

वैजनाथ महाजन
कविवर्य सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दीची सांगता आज होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या साध्या, आत्ममग्न आणि मूल्यप्रधान काव्यजीवनाचा वेध...
कविवर्य सूर्यकांत खांडेकर हे पानाआडच्या फुलासारखे कवी होते. म्हणजे कवींच्याच भाषेत सांगायचे झाले, तर ‘हरएकात वावरलो; पण हरऐकात दिसून आलो नाही...’ असाच त्याचा सर्वत्र एक विश्रब्ध असा वावर राहिला. ते मितभाषी होते. अध्यात्म, साधनेत गुंतल्यासारखा त्यांचा निरागस व तितकाच धीरगंभीर असा चेहरा वाटायचा. त्या चेहर्यावर कधीच कसल्या पापाची टोचणी दिसायची नाही आणि त्याचवेळी पुण्याचीपण मोजणी दिसायची नाही. हे केवळ लिहिण्यापुरते नव्हे, तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवास अनुभवलेले असे कदापि विस्मृतीत जाऊ शकणार नाही अशा अक्षय संचितातील बोल आहेत. ते सर्वार्थाने कवितेत रमलेले होते आणि सर्वस्वी कवितेचेच होऊन राहिलेले होते.
बोरकर- माडगूळकरांच्या बरोबरीने ते वाढले; पण पिढी म्हणून त्यांचा भावबंध जोडला गेला तो कवी कृ. ब. निकुंब, शांता शेळके, वा. रा. कांत, गंगाधार महांबरे, रा. ना. पवार अशा कवींच्या पिढीशी. स्वतः ते कधी अट्टहासाचे संबंध जोडण्यास जात नसत; पण ज्यांच्याशी त्यांचा भावमेळ जमत असे, त्यांच्यात ते खुलत असत. बोलणे मोजकेच; पण ते बोलत ते मार्मिक. एकूण कवी खांडेकरांची बोलण्यापेक्षा आत्ममग्न होऊन विचारात गुंतून राहण्यावर मदार होती; पण ते आत्मकेंद्री नव्हते. आपला परिसर आणि आपली माणसं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि मायेचा विषय असायचा.
त्यांचा जन्मदात्या मातेवर विलक्षण जीव होता आणि त्यांच्या मायेची पाखर त्यांना अगदी पन्नाशीनंतरसुद्धा फार उभारी देणारी वाटत असे. आपण आणि आपली कविता सदैव त्या माऊलीसमोर असावी असे त्यांच्या मनाने घेतलेले होते. भाऊसाहेब खांडेकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध होता. माडगूळकरांच्या काही कथा, काही लेखन हे सूर्यकांत खांडेकर यांच्या कोरीव अक्षरातून साकारलेले आहे. काही चित्रपटांकरिता त्यांनी जलद गतीने लेखन केले; पण त्यात त्यांचे कवी मने रमले नाही. ते विशुद्ध भावकवी होते. मानवी जीवनातील मूल्यभावाची त्यांना लक्षणीय जाण होती. त्यांच्या कवितेतून ही प्रकट झालेली आहे.
त्यांनी ज्या सहजतेने ‘या फुलांच्या गंधकोषी’सारखे अजरामर गीत लिहिले त्याच सहजतेने ‘ये निराशे...’सारखी समर्थ कवितापण लिहिली. ‘ये निराशे... ओक माझ्या जीवनी काळजीतून सूर्य मी सामर्थ्यशाली... घेत असे तुझा बळी भाव कोमल...’ सूर्यकांत खांडेकरांच्या कवितेतून जगण्याचा असाही दुर्दम्य आत्मविश्वास प्रकट झालेला आहे. याचा आज सुखद धक्का बसतो आहे. लोकसाहित्याची अत्यंत वेधक अशी जाण त्यांच्याजवळ होती. त्यातूनच त्यांनी आपल्या अभ्यासाचा विषय शाहिरी वा.ड्मय बनविला आणि त्याचा समग्र व व्यापक असा अभ्यास व प्रबंध सिद्ध केला. त्यांचे लेखन निर्दोष होते. त्यांनी लिहिले म्हणजे ती मुद्रणप्रतच आहे असे खुशाल समजण्यास हरकत नसायची. शाहीर पिराजीराव सरनाईक, कवी लहरी हैदर अशा जाणत्यांकडून त्यांनी मधमाशी होऊन खूप काही प्राप्त करून घेतलेले होते. त्यांचे भरण पोषण याच सांस्कृतिक कवितांवर झालेले होते आणि त्याचा त्यांना तितकाच रास्त असा अभिमानही होता.
‘छुमछुम’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. याच काळात त्यांनी उत्तमोत्तम बालगीते लिहिली; पण ते मराठी काव्याच्या क्षितिजावर चमकले ते त्यांच्या ‘सावली’ या दुसर्या संग्रहापासूनच. त्यानंतर ‘पानफूल’ हा संग्रह आला. त्यांच्या प्रकृतीप्रमाणे कसलाही गाजावाजा न करता हे सारे संग्रह आले. या काव्याच्या बरोबरीने त्यांनी ग्रामीण कथेचे पण संपादन केले. ज्ञानेश्वरीचे आलोचन केले आणि पुढे शाहिरी वा.ड्मयाच्या अभ्यासाला स्वतःला झोकून दिले. त्या काळातील सर्व वा.ड्मयीन नियतकालिकांनी आणि प्रतिष्ठित दिवाळी अंकांनी त्यांच्या कवितांना मनापासून दाद दिली. अखेरपर्यंत त्यांना लागून राहिलेला होता तो कवितेचा ध्यास. ते सचोटीचे शिक्षक होते. जसा त्यांनी गृहस्थाश्रमी खांडेकर जपला तसा त्यांनी आपल्या काव्यधर्मी सूर्यकांत जपला. मराठी कवितेच्या क्षेत्रात त्यांच्या नावाचे मानाचे पान आहेच आहे. कविवर्य सूर्यकांत खांडेकर याना अभिवादन!