भाजपचे ‘ऑपरेशन तामिळनाडू’

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी
BJP's 'Operation Tamil Nadu'
भाजपचे ‘ऑपरेशन तामिळनाडू’Pudhari File Photo
Published on
Updated on
विजय जाधव

भाजपने अण्णा द्रमुकशी युती करत तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. द्रमुकची सत्ता उखडून फेकून देण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे, तर केंद्राच्या धोरणांना थेट विरोध करत द्रमुकने भाजपविरोधी आघाडी उघडल्याने राजकीय संघर्ष उफाळणार आहे.

भाजपसोबतची युती दोनच वर्षांपूर्वी तोडणार्‍या आणि आम्ही भविष्यात भाजपसोबत काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेणार्‍या अण्णा द्रमुक पक्षाशी नव्याने बाशिंग बांधत भाजपने तामिळनाडूत दक्षिण विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारला हटवण्याचा आणि दक्षिणेतील राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात कमळ फुलवण्याचा अजेंडा भाजपने हाती घेतला असून अण्णा द्रमुकशी समझोता करत निवडणूक आघाडीवर पहिल्या टप्प्यातील मोठे यश मिळवले आहे. तामिळनाडूत अण्णा द्रमुक आणि भाजपचे संबंध आजवर नरम-गरम राहिले आहेत. भाजपचे हिंदुत्ववादाचे आणि अण्णा द्रमुकचे तामिळींचा कळवळा असणारे, अल्पसंख्याकांना सोबत घेण्याचे सर्वसमावेशक राजकारण यावरूनच या पक्षांतील युती फिसकटली होती. अण्णा द्रमुकचे नेतृत्व जयललिता यांच्याकडे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्याशी युती करून भाजपने या राज्यात बर्‍यापैकी हातपाय पसरले.

विशेषत: 1998 च्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्याने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन करण्यात जयललिता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली खरी; पण पुढच्याच वर्षी भाजपने मागण्या नाकारल्याचे कारण पुढे करीत त्यांनी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याने ते कोसळले. पुढच्या दोन निवडणुकांत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत; मात्र 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा एक झाले. गेल्या 2021 च्या विधानसभा निवडणुकीत या आघाडीने द्रमुकशी चांगली लढत देऊनही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर मात्र दोन्ही पक्षांतील दरी वाढत गेली. राज्यात पक्ष विस्ताराची मोठी जबाबदारी असलेले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी आक्रमक भूमिका घेताना अण्णा द्रमुक सरकारच्या काळातील काही निर्णयांवर विरोधाची भूमिका घेतली. जयललिता यांच्यावर टीका केली. स्थानिक अल्पसंख्याक मतपेढी हरवण्याच्या भीतीपोटी दोन वर्षांपूर्वी अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडली. आता नव्याने साकारलेल्या युतीला ही पार्श्वभूमी आहे. भाजपने जुन्या मतभेदांवर पडदा टाकला आणि नव्या दमाने ‘ऑपरेशन तामिळनाडू’ सुरू केले आहे. ते करताना अण्णा द्रमुकच्या दबावापुढे झुकत युतीत अडथळा ठरणारे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना हटवण्यात आले. दक्षिणेशी जोडण्याचा भक्कम पूल म्हणून भाजप या युतीकडे पाहते. अर्थात, पक्षाकडे स्वबळाची ताकद नाही आणि दुसरा पर्यायही नाही, हेही वास्तव!

