री आर्चर
Published on: 
Updated on: 

मुरलीधर कुलकर्णी

उत्कंठावर्धक कथाकथन आणि नाट्यमय कथानकांनी जगभरातील करोडो वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासात त्यांनी वाचकांना कल्पकतेच्या एका वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडले. १५ एप्रिल १९४० रोजी लंडन येथे जन्मलेल्या आर्चर यांचे बालपण सोमरसेटमधील निसर्गरम्य वातावरणात गेले. त्यांचे वडील व्यावसायिक होते आणि आई स्थानिक वृत्तपत्रात स्तंभलेखन करायची. कौटुंबिक पार्श्वभूमीत पत्रकारिता व भाषेचे संस्कार असल्याने त्यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड निर्माण झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकताना ते ॲथलेटिक्स संघाचे कर्णधार होते. तिथेच त्यांनी ब्रिटनच्या उच्च वर्तुळात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि २९ व्या वर्षी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे खासदार म्हणून ते निवडून आले. ब्रिटनच्या हुजूर पक्षातील (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) तडफदार नेता अशी त्यांची ओळख होती.

ब्रिटनच्या ‘ब्रिटिश रॉयल परिवारा’शी आणि तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. राजपरिवाराच्या अनेक अधिकृत, कौटुंबिक कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती असायची. राजकीय व सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल ब्रिटनच्या राजघराण्याकडून व शासनाकडून १९९२ मध्ये त्यांना ‘लॉर्ड आर्चर ऑफ वेस्टन-सुपर-मारे’ हा जीवनगौरव मानद किताब देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्‌स’चे सदस्यत्व मिळाले; मात्र १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला एका शेअर्स घोटाळ्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लेखनाचा मार्ग निवडला आणि त्यांची पहिली कादंबरी ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ (१९७६) प्रकाशित झाली, ज्याने त्यांना अभूतपूर्व यश मिळवून दिले. त्यांनी २७ हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह आणि नाटके मिळून ४० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. ‘केन अँड एबल’ या कादंबरीच्या ३ कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या. याशिवाय ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल्स’, ‘फर्स्ट अमंग इक्वल’, ‘अ मॅटर ऑफ ऑनर’, ‘अ प्रिजनर ऑफ बर्थ’ आणि ‘विल्यम वॉरविक’ या पुस्तकांनी जागतिक बेस्ट सेलर यादीत सातत्याने अव्वल स्थान पटकावले. त्यांच्या पुस्तकांच्या जगभरात ३० कोटींहून अधिक प्रती ३३ हून अधिक भाषांमध्ये विकल्या गेल्या आहेत. या विक्रमी योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘निएल्सन ऑनररी प्लॅटिनम बेस्टसेलर ॲवॉर्ड’ यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जेफ्री आर्चर यांचे आयुष्य जितके प्रसिद्धी आणि मानसन्मानाने वेढलेले होते, तितकेच ते वादांनीही घेरलेले राहिले. १९८५ मध्ये हुजूर पक्षाचे उपाध्यक्ष असताना एका वृत्तपत्राने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. नंतर त्यांनी मानहानीचा खटला जिंकला; परंतु पुढे जाऊन या खटल्यात खोटी साक्ष दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने २००१ मध्ये त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला. दोन वर्षे शिक्षा भोगल्यानंतर २००३ मध्ये त्यांची सुटका झाली. तुरुंगातील या अनुभवांवर त्यांनी ‘अ प्रिजन डायरी’ हे गाजलेले तीन भाग लिहिले. सर्व वाद, चढ-उतार आणि आव्हानांवर मात करत त्यांनी लेखनावरील निष्ठा कायम ठेवली. अखेरच्या श्वासापर्यंत हातात लेखणी धरणाऱ्या या महान कथाकाराने लंडन येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या साहित्यकृतींतून ते वाचकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news