बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा निर्णायक वळणावर; पाकिस्तानचे तुकडे अटळ

Balochistan vs Pakistan
बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा निर्णायक वळणावर; पाकिस्तानचे तुकडे अटळpudhari photo
Published on
Updated on
सुरेश पवार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्याबरोबरच बलोच लिबरेशन आर्मीने आपला स्वातंत्र लढा आणखी आक्रमक केला आहे. या लढ्याची परिणिती पाकिस्तानचे आणखी तुकडे पडण्यास होईल, अशीच चिन्हे दिसत आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकतेच मिनी वॉर झाले. त्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. पाकला ‘दे माय धरणी ठाय’ झाले. आणखी काही काळ हा संघर्ष सुरू राहिला असता, तर बेबंदशाही निर्माण झालेल्या पाकिस्तानात यादवी उद्भवली असती. त्यामुळेच पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अमेरिका, सौदी अरेबियाच्या नाकदुर्‍या काढून मध्यस्थी आणि शस्त्रसंधीसाठी गुडघे टेकले. एकीकडे हा संघर्ष चालू असतानाच बलोच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केलेच; पण एका दिवसात 39 ठिकाणी हल्ले चढवून पाकिस्तानी लष्कराला सळो की पळो केले. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष बलोच लिबरेशन आर्मीच्या पथ्यावरच पडला असून, त्याने या स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण आणि बळ प्राप्त झाले आहे.

पाकिस्तानच्या निर्मितीवेळी बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रांत होता आणि तत्कालीन बलुची नेत्यांची बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा अशीच इच्छा होती. तथापि, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ती दडपून टाकली आणि 1948 पासून बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा सुरू आहे. हा लढा चिरडण्याचे शेकडो प्रयत्न पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कराने केले. तथापि, त्याला यश आले नाही आणि आता हा लढा निर्णायक वळणावर आला आहे. बलोच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणाच केली आहे आणि एक तृतीयांश बलुचिस्तान आपल्या कब्जात घेतला आहे. या वादळी लढ्याने पाकिस्तानचे आणखी तुकडे होणार, हे आता अटळ भवितव्य आहे.

2016 सालच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानमधील लढ्याचा उल्लेख केला होता. मोदी यांच्या विधानाने पाकचा तिळपापड उडाला. तथापि, काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या ज्या फुटीरवादी कारवाया चालतात, त्यांना मोदी यांच्या विधानाने चपराकच बसली आहे. मोदी यांच्या विधानाने बलुचिस्तानचा प्रश्न जागतिक व्यासपीठावर आला.

पाऊण शतकांचा लढा

फाळणीपूर्वी बलुचिस्तान भारताचाच भाग होता. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले, तेव्हाच बलुचिस्तानमध्ये 12 ऑगस्ट 1947 रोजी अहमदयार खान याने बलुचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केले. तेव्हाच्या संस्थान खात्याचे मंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे कलात संस्थानच्या नवाबने स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. बलुचिस्तान पाकिस्तानात गेला. मेजर जनरल अकबरखान याने 1948 च्या मार्च महिन्यात स्वातंत्र्याची ही चिंगारी लष्करी बळावर चिरडून टाकली. तथापि, लढवय्या बलुचींच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझली नाही.

स्वातंत्र्य लढा चिरडला

1958-59, 1962-63, 1973-74 या काळात हा संघर्ष अतिशय तीव्र झाला होता. बलुची स्वातंत्र्यवादी आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात सातत्याने चकमकी होत होत्या. 1973 मध्ये भुत्तो यांची राजवट होती. त्यांनी अमानुषपणे लष्करी कायद्याचा अंमल जारी केला. त्यात नऊ हजार बलुचींचे शिरकाण करण्यात आले.

खनिज संपत्तीची तूट

बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. कोळसा, गंधक, तांबे, जिप्सम, बॉक्साईट यांसह नैसर्गिक वायूचे विपुल साठे आहेत. या सार्‍या खनिज संपत्तीची प्रामुख्याने पंजाबी व इतरांकडून लूट होते. बलुचिस्तानला काही लाभ मिळत नाही, हा बलुचींचा दावा आहे. त्यात तथ्य आहेच. स्वातंत्र्य मिळावे, या मागणीमागे आपल्या हक्काचे हिरावून घेतले जाते, हीदेखील बलुचींची तीव्र भावना आहे. स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आपला लढा आहे, हा बलुचींचा दृढ विश्वास आहे.

