Aasha bhosale | चतुरस्र स्वरचंद्रिकेचा अलविदा

Aasha bhosale |
Aasha bhosale | चतुरस्र स्वरचंद्रिकेचा अलविदा
Published on
Updated on

अनुराधा पौडवाल, प्रख्यात गायिका

आशाताई म्हणजे जगातील रसिकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या स्वरांचं मुक्त आभाळ होतं. त्यांच्या गळ्याला त्याज्य आहे, असा कोणताच संगीत प्रकार नव्हता. भावसंगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, विरहगीत, स्मरणगीत इथपासून ते कॅब-ेपर्यंत गायनातील बहुरंगी प्रकारात त्यांनी आपल्या सुरावटींनी मुशाफिरी केली आणि अवीट ठसा उमटवला.

भारतीय गानपरंपरा समृद्ध करणार्‍या घराण्यांमध्ये मंगेशकर कुटुंबीयांचं योगदान अलौकिक आहे. आशाताई हा उत्साहाचा झरा होत्या, सळसळती चंद्रिका होत्या. जो आवाज ऐकल्यानंतर प्रत्येक रसिकाच्या मनात चैतन्यलहरी निर्माण होतात, त्या आवाजाचं नाव म्हणजे आशा भोसले. वयाच्या पंचाहत्तरीनंरही त्यांनी चिरतरुण गायिका हे बिरुद कायम ठेवलं आणि नव्वदाव्या वर्षीही तालासुरांसह गाणं म्हणण्याची ऊर्जा दाखवली. आपल्या स्वरांची मोहिनी केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील असंख्य संगीतप्रेमींवर इतका प्रदीर्घ काळ घालण्याचं स्वरसामर्थ्य केवळ आशाताईंमध्येच होतं. केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर तब्बल 20 भाषांमधून त्यांनी आपली गीतं अजरामर करून ठेवली आहेत. त्यांनी 11 हजारांहून अधिक गाणी गायिली. या प्रकारचं त्यांचं कर्तृत्व म्हणजे विश्वविक्रमच आहे. जगातल्या कोणत्याही गायकाने आजपर्यंत इतकी गाणी गायलेली नाहीत. यामुळेच त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला घ्यावी लागली. विशेष म्हणजे, रेकॉर्ड केलेली सर्वाधिक गाणी आपल्याच नावावर आहेत, हे आशाताईंना माहीत होतं; पण त्याची त्यांनी कधीच कोठे वाच्यता केली नव्हती. गीतकोषकार विश्वास नेरुरकर यांनी त्यांच्या गाण्यांची अचूक नोंद ठेवली होती आणि त्यासंदर्भातील माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसला दिली. त्यामुळेच त्यांच्या कामगिरीची नोंद विश्वविक्रमात होऊ शकली.

आशाताईंच्या गळ्याला त्याज्य असा कोणताच संगीत प्रकार नव्हता. वडिलांचा वारसा लाभल्यामुळे त्यांचा गळा घडत गेला. सुरुवातीला त्यांनी मराठी चित्रपटांपासून गायनाला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांसाठीही गाणी गायिली; पण हे चित्रपट विशेष गाजले नाहीत. कारण, त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त अशा बड्या गायिका राज्य करत होत्या. आपल्या स्वरांच्या कर्तृत्वाने आशाताईंनी हे आव्हान पेललं. त्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी होत्या. मुलांची जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्या आव्हानाला धीटपणे सामोर्‍या गेल्या. एका निर्मात्याने लतादीदींचे गाणे चुकून आशाताईंचे असल्याचे समजले. ही घटना त्यांच्यासाठी डोळे उघडणारी ठरली. आपल्या आवाजात आणि शैलीत जोपर्यंत वेगळेपण येत नाही, तोपर्यंत या चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण होणार नाही, हे त्यांनी वेळीच ओळखले. याच विचारातून त्यांनी शास्त्रीय संगीताच्या चौकटीबाहेर पडून गझल, कव्वाली आणि पाश्चात्त्य संगीताचे प्रयोग करायला सुरुवात केली. इंग्रजी शब्दांचा गाण्यात वापर करणे असो किंवा शास्त्रीय चौकटीबाहेरची गाणी लीलया पेरणे असो, त्यांनी नेहमीच जोखीम पत्करली.

