

कुराण म्हणते, ‘एका निष्पापाची हकनाक हत्या करणे म्हणजे सर्व मानव जातीची हत्या होय आणि एखाद्या निष्पापाचा जीव वाचवणे म्हणजे सार्या मानवजातीसच वाचविणे होय’(कुराण 5:32); परंतु पहलगामध्ये दहशतवाद्यांनी अतिशय क्रूर व अमानुषपणे निष्पापांचा बळी घेतला. हा हल्ला म्हणजे धर्माच्या नावावर अधर्मी हिंसाचार होता. देशाच्या एकता, अखंडता आणि विशेषतः देश बांधवांच्या सामाजिक ऐक्य व सौहार्द यावर मोठा आघात होता. आज बकरी ईद आहे, त्यानिमित्ताने..!
आपला देश व देशबांधवात अराजक, अधर्म व यादवी पसरवण्याचा कुटिल व नापाकी डाव दहशतवाद्यांचा होता. यात बळी पडलेल्या निष्पापांच्या त्याग व बलिदानाला तर शब्दच नाहीत; परंतु याप्रसंगी संपूर्ण देशबांधवांनी ज्या धैर्याने, संयमाने आणि संवेदनशीलतेने तोंड दिले त्याला तोड नाही. या प्रसंगात आणि त्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशातील सर्वच समाज घटकांनी देशाप्रती दाखवलेल्या निष्ठा, प्रेम आणि समर्पण अभूतपूर्व व गौरवपूर्ण आहे. देश आणि देशबांधवाप्रती त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाचा असाच एक वारसा प्रेषित हजरत इब्राहिम (अ.) यांच्या रूपाने आपल्यासमोर येतो. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी मानवता आणि मानव कल्याणासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. हा तेजस्वी तारा आजही तेजाने चमकतो आहे.
मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व सन्मान आजही आपण त्यांच्या स्मरणार्थ करत असलेल्या ईद-उल-अजहा अर्थात ईद-ए-कुर्बान किंवा बकरी ईद साजरी करून करत आहोत. त्यांच्या काळातील नमरुदच्या अन्याय, अत्याचारी, जुलमी व अमानुष राजवटी विरोधात त्यांनी जो जीवघेणा संघर्ष केला तो केवळ अद्भुत होय. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि राजकीय गुलामीच्या बेड्यात सामान्य जनता इतकी जखडून गेली होती की, त्यांना स्वतःचे हित-अहितसुद्धा समजत नव्हते. मानवतेविरुद्धच्या या संघर्षात हजरत इब्राहिम (अ.) यांचे आप्तस्वकीय, नातेवाईक आणि स्वजनसुद्धा त्यांचे विरोधात उभे राहिले. जीवघेण्या संघर्षाला त्यांनी तोंड दिले. एकमेवाद्वितीय परमेश्वर व मानवतेसाठीचा हा संघर्ष अद्वितीय म्हणावा लागेल. त्यांच्या परमेश्वराची सत्य, न्याय आणि नैतिकता ही मूलतत्त्वे आणि मानवता हा मुलाधार होता.
लोकांचे हित आणि समाजकल्याण याबरोबरच सामाजिक ऐक्य, समता, बंधुता व शांततापूर्ण सहजीवन हाच धर्माचरणाचा पाया होता. हजरत इब्राहिम (अ.) हे खर्याअर्थाने मानवतेच्या संस्कृतीचा पाया घालणारे मूळ पुरुष होते. त्यांनी आपली दोन्ही मुले हजरत इस्माईल (अ.) व हजरत इसाक (अ.) यांना मानवतेच्या मार्गात समर्पित केले. एकेश्वर व मानवतेसाठी केलेल्या अपूर्व व अद्वितीय कार्यासाठी हजरत इब्राहिम (अ.) व त्यांच्या दोन्ही मुलांना प्रेषित्व प्राप्त झाले. इस्लामच्या या मानवतावादी प्रतिष्ठापनेच्या चळवळीमध्ये आजपर्यंत अनेक प्रेषित, संत, महात्मे व महापुरुषांनी आपले जीवन अर्पण केले आहे. या सर्वांचा जीवनसंघर्ष म्हणजे आपल्यासमोर मानवतेप्रति त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाचे आदर्श व उदाहरण आहे. या सर्वांचे स्मरण व्हावे, त्यातून स्फूर्ती व प्रेरणा घ्यावी आणि देश, समाज व देश बांधवांच्या कल्याणासाठी आपले सर्वस्वी जीवन झोकून द्यावे हेच आजच्या ईदचे औचित्य व महिमा होय. सध्या समाजात सर्वत्र अविश्वासाचे आणि अशांततेचे वातावरण पसरले आहे.
सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. एकमेकांकडे द्वेषपूर्ण भावनेने पाहिले जात आहे; पण यातून काहीच साध्य होत नाही. माणसाच्या नशिबी केवळ दुःखच येत आहे. हे सर्व टाळायचे असेल, तर समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहण्याची गरज आहे. त्यासाठी आता सर्वांनीच एकत्र येऊन सामाजिक ऐक्य टिकवण्याची गरज आहे.