सोयी-सुविधांचा अभाव आणि कमालीचे दारिद्य्र

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत. तो पाकिस्तानच्या नैर्ऋत्य भागात आहे. पश्चिमेला इराण, उत्तरेला अफगाणिस्तान आणि दक्षिणेला अरबी समुद्र या प्रांताच्या सीमा. या प्रांताचे सामरिक स्थान महत्त्वाचे आहे. पाकिस्तानातील 46 टक्के भूभाग या प्रांताने व्यापलेला असला, तरी इथली लोकसंख्या मात्र इतर प्रांतांच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे अवघी सहा टक्के एवढीच आहे. क्वेट्टाचा थोडाफार अपवाद वगळता इथे कसल्याही सोयी-सुविधा अपवादानेच आहेत आणि 70 टक्के बलुची जनता ही दारिद्य्ररेषेखाली आहे. ही विदारक स्थिती राज्यकर्त्यांचे शोषण आणि उपेक्षा व दुर्लक्ष यातून निर्माण झाली आहे.

बलुची नेत्याची अमानुष हत्या

बुग्ती, मरी आणि मेंगल या बलुचींच्या तीन प्रमुख जमाती. बुग्ती जमातीचे नवाब अकबरखान बुग्ती हे बलुचिस्तानचे दीर्घकाळ राज्यपाल आणि मुख्यमंत्री होते. ते या लढ्यात आघाडीवर होते. 79 वर्षांच्या नवाब बुग्ती यांनी 2006 च्या ऑगस्ट महिन्यात वाटाघाटीची तयारी दाखवली होती. तथापि, पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर दगाबाजीने हल्ला केला. त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. नवाब बुग्ती मृत्युमुखी पडले. नंतर लष्कराने कांगावा केला की, दरड कोसळल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. लष्कराच्या खुलाशावर कोणी विश्वास ठेवला नाही. त्यांचा नातू ब्रह्मदाग बुग्ती याने स्वित्झर्लंडमधून हा लढा पुढे नेला.

आयएसआयची कारस्थाने

2009 मध्ये स्वातंत्र्यवाद्यांविरोधात लष्कराने मोठी मोहीम उघडली. गुलाब महमद लालामुनिर, शेर महम्मद अशा नेत्यांसह अनेकांचा पाशवी छळ झाला. अनेकांचा मृत्यू झाला. लष्कराबरोबर पाकिस्तानची कुविख्यात आयएसआय ही गुप्तहेर यंत्रणा बलुचींच्या मागे हात धुऊन लागली आहे; तर काही कट्टर धर्मांध दहशतवादी संघटनाही बलुचिस्तानात थैमान घालत आहेत. अर्थात, या संघटनांमागे आयएसआयचा हात आहे, हे उघडच आहे. बलुचिस्तानात लिबरेशन आर्मी आणि युनायटेड बलुचिस्तान आर्मी या दोन स्वातंत्र्यवाद्यांच्या लढाऊ संघटना. सुमारे पंधरा हजारांहून अधिक लोक या लढाऊ संघटनांत आहेत आणि लष्कर, गुप्तहेर संघटना व दहशतवादी यांच्या कारवाया उधळून टाकत आहेत.

मध्यमवर्ग लढ्यात

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीच्या लढ्यात आतापर्यंत अल्पशिक्षित पारंपरिक टोळीवाले लोकांचा प्रामुख्याने समावेश होता. गेल्या 20-25 वर्षांत शिक्षण घेतलेली सुशिक्षित पिढी पुढे आली. नोकरी-व्यवसायात उतरली. बलुचिस्तानात नवा मध्यमवर्ग तयार झाला. आता हा मध्यमवर्ग स्वातंत्र्याच्या मागणीत आघाडीवर आहे. बलुचिस्तानच्या लढ्यात हा महत्त्वाचा बदल झाला आहे. त्याला नवे परिमाण लाभले आहे.

