

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
16 डिसेंबर रोजी भारत-पाकिस्तान तिसर्या युद्धाला, म्हणजेच बांगला देश स्वातंत्र्यलढ्याला 55 वर्षे पूर्ण झाली. ही घटना आजही कालच घडल्यासारखी जिवंत वाटते; कारण त्या युद्धाने दक्षिण आशियाचा भू-राजकीय नकाशा कायमचा बदलून टाकला.
पूर्व पाकिस्तानातून बांगला देशाची निर्मिती हा भारताचा केवळ लष्करी विजय नव्हता, तर तो मानवी हक्क, नैतिकता आणि धोरणात्मक दूरद़ृष्टी यांचा संगम होता. या ऐतिहासिक विजयामागे भारतीय लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांची भूमिका निर्णायक ठरली. पूर्व पाकिस्तानात बंगाली हिंदू व मुसलमानांवर झालेल्या अमानुष अत्याचारांचा अंत करून पाकिस्तानी सेनेच्या तब्बल 93 हजार सैनिकांचे आत्मसमर्पण घडवून आणणे, हा दुसर्या महायुद्धानंतरचा जगातील सर्वात मोठा सैनिकी शरणागतीचा प्रसंग ठरला. पाकिस्तानने स्वतःच खोदलेल्या खड्ड्यात त्याला ढकलण्याचे काम माणेकशॉ यांनी थंड डोक्याने आणि अचूक वेळ साधून केले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल याह्या खान यांच्या पंजाबी वर्चस्ववादी धोरणांमुळे पूर्व पाकिस्तानात बंगाली राष्ट्रवाद बळावला होता. 1970 च्या सार्वत्रिक निवडणुकांत शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता हस्तांतर नाकारण्यात आले. यानंतर असंतोषाला दडपण्यासाठी मार्च 1971 मध्ये ‘ऑपरेशन सर्चलाईट’ राबवले गेले. या कारवाईत विद्यार्थी, बुद्धिजीवी, सामान्य नागरिक आणि धार्मिक अल्पसंख्याक यांच्या भीषण नरसंहारामुळे कोट्यवधी लोक विस्थापित झाले आणि लाखो निर्वासित भारतात आश्रयाला आले. या मानवी शोकांतिकेने भारत सरकारवर हस्तक्षेपाचा दबाव वाढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्काळ लष्करी कारवाईचा विचार केला; मात्र जनरल माणेकशॉ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लष्कर अद्याप पूर्णतः सज्ज नाही. विजयाची खात्री नसताना युद्धात उतरू नये, हीच त्यांची ठाम भूमिका होती. त्यानंतर सात महिन्यांच्या सखोल नियोजनानंतर युद्धाची दिशा ठरली.
3 डिसेंबर 1971 च्या संध्याकाळी, पाकिस्तान वायुसेनेने भारतीय पश्चिम सीमेच्या 480 किलोमीटर आत असलेल्या आग्रासह उत्तर पश्चिम भारतातील 11 लष्करी विमानतळांवर अचानक हवाई हल्ला केला. त्याच दिवशी संध्याकाळी, ऑल इंडिया रेडिओवरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, या हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे व आम्ही त्याला योग्य उत्तर देण्यास सक्षम आहोत. भारताने त्याच रात्री, पश्चिम पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले. मुक्ती वाहिनी व तिचे आमच्यासारखे भारतीय प्रशिक्षक, एप्रिलपासूनच पूर्व पाकिस्तानमध्ये कार्यरत होते. इंदिरा गांधी आणि सॅम माणेकशॉ यांना कोणताही परकीय हस्तक्षेप होण्यापूर्वी संपणारी, जलद व निर्णायक मोहीम हवी होती. पूर्वेकडील ऑपरेशनचे तपशीलवार नियोजन, तसेच मुक्ती वाहिनीची तयारी करण्याची जबाबदारी, जनरल सॅम माणेकशॉ यांनी पूर्व कमांड प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडर इन चीफ), लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांना दिली. त्यांच्या मदतीला पूर्व नेव्हल कमांडचे व्हॉईस अॅडमिरल एन. कृष्णन आणि एअर हेडक्वार्टरमधील एअर मार्शल पी. सी. लाल होते. किल्लेबंद शहरांना वळसा घालून ग्रामीण भाग ताब्यात घेण्याची माणेकशॉ यांची रणनीती विलक्षण यशस्वी ठरली.
13 डिसेंबरला ढाक्यातील बंगाली बुद्धिजीवींवर होणारा शेवटचा हल्ला रोखण्यासाठी भारतीय पॅराट्रूपर्सनी टांगेल येथे धाडसी पॅराड्रॉप केला. या कारवाईने पाकिस्तानी सेनेचे मनोबल पूर्णतः खचले. 16 डिसेंबर रोजी ढाक्यात लेफ्टनंट जनरल अरोरा आणि लेफ्टनंट जनरल नियाझी यांच्यात झालेल्या शरणागती सोहळ्याने युद्धाचा शेवट झाला. 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी हत्यारे खाली ठेवली आणि बांगला देश स्वतंत्र झाला. या विजयात भारतीय वायुदल आणि नौदलाची भूमिकाही महत्त्वाची होती. ‘आयएनएस विक्रांत’च्या नेतृत्वाखाली नौदलाने बंदरे उद्ध्वस्त केली, तर वायुदलाने अचूक हल्ल्यांतून शत्रूची हवाई क्षमता संपवली.
अमेरिका आणि बि—टनचा विरोध असतानाही सोव्हिएत संघ भारताच्या पाठीशी ठाम उभा राहिला. युद्धानंतर शिमला करार झाला; मात्र त्यातून अपेक्षित राजकीय लाभ भारताला मिळाले नाहीत. तरीही 1971 चा विजय भारतीय लष्करी इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला अध्याय आहे. इंदिरा गांधींसारखे धाडसी राजकीय नेतृत्व आणि सॅम माणेकशॉसारखा निर्भीड, व्यावसायिक लष्करप्रमुख यांचा संगम पुन्हा होणे दुर्मीळच. म्हणूनच 1971 चा विजय केवळ युद्ध जिंकण्याची कथा नसून नेतृत्व, संयम आणि अचूक निर्णय क्षमतेचा आदर्श ठरतो.