पहिला चहा | आमचो बॅरियरलेस प्रवास...

barrier travel |
Published on
Updated on

उठी उठी गोपाळा... सकाळी सकाळी ही मराठी गाणी ऐकताना ना एक वेगळीच धुंदी येते. नाहीतर ‘ढाक चिक ढाक चिक’सारखे चालूच असतं साऊंड सिस्टीमवर. जिममध्येही हल्ली ढाक चिकच ऐकावं लागतं सकाळी सकाळी. आज सकाळीच नाशिकला जायचा योग आला आणि गाडीमध्ये गाणी लावली एफएमवर. उठी उठी गोपाळा... गोपाळ आज जिमला न जाता चक्क गाडीत बसला. आज गर्दी कुठेच दिसली नाही. बरे झाले एकाअर्थी रस्ता आणि प्रवास निवांत. असा योग पुणेकरांच्या वाट्याला क्वचितच येतो. वाटेत चहा घेण्यासाठी गाडी बाजूला थांबवली. एखादा घोळका येतो का बघूया म्हटलं. तशी रेस लावायची असली की थोडीफार रेलचेल असली की मजा येते. पण रेस स्वतःशी कधीतरी लावावी तर ही अशी वेळ आणि संधी कधीतरीच येते. चहाच्या गाड्यांच्या रांगा आणि बाजूला टोल नाक्याच्या आसपास जरा लांबच्या अंतरावर हॉटेलं यांचं समीकरण अगदी जमून येतं आणि रास्ता रोको प्रमाणे प्रवाशांना त्यांच्या त्यांच्या भुका आणि तहान हॉटेलकडं घेऊन जातात.

टोल भरून खिसे जरा हलके झालेले असतात. टोल भरेपर्यंत रांगेत तिष्ठावं लागतं ते वेगळंच. बिचारे दमलेले जीव भूक लागून गेल्यावर भेळ, भजी, पोहे, फार फार तर पुरी भाजीवर ताव मारतात. पैसे उधळायला बाहेर पडलेले पण त्या टोल नाक्यावर सगळी हौस जिरवून उदास चित्ताने हॉटेलात एरवी ‘वदनी कवळ घेता’ म्हटल्याशिवाय घास न घेणारे मिळालेल्या घासावर तुटून पडतात. यात प्रवासातली हौस तर जिरतेच; पण परत काही लवकर देवदर्शनाला यायचं नाही बाबा. आत्ताच दर्शन व्यवस्थित घ्या बरे देवांचे म्हणताना दिसतात.

नाशिकचा रस्ता म्हणजे पावलोपावली देवासाठीची गर्दी. कामाची माणसं आपली त्यांच्यातून वाट काढत जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. याची फिकीरच कोणाला नसते. पण आज या रस्त्यावर एवढा निवांतपणा जाणवला की एक तर आपण रस्ता भरकटलो नाहीतर मल्टीलेन फ्री फ्लो प्रणालीमुळे गर्दी कमी झालीय. तसंच काहीसं! मी झटकन गाडीत बसलो आणि थेट जुन्नर क्रॉस केल्यावर संगमनेर तालुक्यातल्या टोलवरून गाडी पुढे घेतली आणि आपोआप चलन भरलं गेलं. हुश्श! आता बिनधास्त झालो. या रस्त्याने आमचो बॅरीअरलेस प्रवास सुखकर होणार... हे नक्की. इंधनाची आणि वेळेची बचत हे सरकारचे उद्दिष्ट भावले बुवा. कंन्टिन्यू ड्रायव्हिंग... वाह वाह! धन्यवाद सरकार!

logo
Pudhari News
pudhari.news