

शशिकांत सावंत
कोकणात दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना या विभागलेल्या ताकदीतच भाजपचे नंबर वनचे गणित अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे हा ट्रेंड भविष्यातही कायम राहील, अशीच शक्यता दिसते.
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. महाविकास आघाडीच्या धरसोड वृत्तीमुळे नगरपालिका, महानगरपालिकांनंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. तर, दुसर्या बाजूला महायुतीने कोकणातील तिन्ही जिल्ह्यांवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना, रत्नागिरीत शिवसेना, तर रायगडमध्ये राष्ट्रवादी-भाजप सत्तेपर्यंत पोहोचतील, अशी स्थिती आहे.
सिंधुदुर्गात भाजपने 31 जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवले. तर, शिवसेनेने 13 जागा जिंकत ताकद दाखवून दिली. रत्नागिरीत 40 पर्यंतचा टप्पा शिवसेनेने स्वबळावर गाठला. रायगडमध्ये राष्ट्रवादी 21, शिवसेना 20, तर भाजप 14 जागांवर विजयी झाला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांत महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. खरे तर रायगड जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढत दिली असती, तर विरोधकांची ताकद दिसली असती. ठाकरे शिवसेनेचे खाते खोलण्याइतपत वर्चस्व राहिले. विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये गुंतून राहिल्याने शरद पवार राष्ट्रवादीला अस्तित्वच दाखवता आले नाही. काँग्रेसची अतिमहत्त्वाकांक्षा त्यांना याही निवडणुकीत पीछेहाटीवर नेणारी ठरली.
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युती जाहीर करून भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतली होती; पण महाविकास आघाडी मात्र शेवटपर्यंत एकत्र आल्याचे दिसले नाही. त्यामुळे विरोधकांना जिल्हा परिषदेच्या 50 पैकी केवळ आठ जागा मिळाल्या; तर महायुतीला तब्बल 42 जागा मिळाल्या. रत्नागिरीतही 56 पैकी महायुतीने जवळपास 46 जागा मिळवल्या. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढली. त्यांना 4 जागा मिळाल्या. विरोधकांच्या हाती फारसे काही आले नाही. नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा हे सर्वच विरोधकांच्या हातातून गेल्याने महायुतीतील पक्ष पुन्हा एकदा मजबूत झाले आहेत; तर विरोधी पक्षांचे मात्र चित्र निराशाजनक आहे.
कोकण हा खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला; मात्र शिंदे आणि ठाकरे अशा दोन विभागांत शकले झाल्यानंतर या पक्षाची कोकणात पीछेहाट होताना दिसते. या पार्श्वभूमीवर तळातले कार्यकर्ते शिवसेना म्हणून एकत्र येण्याच्या मन:स्थितीत आहेत. नगरपालिका निवडणुकीत कणकवलीत हा प्रयोग यशस्वीही झाला. त्यामुळे भविष्यात शिवसेनेच्या एकीकरणाची चर्चा सुरू होऊ शकते. मात्र, भाजप ते होऊ देणार नाही. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना या विभागलेल्या ताकदीतच भाजपचे नंबर वनचे गणित अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे हा ट्रेंड भविष्यातही कायम राहील.
रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले, अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. माणगाव, निजामपूरची जागा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या राजीव साबळेंमुळे प्रतिष्ठेची झाली होती. ही जागा शिवसेनेने जिंकली. तर, अलिबागमध्ये शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या आंबेपूर मतदारसंघातील चित्रा पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेनेने मुसंडी मारली. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही मोठा फटका बसला. सहाही जागा राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना युतीने जिंकल्याने शिंदेंच्या शिवसेनेची येथे पीछेहाट झाली आहे. नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेनेनेच विजय मिळवला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का आहे. त्यामुळे या भागामध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होताना दिसत आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरूनही शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच आहे. 15 ऑगस्टचे ध्वजवंदन राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी केले. तर, 26 जानेवारीचे ध्वजवंदन शिवसेनेचे भरत गोगावले यांनी केले. आजपर्यंत पालकमंत्री कुणाचा, हे ठरलेले नाही. मात्र, आता जिल्हा परिषदेला भाजप कुणाबरोबर जाणार, यावर पालकमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.