

नवी मुंंबईत आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, खाडीकिनारी वाढत असलेले अतिक्रमण आणि डोंगरांचे होत असलेले सपाटीकरण यामुळे पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येऊ लागले आहेत. फ्लेमिंगो सिटी अशी ओळख असलेले नवी मुंबई, ठाणे, उरण पक्षी वैभवाला मुकण्याची स्थिती आहे. खरं तर, या भागात रामसर क्षेत्र घोषित करून मँग्रोज बचावाचा नारा देण्यात आला आहे. वाढते पर्यटन हे या भागात आहे; मात्र अतिक्रमणामुळे पाणथळ जागा धोक्यात आल्या आहेत.
ठाण्याच्या खाडीकिनारी व उरणच्या पाणथळ जागांमध्ये दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त रोहित पक्षी दाखल होतात. ही प्रजाती स्थलांतरित आहे. ठाण्याचा खाडीकिनारा हा याबरोबरच तलावांच्या भागात सुमारे 55 हेक्टर क्षेत्रांवर पक्ष्यांचा अधिवास आहे. अलीकडे वाढीव 3 हेक्टरमध्येेही पाणथळ भागात पक्षी येऊ लागले आहेत. जैवविविधतेचा ठेवा असलेल्या या भागामध्ये पक्षी वैभवामुळे पर्यटन वाढत आहे. यासाठी तलावांचे संवर्धन करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणूनही घोषित झाला; मात्र वाढते जलप्रदूषण, वाहून येणारा प्लास्टिक कचरा यामुळे हा किनारी भाग अस्वच्छतेच्या गर्तेत आहे. एका बाजूला पर्यावरणवादी या जागांच्या संरक्षणासाठी मोहिमा घेत आहेत, तर दुसर्या बाजूला विदेशी पाहुण्यांचे अधिवास धोक्यात येत आहेत. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवले नाही, तर या खाडी किनार्याचे पक्षीवैभव नष्ट होण्याची भीती आहे. पाणथळ भागात शांतता राखणे, वाहनांच्या हॉर्न वाजवण्यावर बंदी करणे, गाड्या पार्किंग व्यवस्था पाणथळभागापासून दूर ठेवणे, संरक्षित प्रवेशाला मार्किंग करून चिन्हांकित करणे, येणार्या पर्यटकांना पक्ष्यांपर्यंत थेट जाऊ न देता दुर्बिणीतून पक्षी पाहण्याची व्यवस्था ठेवणे अशा उपाययोजनांची गरज आहे; मात्र उपाययोजनांच्या बाबतीत पावले उचलली जात नसल्याने पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
कोकण किनारपट्टीवर 145 जातीचे परदेशी पक्षी दाखल होतात. खाडीकिनार्याला जसे पक्षी येतात तसे नदी किनार्यालाही विविध पक्ष्यांचे आगमन होते. 17 देश जैवविविधतेने समृद्ध आहेत. यामध्ये पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टीचाही समावेश आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या समृद्ध कोकण किनारपट्टीवर देशविदेशातून येणार्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. तिबेटी खंड्या, निळ्या कंठाचा पोपट, नवरंग, समुद्री गरुड, सह्याद्री सिंगीर, समुद्री पक्षी यामध्ये सीगलचा मुख्य समावेश आहे. पक्ष्यांच्या या दुर्मिळ प्रजाती हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. गेल्या 25-30 वर्षांत 10 टक्के पक्ष्यांच्या जाती दुर्मीळ झाल्याचे चित्र आहे. किनारी भागात भरती-ओहोटीच्या वेळा, परिसर स्वच्छता, पाणथळ जागांचे सीमांकन अशा मुद्द्यांना महत्त्व देणे गरजेचे आहे; मात्र तसे प्रयत्न गांभीर्याने होत नसल्याने हा प्रश्न जटिल होताना दिसत आहे. भारतात एकूण 400 पक्षी प्रजाती आहेत. त्यातील 63 टक्के या स्थलांतरित आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बहुतांश पक्षी हे शिकारी पक्षी आहेत. हे पक्षी पाणथळ जागांमध्येच अधिवास करतात. विविध कीटक, मासे हे त्यांचे खाद्य आहे. पाणथळ परिसंस्थेतील वैविध्यपूर्ण परिसरात त्यांचे वास्तव्य असते. पूर्व आशियाई भागातून येणारे हे पक्षी अलीकडच्या काळात मानवनिर्मित संकटामुळे कमी संख्येने येऊ लागले आहेत. ही घट गेल्या दोन दशकांतील आहे. अधिवास नष्ट होऊ लागल्याने आशियाई प्रजाती पक्ष्यांच्या लँड बर्ड प्रजाती लक्ष्य होऊ लागल्या आहेत.
पक्षी संवर्धनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काही भूमिका घेण्यात आल्या आहेत. जागतिक पर्यावरण करार सर्व देशांना लागू आहे. त्यात स्थलांतरित पक्ष्यांचे थांबे आणि अधिवास हे संकल्पित करून या पक्ष्यांना अभय देण्याची भूमिका घेण्यात आली असली, तरी या पक्ष्यांच्या अधिवासाचा र्हास थांबलेला नाही. यावर उपाय म्हणून पक्ष्यांसाठीचे ट्रेकिंग तंत्रज्ञान वापरून काही उपाययोजना केल्या जात आहेत. यातून काही चांगले घडेल, अशी आशा आहे.