

मित्रा, नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागून गेलेले आहेत. कोण निवडून आले, का निवडून आले, कोण पराभूत झाले, काय राजकारण झाले यावर घराघरांत आणि गावागावांत चर्चा सुरू आहे. या निवडणुका सुरू होण्याआधी राज्यामध्ये जादूटोण्याचे प्रकार मात्र फार मोठ्या प्रमाणात झाले, असे दिसून येते. एकंदरीत जादूटोणा किंवा दुसर्या कोणाचे बरे वाईट करण्यासाठी विशिष्ट विधी करण्यावर आजही राज्यात भर आहे, हे वाचून मी तर क्षणभर आश्चर्यचकित झालो. ज्या महाभागांनी मतदान केंद्राबाहेर ओले नारळ आणि सुया टोचलेले लिंबू फेकले त्यांचे उद्देश काय होते, हा मोठाच प्रश्न आहे. मतदान केंद्राबाहेर जादूटोणा करून नेमके कुणाला टार्गेट करण्यात आले होते, हे समजायला मार्ग नाही.
अरे, तसेही पाहायला गेले तर काही उमेदवारांनी स्वतःच ईव्हीएम मशिनची पूजा करण्याचे पण प्रयत्न केलेले आहेत. यंत्र आपल्या गतीने आणि तंत्राने काम करत असते. त्या यंत्रावर काहीतरी प्रभाव टाकणारी जादू करणे आणि ती चालेल असे वाटणे हीच गंमत आहे. अरे मित्रा, खरी गंमत इथे नसते. इतर गावाहून बोगस मतदारांना आणून, त्यांना एखाद्या मंगल कार्यालयात ठेवून त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेणे, ही खरी गंमत आहे. नगरपरिषदांना निवडून येताना कधी कोणाला हजारोंची मार्जिन मिळत नाही. निवडून येणारे जेमतेम दहा, वीस, चाळीस मतांनी निवडून येत असतात. त्यामुळे इथे प्रत्येक मत महत्त्वाचे असते.
होय. तू सांगतोस त्यात तथ्य आहे. आमच्या गावात तर एका उमेदवाराने त्याच्या वार्डातील जेवढी मुले पुणे, मुंबईला शिकायला होती आणि ज्यांचे मतदान इथे वार्डामध्ये होते त्या सर्वांसाठी प्रशस्त ट्रॅव्हल्स बस पाठवल्या होत्या. विद्यार्थी वर्गाला काय, घरी जायला मिळाल्याशी मतलब. बिसलेरीच्या पाण्यापासून ते सकाळ दुपारचे जेवण आणि मतदान झाल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी परत त्यांच्या त्यांच्या गावाला सोडणे, हे सर्व उमेदवारांनी केले आहे.
मला सगळ्यात गंमत ईव्हीएम मशिनची वाटते. कुणी त्या मशिनवर आरोप करते, त्या मशिनमध्ये गडबड घोटाळा झाला असेही म्हणते, तर कुणी त्या मशिनवर जादूटोणाही करते. त्या बिचार्या मशिननेही काय काय सहन करायचे, असा प्रश्न आहे. हे बघ ते जे काय असेल ते असो; परंतु निवडून आलेल्या लोकांनी आपण कोणती जादू केली होती हे स्वच्छ आणि मोकळ्या मनाने सांगितले पाहिजे. असा कुठला जादूटोणा करून जर काही यश प्राप्त करता येत असेल तर मला वाटते, भारत-पाकिस्तान सीमेवर अशा जादूटोणा करणार्या लोकांना बसवावे आणि पाकिस्तानला पार नेस्तनाबूत करावे. अरे, काय झकास आयडिया सांगितली आहेस. आपल्या देशाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जादूटोणा करणारे लोक आणून चमत्कार करता येईल का, याचा पण शोध घेतला पाहिजे.