बलोच लिबरेशन आर्मीचे सरकारपुढे कडवे आव्हान

बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. गेल्या चार-साडेचार महिन्यांत या आर्मीच्या घणाघातात पाक लष्कराची दाणादाण उडाली आहे. परिणामी, बलुचिस्तानातील पाकिस्तानी लष्करातील बाराशेहून अधिक सैनिक आणि अधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. अनेक सैनिक सरळ पळून गेले आहेत. 4 जानेवारी ते 7 मे 2025 एवढ्या काळात आर्मीच्या हल्ल्यात 369 सैनिक ठार झाले. यावरून या आर्मीची ताकद लक्षात येते. 12 मार्चला या आर्मीने क्वेट्टा-पेशावर रेल्वेच हायजॅक केली. त्यावेळी उद्भवलेल्या संघर्षात 200 सैनिक मृत्युमुखी पडले, तर चारच दिवसांनी एका बसवर हल्ला होऊन 90 सैनिक ठार झाले.

एक तृतीयांश प्रांतावर ताबा

बलोच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर संपूर्ण ताबा मिळवला आहे. मंगोचर, कलात, तुर्बत अशी महत्त्वाची शहरे त्यांच्या कब्जात आहेत; तर क्वेट्टा-कराची या महामार्गासह तीस महामार्ग बलोच लिबरेशन आर्मीच्या निगराणीखाली आहेत. 10 मे 2025 रोजी आर्मीने एकाच दिवसात पाकिस्तानी लष्कर व सुरक्षा दलावर 39 ठिकाणी हल्ले केले, यावरून त्यांची आव्हान देण्याची शक्ती किती वाढली आहे, हे सहजच लक्षात येते.

स्वातंत्र्याची घोषणा

9 मे 2025 रोजी आर्मीने बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणाच करून टाकली. या त्यांच्या घोषणेवरून आर्मीचा वाढता आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या द़ृढ संकल्पावर असलेला त्यांचा विश्वासही लक्षात येतो.

बांगला देशच्या दिशेने

बलुचीचा हा स्वातंत्र्य लढा म्हणजे पाकिस्तानातील यादवी, एवढ्यापुरताच मर्यादित राहण्याची शक्यता दिसत नाही. बलुची जनतेत फार जाती-पातींचे प्रस्थ नाही. समाज बहुतांशी एकसंध आहे. त्यामुळे सारी बलुची जनता या लढ्यामध्ये एकमुखाने उभी असल्याचे दिसते. अन्यथा आर्मीला लष्कराविरोधात एवढे यश मिळाले नसते. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांनी बांगला देशी जनतेवर अमानुष अत्याचार केले. त्यांचे हक्क डावलले तेव्हा बांगला देशात स्वातंत्र्याची मशाल पेटली. तीच परिस्थिती आता बलुचिस्तानात निर्माण झाली आहे आणि बलुचिस्तान आता बांगला देशाच्या मार्गानेच निघाला आहे.

द्विराष्ट्रवादाचा पराभव आणि पाकचे तुकडे होणे अटळ

महम्मद अली जिना यांनी भारतात हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत, असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली. तथापि, धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानची 24 वर्षांतच शकले झाली. बांगला देश स्वतंत्र झाला. बलुचिस्तान आणि सिंध हे प्रांत मुस्लिम लोकसंख्या म्हणून पाकिस्तानात समाविष्ट झाले. पण, धर्म समान असला, तरी या दोन प्रांतांची संस्कृती आणि अस्मिता पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे बांगला देश निर्मितीवेळी जसा द्विराष्ट्रवादाचा पराभव झाला, तसा पुन्हा झाला, तर आश्चर्य वाटायला नको.

चिनी प्रकल्प पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या मुळावर

‘सीपीईसी’ म्हणजे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर अर्थात चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि ग्वादर बंदराचा विकास हे दोन मुद्देही बलुचिस्तानमधील असंतोषात भर घालणारे ठरत आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा सिझयांग या चीनच्या प्रांतातील काशगर येथून सुरू होतो. तो खुंजरबपास, पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट, बाल्टिस्तान, इस्लामाबाद, मुलतान, नवाबशाह, कराची आणि ग्वादर या मार्गाने बलुचिस्तानातील ग्वादर बंदरापर्यंत पोहोचतो. 2,442 किलोमीटरचा हा मार्ग आहे.

