

अर्जुन नलवडे
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा हे एक छोटेसे गाव. या गावातील अजनार नदी एकेकाळची जीवनदायिनी प्लास्टिक, शेवाळ आणि कचऱ्याने गुदमरत होती. कुबट दर्प आणि घाणीचे साम्राज्य पसरलेली ही नदी पाहून एका २१ वर्षीय तरुणाचे मन हेलावून गेले. सरकारी मदतीची वाट पाहत न बसता त्याने स्वतःच या नदीला जीवदान देण्याचा चंग बांधला. या ध्येयवेड्या तरुणाचे नाव होते सुरेंद्र सिंह चौधरी, ज्याला आज संपूर्ण इंटरनेट ‘बिट्टू तबाही’ म्हणून ओळखते.
बिट्टू हा एका सामान्य कुटुंबातील पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकणारा विद्यार्थी; पण त्याची स्वप्ने मात्र निसर्गाइतकीच विशाल होती. २६ जानेवारी २०२६... प्रजासत्ताक दिनाचा तो मंगल मुहूर्त. बिट्टूने स्वतःची साठवलेली पुंजी खर्च केली. काही साधी उपकरणे खरेदी केली आणि तो थेट अजनार नदीच्या पात्रात उतरला. सुरुवातीला काही मित्र त्याच्यासोबत होते; पण नदीतली ती भयानक घाण पाहून त्यांनी लवकरच पाठ फिरवली. आता ही लढाई केवळ त्याची एकट्याची होती.
विशेष म्हणजे, बिट्टूला साधे पोहताही येत नव्हते आणि त्याच्याकडे कोणतीही पुरेशी सुरक्षा साधने नव्हती, तरीही तो मागे हटला नाही. स्वतःच्या हातांनी त्याने नदीतला कित्येक टन कचरा बाहेर काढायला सुरुवात केली. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. नदीत काम करताना अनेकदा विषारी सापांशी त्याचा सामना झाला. दूषित पाण्यामुळे हात-पायांना गंभीर इन्फेक्शन झाले, त्वचेला भयंकर खाज सुटू लागली; पण त्याच्या डोळ्यांत फक्त एकच ध्येय होते, स्वच्छ आणि खळखळणारी अजनार नदी.
अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अखेर तो चमत्कार घडला. घाणीने तुंबलेली नदी आता मोकळा श्वास घेत होती. बिट्टूने या संपूर्ण प्रवासाचे ‘नदी स्वच्छ करण्यापूर्वीचे आणि नंतरचे’ फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आणि तो रातोरात ‘हिरो’ बनला. पर्यावरण रक्षणाच्या त्याच्या या झपाटलेल्या कामाला लाखांहून अधिक फाॅलोअर्सनी डोक्यावर घेतले.
त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीची दखल केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर थेट सातासमुद्रापार घेतली गेली. नेदरलँड्समधील ‘द ओशन क्लीनअप’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे संस्थापक आणि सीईओ बोयन स्लॅट यांनी ‘एक्स’वर त्याची पोस्ट पाहिली. एका २०-२१ वर्षीय भारतीय तरुणाची ही जिद्द पाहून ते इतके भारावून गेले की, त्यांनी थेट इंटरनेटवरूनच बिट्टूला साद घातली, 'आमच्यासाठी काम करायला ये!' एका डच एनजीओकडून अशी थेट नोकरीची ऑफर मिळणे, हे खरोखरच अद्भुत आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या तरुण योद्ध्याला आपल्या निवासस्थानी खास आमंत्रित करून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि सरकारी सहकार्याचे आश्वासनही दिले. त्याच्या प्रयत्नांतून एक गोष्ट स्पष्ट होते. निसर्गासाठी उचललेले एक छोटे पाऊलही उद्याच्या पिढीसाठी मोठा बदल घडवू शकते. बदल घडवण्यासाठी मोठ्या पदाची नव्हे, तर मोठ्या जिद्दीची गरज असते. एका तरुणाने एकट्याच्या जीवावर घडवून आणलेली ही पर्यावरण क्रांती हजारो हातांना निसर्ग वाचवण्यासाठी प्रेरणा देईल.