

गणेश जेठे
‘शत-प्रतिशत भाजप’ हे पक्षाचे उद्दिष्ट, तळकोकणात वाढत असलेली शिंदे शिवसेनेची ताकद आणि भाजप व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या टीका-टिप्पणीमुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपल्या मातृभूमी असलेल्या तळकोकणातच राजकीय वाटचाल करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यात पुन्हा येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही मित्र पक्षांची युती कायम ठेवण्यासाठीही त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
कोकण प्रांतावर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे, हे काही लपून राहिलेले नाही. भाजप-शिवसेनेची 25 वर्षे युती असताना शिवसेनेकडे असलेला कोकण आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कसोशीने प्रयत्न केला. काही भागात भाजपला त्यात यशही मिळाले; परंतु कोकणात अधिकतर प्रभाव शिवसेनेचा राहिला. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या. त्यात पुन्हा शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप पक्ष आणखी पुढे सरकला. खासदार नारायण राणे भाजपमधून निवडून आल्यानंतर भाजपचे तळकोकणातील वर्चस्व वाढले; परंतु विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बर्यापैकी मजल मारली. एकेकाळी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंड शिवसेनेचा प्रभाव कोकणच्या राजकारणावर होतो; परंतु फूट पडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. ती जागा व्यापून टाकण्यासाठी अर्थातच भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झाली. त्यात शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिक मतदारसंघांत आमदार निवडून आले आहेत. त्या-त्या मतदारसंघात ताकदीने संघटना वाढविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून दिसतो आहे.
अशावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार हे मंत्री नितेश राणे आहेत. त्यांनी आपला मतदारसंघ भाजपमय केला आहे. तिथे शिंदे शिवसेनेला फारशी संधी दिसत नाही. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपचे नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात पुन्हा आता सिंधुदुर्गचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांच्या मातृभूमीत भाजपचे संघटन वाढविण्याची जबाबदारीही आपसूकच आली आहे. किंबहुना कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठीच रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे म्हटले जाते. अर्थात, भाजप श्रेष्ठींकडूनही तशीच अपेक्षा असणार आहे.
रवींद्र चव्हाण तसे गेली दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत; परंतु आता केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना त्यांना कोकण प्रांत काबीज करावा लागणार आणि तसे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यात पुन्हा कोकणात संघटन विस्तारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असलेल्या शिंदे शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागणार आहे. अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली; परंतु दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी ज्याप्रकारे गोगावलेंवर हल्लाबोल केला, ते पाहता शिंदे शिवसेना मित्र पक्ष असला, तरी त्यांची कोणतीही चूक खपवून न घेण्याची भूमिका भाजपची आहे, हे स्पष्ट झाले.
सत्तेत एकत्र असले, तरी संघटन वाढविताना होणार्या स्पर्धेतून संघर्ष आणि असे वाद ज्या-ज्यावेळी होतील त्या-त्यावेळी रवींद्र चव्हाण यांना ते वाद मिटवावे लागणार आहेत. किंबहुना सत्तेतील महायुती टिकवून ठेवण्यासाठी टोकाची भूमिका घेता येणार नाही. रवींद्र चव्हाण लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणचा दौरा करणार आहेत. या दौर्यात त्यांची पुढील वाटचाल कशी असेल, याचे संकेत मिळतीलच; परंतु त्याचबरोबर लवकरच होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे कसे समाधान करतात आणि कशी ‘स्ट्रॅटेजी’ वापरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.