

ज्या देशाचा जन्मच मुळी भारताच्या बळावर झाला आहे, त्या देशाने भारताच्या विरोधात कारवाया करणे संतापजनकच मानावे लागेल. भारताच्या 1947 मध्ये झालेल्या फाळणीमधून भौगोलिकद़ृष्ट्या एकसंध नसलेले पूर्व पंजाब आणि पूर्व बंगाल हे अविभक्त भारताचे भाग मिळून पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाले होते. हे दोन्ही प्रदेश मुस्लीमबहुल असले, तरी भाषा आणि जीवनशैलीमध्ये त्यांच्यात भिन्नता होती. पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधीशांनी पूर्व पाकिस्तानी लोकांवर, म्हणजेच तेथील बांगला भाषकांवर सातत्याने अन्याय केला. पूर्व पाकिस्तानातील लोकांची मातृभाषा असलेल्या बंगाली भाषेलाही डावलले. लष्कराने तेथील बांगला भाषकांवर प्रचंड अत्याचार सुरू केले. त्यानंतर तेथून भारतामध्ये निर्वासित येऊ लागले. भारतातील निर्वासित छावण्यांमधील पूर्व पाकिस्तानी नागरिकांनी सशस्त्र संघर्षासाठी बांगला देशमुक्ती वाहिनी स्थापन करून, प्रशिक्षण केंद्रे उभी केली. या केंद्रांना भारतीय सैन्याने सहकार्य केले. यामधून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊन, शेवटी पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. त्यावेळी भारतीय लष्कराने मुक्ती वाहिनीला साथ देऊन ढाका काबीज केले होते. दि. 16 डिसेंबर 1971 रोजी युद्धबंदीची घोषणा झाली आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन, बांगला देश हे नवे राष्ट्र अस्तित्वात आले.
बांगला देशात ज्या ज्या वेळी लष्करशहांचे किंवा बेगम खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले, तेव्हा त्यांनी भारतविरोधी पवित्रा घेतला. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत म्हणजेच अवामी लीगचे सरकार असताना मात्र भारत आणि बांगला देश यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. गतवर्षी सरकारविरोधी आंदोलन पेटल्याने शेख हसीना यांना पदत्याग करून भारताच्या आश्रयास यावे लागले. अवामी लीग हा पक्ष भारताशी मैत्री करणारा असल्यामुळे तो पक्ष संपवावा, हे बांगला देशातील सत्ताधीशांचे धोरण आहे. त्यात अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची पाकिस्तानचे जॉईंट चिफ ऑफ स्टाफ कमिटीप्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी अलीकडेच ढाका येथे भेट घेतली. या भेटीच्या वेळी युनूस यांच्याकडून पाकिस्तानला एक नकाशा सोपवण्यात आला. त्यात भारताच्या पूर्वेकडील राज्ये बांगला देशचा भाग असल्याचे दाखवलेले आहे.
या नकाशात आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्यांचा समावेश आहे. वास्तविक, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध विकोपाला गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला भारताने गुडघे टेकायला लावले, तरीदेखील पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सातत्याने भारतविरोधी विष ओकत असतात. ज्या पाकिस्तानच्या अत्याचारांपासून बांगलावासीयांना भारताने वाचवले, त्याच देशाचे हंगामी सत्ताधीश युनूस आज भारतातील काही राज्ये बांगला देशचा अविभाज्य भाग असल्याचे दाखवू पाहत आहेत, याला काय म्हणायचे? गेल्या काही काळापासून युनूस हे सातत्याने ईशान्येकडील राज्यांचा उल्लेख करत आहेत. एप्रिलमध्ये चीनच्या दौर्यावर असताना त्यांनी ईशान्येकडील ही राज्ये समुद्रापासून दूर आहेत. त्यांच्याजवळ समुद्राकडे पोहोचण्याचा मार्ग नाही. या भागात आम्ही इथल्या समुद्राचे संरक्षक आहोत. त्यातून मोठ्या संधी उपलब्ध होऊन चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो, असे उद्गार काढून भारताला जाणीवपूर्वक डिवचले होते. आता मिर्झा यांनीही पाकिस्तानला बांगला देशशी संबंध मजबूत करण्याची इच्छा आहे. उभय देशांतील गुंतवणूक, व्यापार वाढला पाहिजे. तसेच संरक्षणात उभयपक्षी सहकार्य वाढले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एकप्रकारे भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा हा कट आहे.
दुसरीकडे कुख्यात दहशतवादी आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिझ सईद बांगला देशात वेगाने हातपाय पसरत आहे. हाफिझचा निकटवर्तीय मौलाना इब्तिसाम इलाही झहीर हा 25 ऑक्टोबरला ढाका येथे पोहोचला. त्याचा दौरा इस्लामशी निगडित असल्याचे दाखवले जात असले, तरी ईशान्य भारतात काहीतरी कारस्थान रचण्याचा त्याचा डाव असल्याचे संकेत मिळत आहेत. शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर झहीर याचा हा बांगला देशचा दुसरा दौरा आहे. झहीर याने यापूर्वी अनेकदा मुस्लीमेतरांविरोधात हिंसाचाराची भाषा केली आहे. त्याचप्रमाणे भारतात मोस्ट वाँटेड असलेला इस्लामी धर्मगुरू झाकिर नाईक याच्यासाठी बांगला देशात पायघड्या घालण्यात आल्या आहेत. त्याला एक महिन्यासाठी बांगला देशात राहण्याची परवानगी देण्यात आली असून, त्या काळात तो बांगला देशातील विविध भागांत धार्मिक प्रचार करणार आहे. वास्तविक, जुलै 2016 मध्ये ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवरील हल्ल्यानंतर झाकिरच्या पीस टीव्ही चॅनेलवर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बंदी घातली होती. या हल्ल्यानंतर काही तासांतच झाकिर भारतातून पळून गेला होता. एनआयएने झाकिरविरुद्ध द्वेष पसरवणे आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. 2016 पासून तो मलेशियात राहत असून, त्याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती भारताने केली आहे; परंतु मलेशियाने त्यास नकार दिला आहे.
गेल्यावर्षी बांगला देशात झालेल्या सत्तांतरानंतर तेथे हिंदूंवरील अत्याचार वाढतच गेले. आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर असंतोष निर्माण झाला. काही हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली आणि हिंदू नागरिकांवर हल्ले करण्यात आले. हल्ल्यानंतर त्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली; मात्र यासंबंधीची वृत्ते अतिरंजित असल्याचा दावा युनूस यांनी केला होता. वास्तविक, गेल्यावर्षी बांगला देशातील 64 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्य समुदायांवर हल्ले झाले आणि त्यात हिंदूंचा समावेश प्रामुख्याने होता. 2021 मध्ये दुर्गापूजेच्या मंडपात झालेल्या हल्ल्यानंतर अनेक हिंदू मंदिरे व घरांची नासधूस झाली होती; परंतु त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेख हसीना यांनी उचललेल्या पावलांवर आपला विश्वास आहे, असे भारत सरकारने म्हटले होते. आज मात्र युनूस हे बांगला देशातील हिंदूंचे व त्यांच्या देवस्थानांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. युनूस हे नोबेलविजेते अर्थशास्त्रज्ञ असले, तरी आज ते शांततावादी असलेल्या भारताच्या विरोधात छुपा अजेंडा चालवत आहेत. त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे.