चोरांचीही सीसीटीव्हीवर नजर

atm-thieves-caught-on-cctv
चोरांचीही सीसीटीव्हीवर नजरPudhari File Photo
Published on
Updated on

पूर्वी चौफेर लक्ष ठेवण्यासाठी बुरूज बांधले जायचे. त्या बुरुजांवर 24 तास पहारे ठेवले जात असत. किल्ल्याच्या परिसरामध्ये बुरूज ही सर्वात उंच जागा असल्यामुळे इथे उभे असणार्‍या पहारेकर्‍याला संपूर्ण परिसर दिसत असे. आजकाल शेकडो मजली इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमन म्हणजेच रखवालदार असतात. इमारतीमध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची चौकशी करून मगच त्याला प्रवेश दिला जातो. त्या परिसरात काम करणार्‍या कामगारांनाही ओळखपत्र दिलेले असते. ते तपासूनच प्रवेश निश्चित केला जातो. काही सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप असतात. समजा, तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील आणि ते पाहुणे सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आले असतील तर त्यांचा फोटो फ्लॅट मालकाला पाठवला जातो आणि त्याने अ‍ॅप्रूव्ह केल्यानंतरच पाहुण्यांना प्रवेश दिला जातो. याशिवाय सर्वत्र 24 तास लक्ष ठेवणारे आणखी एक यंत्र नेहमीच्या वापरात आले आहे आणि ते म्हणजे सीसीटीव्ही.

कुणी जागे असो वा नसो, त्या कॅमेर्‍याच्या परिसरामध्ये येणार्‍या प्रत्येकाचे 24 तास 12 महिने शूटिंग सुरू असते. फार पूर्वी वन्य प्राण्यांची गणना करणे कठीण होते. पण आजकाल एकाच जंगलात शेकडो सीसीटीव्हीसारखे कॅमेरे झाडांवरती लावलेले असतात आणि कोणताही पक्षी, प्राणी, वन्य जीव त्यासमोरून गेला की, ते त्याचा फोटो काढत असतात. असे सगळे फोटो एकत्र करून मग वन्य जीवांची प्रगणना केली जाते.

ग्रामीण भागामध्ये चावडीवर बसलेले गावकरी हे एक प्रकारचे सीसीटीव्हीच असतात. हा चावडी नावाचा ओटा सहसा गावाच्या मध्यभागी असतो किंवा मारुती मंदिराच्या पारावर असतो. गावात कुणीही प्रवेश केला की, काय पाहुणे कुणाकडे? असे त्याला विचारले जाते. आलेला पाहुणा आपण अमुक तमुकचा सोयरा आहे, असं सांगतो आणि मग ती बातमी सर्वत्र पसरत असते.

सीसीटीव्ही हे ‘यत्र तत्र सर्वत्र’ असल्यामुळे दुकानांमध्ये होणार्‍या चोर्‍या थांबल्या आहेत हे निश्चित. मोठमोठ्या मॉलमध्ये जवळपास प्रत्येक एरिया सीसीटीव्हीवर कुठे ना कुठेतरी कव्हर केलेला असतो आणि हे सीसीटीव्ही पाहात राहणारे काही कर्मचारी कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवून असतात. तुम्ही सुरक्षिततेच्या कितीही योजना करा, परंतु चोरट्यांची बुद्धिमत्ता त्याच्याही पुढे असते. एखाद्या दुकानाचे शटर वाकवून रात्री चोरी करणारे चोर येतानाच चेहरा झाकून घेऊन येतात. एटीएम फोडणार्‍या चोरांनी पण चेहरा झाकून घेतला असतो. सीसीटीव्ही शूटिंग झाले तरी चोर कोण आहेत हे ओळखू येत नाही. चोरांकडे याला असलेला दुसरा पर्याय म्हणजे सीसीटीव्हीला झाकून टाकणे हा होय. चोर किती होते, त्यांनी चोरी कशी केली हे सर्व समजते. परंतु चोर दिसायला कसे होते किंवा त्यांचे चेहरे माहीत होत नाहीत. त्यामुळे याही प्रकारावर चोर मंडळींनी मात केली आहे असे लक्षात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news