या नव्या युतीचा मुख्य स्पर्धक आहे तो सत्ताधारी द्रमुक. त्याच्याशी लढण्यासाठी अण्णा द्रमुकलाही भाजपसारख्या बलाढ्य पक्षाची साथ हवी होती. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांचा दारूण पराभव झाला होता. द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने सर्व 39 जागा, तर काँग्रेसने 9 जागा मिळवल्या होत्या. विधानसभेतही सत्तारूढ द्रमुक आघाडीकडे 159 आमदारांचे स्पष्ट बहुमत (एकूण जागा 234) आहे, तर विरोधी एनडीएकडे 75 जागा आहेत. सत्ताधारी प्रमुख पक्षांपैकी द्रमुक 132, काँग्रेस 17, विरोधी अण्णा द्रमुक 62, भाजप 4 हे बलाबल लक्षात घेता सत्तेसाठी किमान 118 जागा खेचून आणण्याची ही लढाई भाजप युतीसाठी वाटते तितकी सोपी नाही. त्याचमुळे झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा, चौफेर विकासाचा दावा, उत्तर तामिळनाडूच्या भागात पसरलेला नवमतदार, ग्रामीण भागावर असलेली अण्णा द्रमुक पक्षाची मजबूत पकड याची गोळाबेरीज करण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते. पक्षाची भिस्त अण्णा द्रमुकवरच असल्याने त्या पक्ष नेत्यांच्या तालावर नाचण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नाही.

भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्यास भाग पाडून आणि नंतर निवडणुकीची सर्व सूत्रे स्वतःकडे घेऊन अण्णा द्रमुकने आधीच आपला मार्ग प्रशस्त करून घेतला आहे. आता खरा प्रश्न आहे तो, हा मेळ घालणार कसा? सत्ताधारी द्रमुकने तामिळींच्या भावनांना हात घालत हिंदी भाषेला विरोधाचा आणि अस्मितेचा मुद्दा पुढे केला आहे. अण्णा द्रमुकची भाजपशी युतीमागील भूमिका राष्ट्राच्या मुख्य प्रवाहाशी आणि त्यायोगे केंद्रातील सत्तेशी जोडले जाण्याची आहे. भाजपला डबल इंजिन सरकारचा प्रयोग इथेही करायचा आहे. मुख्य इंजिन अण्णा द्रमुकचेच राहणार यात वाद नाही. अण्णा द्रमुकच्या मतांची टक्केवारी 25 ते 30 टक्क्यांच्या आसपास आहे, तर भाजपकडे केवळ चार ते पाच टक्के हक्काचा मतदार आहे. युतीचे नेतृत्व अण्णा द्रमुकचे नेते, माजी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर सोपवून भाजपने संभाव्य दगाफटका टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

दोघांचा समान शत्रू द्रमुक असल्याने ही आघाडी नेटाने काम करेल, असे दिसते. द्रमुकच्या मतांत फूट पाडण्यासाठी भाजप आणखी कोणता पर्याय उभा करतो, हे पाहावे लागेल. या स्थितीत मतदारांसमोरही दोन सशक्त पर्याय उभे राहताना दिसतात. भाजप अधिक अण्णा द्रमुक मतांची बेरीज, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या ‘विकासयात्रे’चा प्रभाव पडला, तरच द्रमुक समोर मोठे आव्हान निर्माण करण्यात या नव्या युतीला यश येईल. दुसरा पर्याय अर्थातच द्रमुकचा आहे.

लहान भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. विधानसभेतील केवळ 4 जागा, मतांचा अल्पआधार, हिंदुत्ववादी वैचारिक भूमिका रुजवण्याचा अवघड प्रयोग हे अडथळे पार करत पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. पंतप्रधान मोदी आणि युतीचे शिल्पकार अमित शहा यांच्यावरच विजयश्री खेचून आणण्याची मुख्य जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्याच आठवड्यात 8 हजार 300 कोटींच्या विकास प्रकल्पाचे लोकार्पण करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांची भाषा विकासाची आहे. ‘द्रमुकला सत्तेतून उखडून फेकू. निवडणुकीनंतर द्रमुकचे अस्तित्व संपेल’ हा त्यांनी व्यक्त केलेला विश्वास किती खरा ठरतो, हे पाहावे लागेल. चिवट आणि प्रखर विरोध करत हा राष्ट्रीय हल्ला परतविण्याची मोठी तयारी द्रमुक नेत्यांनीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news