Senior Citizens Day Special | निवृत्ती नव्हे, नव्या पर्वाची सुरुवात!

Senior Citizens Day Special |
Senior Citizens Day Special | निवृत्ती नव्हे, नव्या पर्वाची सुरुवात!
Published on
Updated on

डॉ. दीपक शिकारपूर

२१ ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. १९८८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हा दिवस घोषित केला. या दिवसाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करणे हा आहे.

ज्येष्ठ नागरिक दिवस केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या आरोग्याची काळजी किंवा त्यांच्या सुरक्षिततेची आठवण करून देणारा दिवस नाही. हा दिवस समाजाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, वय वाढले म्हणून माणसाची उपयुक्तता कमी होते का? निश्चितच नाही. उलट अनुभव, ज्ञान, संयम, निर्णयक्षमता आणि जीवनाचा व्यापक दृष्टिकोन यामुळे ज्येष्ठ नागरिक समाजाची मोठी ताकद ठरू शकतात. आज आयुर्मान वाढले. वैद्यकीय सुविधा सुधारल्या, जीवनशैलीत बदल झाले. अनेक व्यक्ती साठीनंतरही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्रिय राहू शकतात. त्यामुळे पारंपरिक अर्थाने ‘निवृत्ती’ ही संकल्पना नव्याने पाहण्याची वेळ आली आहे. नोकरीतून निवृत्त होता येऊ शकते; पण ज्ञानातून, अनुभवातून आणि समाजासाठी योगदान देण्यापासून निवृत्ती का घ्यावी? आजच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे संतुलित आणि उत्पादक जीवन. आरोग्य, कुटुंब, आर्थिक स्थैर्य, सामाजिक संबंध, छंद आणि समाजासाठी योगदान यांचा योग्य समतोल साधणे आवश्यक आहे. केवळ आराम करणे म्हणजे आनंदी जीवन नव्हे. शरीराला हालचाल आणि मनाला सतत नवे आव्हान मिळाले, तर जीवन अधिक अर्थपूर्ण होते.

तंत्रज्ञानाने ज्येष्ठ नागरिकांसमोर संधींचे एक नवे जग उघडले आहे. पूर्वी संगणक, मोबाईल किंवा इंटरनेट हे तरुणांचे क्षेत्र मानले जात होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल बँकिंग, ऑनलाईन शिक्षण, दूरस्थ काम, समाजमाध्यमे आणि आरोग्यविषयक डिजिटल साधने यांचा वापर ज्येष्ठ नागरिकही सहज करू शकतात. योग्य प्रशिक्षण मिळाले, तर वय हा तंत्रज्ञान स्वीकारण्यातील अडथळा राहत नाही. विशेषतः, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्येष्ठांसाठी मोठी मदत ठरू शकते. माहिती शोधणे, लेखन करणे, भाषांतर करणे, नवीन विषय समजून घेणे, जुन्या आठवणींचे दस्तऐवजीकरण करणे, व्याख्याने किंवा लेख तयार करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अशा अनेक कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करता येतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे सक्रिय सहभागी होऊ शकतात. ज्येष्ठांनी डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. स्मार्टफोन, संगणक, ई-मेल, व्हिडीओ बैठक, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर यांचे ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाईन साधने आणि माहिती शोधण्याची कौशल्ये आत्मसात केल्यास नव्या संधींचे दरवाजे उघडू शकतात.

याचबरोबर व्यावसायिक सातत्य ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीने वयाच्या साठीनंतर पूर्णपणे काम थांबवले पाहिजे, असे आता आवश्यक नाही. कामाचे स्वरूप बदलता येते. पूर्णवेळ नोकरीऐवजी सल्लागार म्हणून काम करता येते. प्रशिक्षण देता येते, मार्गदर्शन करता येते, लेखन करता येते, अध्यापन करता येते, नवउद्योजकांना मदत करता येते किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता येतो.

ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभव असतो. व्यवस्थापन, उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, प्रशासन, कला, शेती, व्यापार किंवा सामाजिक क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रातील हा अनुभव पुढील पिढीसाठी अमूल्य असतो. आजच्या तरुणांकडे ऊर्जा आणि नवे तंत्रज्ञान आहे; ज्येष्ठांकडे अनुभव आणि शहाणपण आहे. या दोन्हींचा संगम झाला, तर समाजाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. संवादकौशल्य, मार्गदर्शन कौशल्य, नेतृत्व, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संघभावना ही कौशल्ये ज्येष्ठांच्या अनुभवाला मोठी ताकद देतात. अनेक वर्षांचा व्यावसायिक अनुभव तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरता येतो. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण आणि आधुनिक व्यवसाय पद्धतींची ओळख उपयुक्त ठरेल. स्वयंरोजगार किंवा स्टार्टअपच्या दृष्टीने विक्री, विपणन, आर्थिक नियोजन, ग्राहकांशी संवाद, प्रकल्प व्यवस्थापन आणि ऑनलाईन व्यवसाय यांची मूलभूत माहितीही आवश्यक आहे. नवीन कौशल्ये शिकण्याची तयारी हीच या दुसऱ्या इनिंगची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे.

आज ‘सेकंड इंनिंग’ ही कल्पना अधिक महत्त्वाची होत आहे. निवृत्तीनंतर एखाद्याने स्वतःला विचारावे, माझ्याकडे कोणते ज्ञान आहे? मी कोणाला शिकवू शकतो? कोणत्या समस्येवर मी मार्गदर्शन करू शकतो? माझ्या अनुभवाचा उपयोग समाजाला कसा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर निवृत्तीनंतरचे आयुष्य हे निष्क्रियतेचे नव्हे, तर नव्या संधींचे पर्व बनू शकते.

ज्येष्ठ नागरिकांनीही स्वतःला काळानुसार बदलणे आवश्यक आहे. ‘आमच्या काळी असे नव्हते,’ या मानसिकतेत अडकण्यापेक्षा ‘आजच्या काळात काय नवीन आहे?’ हा प्रश्न विचारणे अधिक उपयुक्त आहे. नवीन भाषा शिकणे, नवीन तंत्रज्ञान शिकणे, ऑनलाईन अभ्यासक्रम करणे, तरुणांशी संवाद साधणे, प्रवास करणे, लेखन करणे किंवा एखादा सामाजिक उपक्रम सुरू करणे, या सर्व गोष्टी मनाला तरुण ठेवतात. समाजानेही ज्येष्ठ नागरिकांकडे ‘अवलंबून असलेला वर्ग’ म्हणून पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम, तांत्रिकदृष्ट्या जागरूक आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहेत. त्यांच्यासाठी स्वयंसेवा, मार्गदर्शन, शिक्षण, उद्योजकता आणि ज्ञानवाटपाच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. विशेषतः, भारतासारख्या देशात ज्येष्ठ नागरिक हा मोठा मानवी भांडार आहे. त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर झाला, तर शिक्षण, कौशल्य विकास, ग्रामीण विकास, सामाजिक सेवा आणि उद्योजकता या क्षेत्रांना मोठी मदत मिळू शकते. निवृत्त शिक्षक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. निवृत्त अभियंते तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करू शकतात. अनुभवी व्यवस्थापक नव्या उद्योगांना सल्ला देऊ शकतात. लेखक आणि तज्ज्ञ आपले ज्ञान डिजिटल माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.

ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा दिवस न राहता त्यांच्या नव्या भूमिकेचा संकल्प करण्याचा दिवस व्हावा. निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; ती आयुष्याच्या दुसऱ्या आणि कदाचित अधिक अर्थपूर्ण पर्वाची सुरुवात असू शकते. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला ‘मी किती वर्षांचा आहे?’ यापेक्षा ‘आजही मी किती लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो? असे विचारायला हवे. ज्येष्ठ नागरिकांसाठी संदेश स्पष्ट आहे. वय हा आकडा आहे; उपयुक्तता ही वृत्ती आहे. शरीराला विश्रांती द्या; पण मनाला निवृत्त करू नका. अनुभव जतन करा; पण तो स्वतःपुरता ठेवू नका. तंत्रज्ञान स्वीकारा, तरुणांकडून शिका आणि तरुणांना तुमचा अनुभव द्या. मेंटॉरशिप प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनुभवी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण स्टार्टअप उद्योजकांना जोडता येईल. त्यामुळे ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची तंत्रज्ञानाची ऊर्जा एकत्र येऊन रोजगार, उद्योजकता आणि सामाजिक विकासाच्या नव्या संधी निर्माण करू शकतात.

logo
Pudhari News
pudhari.news