

आशिष शिंदे
नदी, नाल्यांमधून वाहणारे पाणी नळापर्यंत पोहोचताना वाटेत कित्येक घातक रसायने, शिसे, कीटकनाशके आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म प्लास्टिकचे कण सोबत घेऊन येते. म्हणूनच प्रत्येकाला घरात शुद्ध आणि आरोग्यासाठी पाणी हवे असते. याच गरजेतून आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये नव्या प्रगत तंत्रज्ञानाची नांदी झाली असून पाण्यातील विषारी घटक गाळून नैसर्गिक खनिजे अबाधित ठेवणारा ‘इंटेलिजंट काऊंटरटॉप वॉटर प्युरिफायर’ अवतरला आहे. कोणत्याही नळाच्या किचकट प्लंबिंगविना थेट ओट्यावर कार्यरत होणारे हे कॉम्पॅक्ट गॅजेट आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या ‘फॉरेव्हर केमिकल्स’ सह तब्बल ८० हून अधिक घातक घटकांचा ९९ टक्के नायनाट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाण्याचा नैसर्गिक गोडवा आणि ताजेपणा देणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारखे उपयुक्त क्षार जसेच्या तसे राखून, हे स्मार्ट उपकरण नेहमीपेक्षा ६ पट वेगाने मिनरलयुक्त शुद्ध पाणी थेट ग्लासात उपलब्ध करून देते.
यात प्रगत ‘मटेरिअल सायन्स आणि स्मार्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ची ताकद वापरण्यात आली आहे. प्रत्यक्षात यात अतिशय सूक्ष्म छिद्रे असलेला उच्च दर्जाचा ॲक्टिव्हेटेड कार्बन ब्लॉक आणि अंतर्गत प्रेशर मेकॅनिझम बसवले आहेत. जे रसायने व जड धातूंना भौतिकरीत्या अडवून उपयुक्त खनिजांना पुढे जाऊ देते. सोबतच, पाण्याचा वापर मोजून फिल्टर संपत आल्याचा अचूक इशारा देणारे डिजिटल फ्लो सेन्सर्स यात दिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रत्यक्ष भौतिकशास्त्र आणि रासायनिक गाळण तंत्रज्ञानाचा अचूक ताळमेळ साधून माणसाला शुद्ध पाणी देणारा हा एक ‘अल्ट्रा स्मार्ट’ वैज्ञानिक आविष्कार आहे.
या नव्या तंत्रज्ञान उपकरणाचे सर्वात मोठे यश दडले आहे ते शुद्धीकरण आणि नैसर्गिक चवीच्या अद्भुत समतोलात. पाणी पूर्णपणे मृत न करता, त्यामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे उपयुक्त इलेक्ट्रोलाईटस् हे फिल्टर अगदी जसेच्या तसे जपून ठेवते. पाण्यातील विषारी घटक १०० टक्के रोखूनही पाण्याचा मूळ गोडवा आणि ताजेपणा कायम राखण्याची किमया या तंत्रज्ञानाने साधली आहे. हे स्मार्ट उपकरण केवळ पाणी स्वच्छ करत नाही, तर वापरकर्त्याच्या गरजेनुसार पाणी भरण्याचा संपूर्ण अनुभवच स्वयंचलित आणि सोपा बनवते. यातील प्रगत ‘प्रिसिजन प्रेशर’ तंत्रज्ञानामुळे पाणी इतर नेहमीच्या उपकरणांपेक्षा तब्बल सहा पट वेगाने बाहेर पडते. ज्यामुळे पिण्यासोबतच स्वयंपाक, चहा, कॉफी किंवा पाण्याच्या बाटल्या क्षणात भरता येतात.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यात ‘कस्टम पोअर’ सेटिंग्ज आहेत. म्हणजे ग्लास, कप किंवा बाटलीनुसार हवे तेवढेच पाणी सेट करून तुम्ही बाजूला होऊ शकता, तेवढेच पाणी भरून यंत्र आपोआप थांबते. तसेच बर्फाचे ट्रे भरताना पाणी सांडू नये म्हणून यात विशेष ‘स्लो पोअर’चाही पर्याय आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात बसवलेली सेन्सर मॉनिटरिंग सिस्टीम रोजच्या पाण्याच्या वापराचा प्रत्यक्ष हिशेब ठेवून फिल्टरचे आयुष्य कधी संपणार आहे. याची अचूक सूचना स्क्रीनवर आधीच देते. यामुळे फिल्टर बदलण्याचा अंदाजे खेळ कायमचा संपून कुटुंबाला अखंडितपणे १०० टक्के सुरक्षित पाणी मिळत राहते. जागतिक बाजारपेठेत या इंटेलिजंट प्युरिफायरची किंमत भारतीय चलनात अंदाजे २० ते २५ हजार रुपये आहे. सध्या हा प्युरिफायर परदेशात उपलब्ध असून लवकरच तो भारतात देखील उपलब्ध होईल.