2013 मध्ये या प्रकल्पाची बोलणी झाली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2015 मध्ये पाकिस्तानला भेट दिली व त्यावेळी हा करार झाला. 100 ते 200 कोटी डॉलर्स असा या प्रकल्पाच्या खर्चाचा प्राथमिक अंदाज होता. तो आता 600 कोटी डॉलर्स अर्थात सव्वाचार लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे आणि पाकिस्तानवर दिवाळखोर व्हायची वेळ आली आहे. याबरोबर चिनी कंपन्यांनी ग्वादर बंदर विकासाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी 25 ते 30 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 1,800 कोटी रुपये एवढा खर्च होत आहे. बंदर उभारणार्‍या चिनी कंपन्यांना 40 वर्षे करमाफी देण्यात आली आहे. हा महामार्ग आणि ग्वादर बंदराचा विकास पूर्ण झाला, की चीनला व्यापाराला फार मोठा वाव मिळणार आहे.

इराण, अफगाणिस्तान त्याबरोबर मध्य आशियातील ताजिकिस्तान, कझाकिस्तान, उजबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान त्याशिवाय रशियातील काही भागांशी चीनचा थेट व्यापार सुरू होणार आहे. युरोपबरोबरही चीनचा व्यापार वाढू शकतो. आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने चीनने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, त्यामध्ये पाकिस्तानचे आर्थिक शोषण होणार आहे. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल आदी देशांनी अठराव्या-एकोणिसाव्या शतकात अनेक देशांत आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि त्यांची साधनसंपत्ती अक्षरश: लुटली. एकविसाव्या शतकात चीनचा पाकिस्तानात हाच शहाजोग उद्योग सुरू आहे.

चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बलुचिस्तानच्या मुळावर आला आहे आणि त्यामुळे बलुचिस्तानमध्ये आधीच असलेल्या असंतोषात तेल ओतले गेले आहे. ग्वादर बंदर उभारणीसाठी आलेल्या तीन चिनी इंजिनिअर्सची हत्या करण्यात आली. बलुचिस्तानप्रमाणे सिंध प्रांतातही तीव्र संताप आहे. ‘सीपीईसी’ सुरू झाल्यावर कराचीच्या शेअर बाजारात स्फोट घडवून आणण्यात आला. सिंधमधील संतापाचाच तो स्फोट म्हटला पाहिजे.

बलुचिस्तान आणि बलुची

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अवशेष येथे आढळले आहेत. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली, त्यावेळी अनेक छोट्या नगरराज्यांनी त्याला निकराने प्रतिकार केला. त्यापैकी किरात हे एक नगरराज्य होते. हे किरात राज्य म्हणजे आताचे बलुचिस्तानातील भूतपूर्व संस्थान कलात! अलेक्झांडर मायदेशी परतला, तो बलुचिस्तानमार्गे. बौद्ध वाङ्मयात बलुचींचा बलोक्ष असा उल्लेख आहे. ऋग्वेद काळात भलात जमातीचा उल्लेख आहे. ती म्हणजे बलुची जमात, असे संशोधकांचे मत आहे. बलुचिस्तानात हिंग्लाज, हिंगुला मातेचे प्राचीन मंदिर आहे. कलात येथे कालीमाता मंदिर आहे. फाळणीवेळी बलुचिस्तानात साठ हजारांवर हिंदू होते. ते आता काही शेकडा आहेत. हिंग्लाज मातेच्या दर्शनासाठी भारतातून कच्छी, मारवाडी आदी जातात. 1761 मध्ये पानिपत महासंग्रामात अब्दालीकडे बलुची पथके होती. या पथकांनी अनेक मराठा सैनिक कैदी म्हणून नेले. या लोकांनी बलुचिस्तानातील शेती सुधारली. शाहू किंवा साहू मराठा म्हणून या मराठा समूहाला ओळखले जाते. हा उच्च वर्ग आहे. दुसरा मराठ्यांचा कष्टकरी वर्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news