

अक्षय निर्मळे
डेटिंग डॉटकॉम या जागतिक डेटिंग प्लॅटफॉर्मची ‘चीफ ब्रेकअप ऑफिसर’ (सीबीओ) या पदासाठीची जाहिरात चांगलीच चर्चेत आली. संवाद कौशल्य, इमोशनल इंटेलिजन्स, आधुनिक डेटिंग संस्कृतीची माहिती असणाऱ्याला या पदासाठी दरमहा ३००० अमेरिकन डॉलर (सुमारे २.८ लाख रुपये) इतका पगार ऑफर केला आहे. प्रेमसंबंध सन्मानपूर्वक संपवणे हे त्याचे काम असून ज्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा लोकांच्या जोडीदारांशी तो संवाद साधेल. ब्रेकअप करताना भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि संवाद आदरपूर्वक होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.
ही संकल्पना प्रथमदर्शनी विनोदी किंवा केवळ प्रसिद्धीसाठी केलेली मार्केटिंग युक्ती वाटू शकते; मात्र थोडे गांभीर्याने पाहिल्यास ती आजच्या बदलत्या नातेसंबंधांची एक महत्त्वाची नोंद ठरते. नाते जोडण्याइतकेच ते सन्मानपूर्वक संपवण्याची गरज वाढली आहे. त्यामुळेच ‘ब्रेकअप ऑफिसर’ हा केवळ रोजगाराचा एक वेगळा प्रयोग नाही, तर बदलते सामाजिक वास्तव, नातेसंबंधांचे बदलते स्वरूप आणि संवाद कौशल्यातील घटता आत्मविश्वास याचे हे प्रतीक आहे. आजघडीला नाते जोडणे सोपे झाले आहे. सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स आणि डिजिटल माध्यमांमुळे काही क्षणांत ओळखी होतात, मैत्री होते आणि प्रेमसंबंधही जुळतात; परंतु ही नाती तुटू शकतात, हे सुरुवातीला लक्षात येत नाही. त्यातून वाईट पद्धतीने ब्रेकअप होतात. त्यामुळेच नाते सन्मानपूर्वक संपवणेदेखील महत्त्वाचे आहे. इथेच आधुनिक युवांची सर्वात मोठी अडचण दिसते. अनेकांना नाते टिकवणे अवघड वाटतेच; पण नाते संपवण्याची जबाबदारी स्वीकारणेही कठीण वाटते. त्यातून ‘घोस्टिंग’ म्हणजे कोणतेही स्पष्टीकरण न देता अचानक संपर्क तोडणे यासारख्या प्रवृत्ती वाढतात. यावर उपाय म्हणून ब्रेकअपचा संवाद प्रोफेशनल व्यक्तीकडून घडवून आणण्याची ही संकल्पना आहे. कंपनीचा यामागील हेतू समोरच्या व्यक्तीला ‘क्लोजर’ मिळावा, हादेखील आहे.
ब्रेकअप ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही. त्यामध्ये निर्णयाची जबाबदारी स्वीकारणे आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे अपेक्षित असते. यात प्रोफेशनल सेवेचा पर्याय स्वीकारला, तर नातेसंबंध अधिक व्यवहारप्रधान होतील. तथापि, या सेवेमागील काही सकारात्मक बाजू दुर्लक्षित करता येणार नाहीत. प्रत्येक नाते समान परिस्थितीत संपत नाही. मानसिक छळ किंवा सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर प्रशिक्षित व्यक्तीमार्फत संवाद उपयुक्त ठरू शकतो.
बदलती पिढी आणि तिची संवाद पद्धतीही या बदलांमागे आहे. डिजिटल माध्यमांवर सतत सक्रिय असलेल्या पिढीला समोरासमोरचा कठीण संवाद टाळावा वाटू शकत असेल. ही भीती ब्रेकअपपुरती मर्यादित नाही. मतभेद, माफी, नकार किंवा संघर्ष यांचा सामना करण्याची तयारी कमी होत चालली आहे का, असे वाटते. एआय प्रेमपत्र लिहून देईल, अल्गोरिदम भेटवस्तू निवडेल, वाद मिटवण्यासाठी चॅटबॉट सल्ला देईल आणि अधिकारी ब्रेकअप करून देणार असेल, तर मानवी नात्यांतील प्रत्यक्ष संवादाचे स्थान नेमके काय असेल? ‘चीफ ब्रेकअप ऑफिसर’ हा चर्चेचा आणि बदलत्या काळाच्या गरजांचे प्रतिबिंब दाखवणारा विषय आहे. त्याचा स्वीकार करताना मूळ प्रश्न विसरून चालणार नाही. समस्या ब्रेकअपची नाही, संवादाची आहे. नाते तुटणे ही नैसर्गिक घटना असू शकते; पण ते सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारी स्वीकारून घडणे, हीच परिपक्वता आहे.