

आशिष शिंदे
आपल्यापैकी अनेकांसाठी बाईक रायडिंग म्हणजे केवळ प्रवास नसून एक भावना असते. पूर्वी जेव्हा आपण सहलीला जायचो, तेव्हा रस्ते विचारत किंवा नकाशांचे कागद सोबतीला असायचे. त्या प्रवासात एक वेगळीच मजा होती; पण आजच्या हायटेक युगात आपण स्मार्टफोनवर अवलंबून आहोत. कुठेही राईडला जायचे झाले, तर स्मार्टफोनमध्ये मॅप उघडायचा आणि बाईकला किक मारायची.
आता यात अडचण अशी होते की, बाईकच्या हँडलवर भलामोठा मोबाईल लावणे कठीण होते. त्यात सतत मॅप वापरल्याने बॅटरी संपू लागते आणि फोनवर येणारे नोटिफिकेशन्स रायडिंगचा आनंदही हिरावून घेतात. मात्र, आता टेन्शन नको! सध्याच्या ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एक असे भन्नाट गॅजेट तयार झाले आहे जे, केवळ एक नेव्हिगेशन डिव्हाईस नाही, तर तुमचा बाईक रायडिंगचा अनुभवच बदलून टाकेल. या गॅजेटची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे डिझाईन. जुन्या काळातील डायलची आठवण करून देणारा हा नेव्हिगेटर दिसायला अत्यंत प्रीमियम आहे. यामध्ये हाय-पॉलिश्ड स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे तुमच्या बाईकवर हे गॅजेट अगदी नैसर्गिक वाटते. जणू काही ते गाडीसोबतच आले असावे, इतके ते सुसंगत दिसते.
आपल्याला मोबाईलवर मॅप बघताना अनेकदा गोंधळ होतो; पण या नेव्हिगेशन सिस्टीमची फिलॉसॉफी वेगळी आहे. हे बाईकस्वाराला विचलित करत नाही. यात तुम्हाला फक्त हवी तितकीच माहिती मिळते. कुठे वळायचे आहे आणि किती अंतर राहिले आहे. हे ‘मिनिम्लिस्ट’ नेव्हिगेशन गॅजेट तुम्हाला रस्त्यावरून लक्ष भरकटू न देता सुरक्षित प्रवासाची खात्री देते.
ही नेव्हिगेशन सिस्टीम स्मार्टफोनमधील अॅपशी ब्लूटूथद्वारे कनेक्ट होते. तुम्हाला जिथे जायचे आहे, त्या ठिकाणाचे नाव अॅपमध्ये टाकले की मोबाईलचे काम संपते, तुम्ही तो सुरक्षितपणे खिशात किंवा बॅगेत ठेवू शकता. त्यानंतर या छोट्या आणि सुबक स्क्रीनवर तुम्हाला मार्ग दाखवणारा एक साधा आणि स्पष्ट बाण (अॅरो) दिसायला लागतो. हा बाण तुम्हाला नेमके कधी आणि कुठे वळायचे आहे, हे अचूकपणे सांगतो. यात गुंतागुंतीचे नकाशे नसून, फक्त आवश्यक तीच माहिती जसे की, वळणाचे अंतर आणि दिशा दिसते, ज्यामुळे तुमचे रस्त्यावरून लक्ष भरकटत नाही. विशेष म्हणजे, हे गॅजेट बाईकच्या हँडलवर बसवणे अत्यंत सोपे असून, रायडिंग ग्लोव्हज घालूनही तुम्ही ते सहज हाताळू शकता. हे डिव्हाईस पूर्णपणे वेदरप्रूफ आहे, म्हणजे पाऊस असो वा धूळ, तुमचे नेव्हिगेशन थांबणार नाही. याचा वापर करणे इतके सोपे आहे की, तुम्हाला तांत्रिक ज्ञानाची गरज भासणार नाही. स्टेनलेस स्टील आणि मशिन-फिनिश्ड अॅल्युमिनियममुळे याला एक रॉयल फील येतो. या भन्नाट गॅजेटची किंमत सुमारे 23 ते 25 हजार रुपये इतकी असणार आहे.