सचिन देव बर्मन यांच्यासारख्या संगीतकाराबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. आशाताईंनी त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं. असंख्य चित्रपट त्यांच्या पार्श्वगायनामुळेच अजरामर झाले. रसिकांच्या तीन पिढ्या त्यांचा अवीट, लाघवी आणि मखमली स्वर ऐकत मोठ्या झाल्या. अनेक संगीतकारांबरोबर आशाताईंनी काम केलं आणि अनेक कवींच्या काव्यरचनांना त्यांनी सुरांचं कोंदण दिलं. ओ. पी. नय्यर आणि आशाताईंची एक अफलातून जोडी होती. आशाताई जे गाणं गातील ते हीट होणारच असा विश्वास ओपींना होता आणि झालंही तसंच. आशा भोसले आणि ओ. पी. नय्यर यांच्या मदहोश गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर साम-ाज्य केलं. ‘उमराव जान’ या चित्रपटामुळे आशा भोसले यांच्यातील गझल गायिका रसिकांसमोर आली. ‘दिल चिज क्या है’ कोण विसरेल? या चित्रपटासाठी त्यांना लखनवी लहेजा आणि गझल गायकीची नजाकत आत्मसात करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शब्दांचे उच्चार आणि त्यातील भावना अचूकपणे उमटण्यासाठी त्यांनी खय्याम यांच्या मार्गदर्शनाखाली तासन् तास सराव केला. ‘इजाजत’ या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ या गाण्याद्वारे त्यांनी गायकी किती वेगळ्या ढंगाची असू शकते, हे दाखवून दिलं. गुलजार लिखित या गाण्याचे बोल एखाद्या कवितेसारखे किंवा यमकाचे नसून ते मुक्तछंदातील संवादासारखे होते. पंचमदा या शब्दांना चाल लावण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी आशाजी तिथे उपस्थित होत्या. त्यांनी यातील शब्दांमधील आगतिकता आणि भावना ओळखली. त्यांनी एका कोपर्‍यात बसून या शब्दांना गुणगुणायला सुरुवात केली. आशाताईंच्या आवाजातील लवचिकतेमुळे त्या कठीण शब्दांना एक नैसर्गिक लय प्राप्त झाली. हे गाणे कोणत्याही ठरावीक मीटरमध्ये किंवा तालात नाही. गाणे सुरू होताना त्यात कोणताही वाद्यांचा मोठा ताफा नाही, तर ते एका संवादासारखे सुरू होते. या गाण्यात आशाताईंनी शब्दांमधील ‘विराम’ इतक्या प्रभावीपणे वापरले आहेत की, ऐकणार्‍याला त्यातील विरहाची तीव-ता थेट जाणवते. कोणतंही गाणं गाताना त्यांनी भावभावनांचा नेहमीच विचार केला. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या निधनानंतर त्यांनी ‘राहुल अँड आय’ नावाचा एक अल्बम केला. तो ऐकण्यासारखा आहे. त्यांचा ‘दिल पडोसी’ हा अल्बम फारसा कोणी ऐकला नसेल. त्यामध्ये त्या पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्याबरोबर गायल्या आहेत. गुलाम अली हे श्रेष्ठ दर्जाचे गायक असूनही या अल्बममध्ये आशाताई त्यांच्यापेक्षाही वरचढ ठरल्या.

इतकी प्रचंड लोकप्रियता, मानसन्मान, यशस्वी कारकिर्दीचा उत्तुंग आलेख असूनही त्यांच्यातलं माणसूपण शेवटपर्यंत कायम राहिलं. अहंकाराचा वारा त्यांना कधीच लागला नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करण्याची प्रचंड आवड होती. कोकणी पदार्थ तर त्या उत्तम करतच, त्यापेक्षाही मांसाहारी पदार्थ त्या अधिक चांगल्या प्रकारे करत. त्यांच्या आवाजाने मराठी गानसृष्टीही बहरली. दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे यांच्यापासून श्रीधर फडकेंपर्यंत अनेक संगीतकारांसोबत त्या गायल्या. आशाताईंच्या आवाजालाही या कशाचंच बंधन नव्हतं. अगदी बालगीतांपासून पॉप साँगपर्यंत आणि भजन-गझलपासून आयटम साँग आणि इंग्रजी गाण्यांपर्यंत असे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. गानसंगीताच्या क्षेत्रात इतकं वैविध्य दुर्मीळ आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्या काळाच्या बरोबर राहणार्‍या गायिका होत्या. त्यामुळेच मागच्या पिढीपासून आज नवतरुणाईपर्यंत सर्वांनाच त्यांची गाणी भावत राहिली.

(शब्दांकन ः चैत्राली जोशी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news