

सुमारे 15 वर्षांपूर्वी प्रसिद्ध अमेरिकन लेखक स्टीफन कोहेन यांनी ‘द आयडिया ऑफ पाकिस्तान’ नावाचे पुस्तक लिहिले होते. यामध्ये त्यांनी विचारले होते, पाकिस्तान नक्की काय आहे? ‘दुष्ट राष्ट्र, गुन्हेगारी राष्ट्र, की अपयशी राष्ट्र’ त्यांच्या मते, पाकिस्तान विचार म्हणूनच अपूर्ण आहे; कारण तिथे राष्ट्र म्हणून एकवाक्यता नाही. जनरल असीम मुनीर ज्याप्रकारे धर्मांधतेचा शंख फुंकून पाकिस्तानला एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा इतिहास संपूर्ण अपयशाचा आहे. मुनीर यांनी धर्मांधतेची धग पहलगामपर्यंत पोहोचवून आत्मघात केला आहे.
धर्मांधतेचा राजकीय वापर हा गंभीर व संवेदनशील मुद्दा आहे. तो केवळ शांतता, सुरक्षा आणि मानवतेसाठीच नव्हे; तर लोकशाही व सामाजिक ऐक्यासाठीही मोठा धोका ठरतो. काश्मीरमध्ये पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्याचा प्रकार ज्या धर्मांध मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, तीच मानसिकता राजकीय हेतूंसाठी वापरून मोहम्मद अली जिना यांनी भारताचे विभाजन घडवून आणले. तेच धोरण आजही पाकिस्तानकडून भारताविरुद्ध चालू आहे आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी पुन्हा धर्मांधतेची धग काश्मीरच्या पहलगामपर्यंत पोहोचवली आहे.
पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर सुमारे 35 वर्षांनंतर, 1980 च्या दशकात, पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांना एका पत्रकाराने विचारले होते की, पाकिस्तान भारताशी शत्रुत्व का जोपासतो? त्यावर झिया म्हणाले होते की, तुर्की किंवा इजिप्त या राष्ट्रांनी मुस्लिम ओळख जपली नाही, तरीही ते तुर्की आणि इजिप्शियनच राहतील; पण पाकिस्तानने इस्लामी ओळख किंवा अस्मिता दाखवली नाही, तर आमचा भारत होईल. झिया यांच्या या विधानातून पाकिस्तानच्या राजकीय मनोवृत्तीचे भयानक वास्तव दिसते. आज पाकिस्तानने आपल्या स्थापनेच्या आठव्या दशकात प्रवेश केल्यानंतरही, त्यांची ही मानसिकता बदललेली नाही.
काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद येथे झालेल्या ‘ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शन 2025’मध्ये पाकिस्तानचे जनरल मुनीर यांनी द्विराष्ट्र सिद्धांताची पुनरावृत्ती करताना असे म्हटले की, आपला धर्म, संस्कृती, रीतिरिवाज आणि महत्त्वाकांक्षा हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. हे विधान म्हणजे जिना यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होता. वास्तविक, जिना यांची धर्माधारित देशनिर्मितीची कल्पना सुरुवातीलाच सांस्कृतिकद़ृष्ट्या अमान्य ठरली होती. धर्म व संस्कृती यांना एकत्र बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो, तेव्हा राष्ट्राचा नाश अटळ असतो. धर्म ही ईश्वर, अध्यात्म, नैतिकता व जीवनोत्तर संकल्पनांवर आधारित श्रद्धा असते; तर संस्कृती म्हणजे जीवनशैली, भाषा, परंपरा, अन्न, पोशाख, कला, संगीत, सण आणि मूल्यांचा समावेश असलेली एक व्यापक सामाजिक अभिव्यक्ती असते. जिना यांनी अरब व तुर्कांच्या इस्लामशी भारतीय मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु सांस्कृतिकद़ृष्ट्या ती कृती संपूर्णपणे विसंगत होती. नंतरच्या पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वानेही या विकृत धर्माधारित अस्मितेचा वापर कवचासारखा केला; पण लोकशाहीसाठी हे कवच शाप ठरले, हे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानात 1956 मध्ये संविधान अस्तित्वात आले; पण केवळ दोन वर्षांतच संसदीय लोकशाही मोडीत काढण्यात आली. राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी दोन वर्षांत पाच पंतप्रधान हटवले आणि 1958 मध्ये संविधान रद्द करून देशात मार्शल लॉ लागू केला. लष्करप्रमुख अयूब खान यांना देशाचा प्रशासक बनवण्यात आले. फक्त 11 वर्षांतच पाकिस्तानची लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होऊन लष्करी हस्तक्षेपाला खुले आमंत्रण दिले गेले. आज पाकिस्तान जगातील सर्वाधिक अशांत व असुरक्षित देशांमध्ये अग्रगण्य आहे. बलुचिस्तानसारख्या प्रांतात लष्करही पोहोचू शकत नाही. खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाणिस्तान समर्थित दहशतवादी टोळ्या शासन करत आहेत. पाकिस्तानमध्ये सामुदायिक ऐक्य नाही आणि देशाच्या ‘पाकिस्तानी’ अस्मितेला तिथली सामान्य जनता स्वीकारत नाही.
1940 मध्ये लाहोर अधिवेशनात मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी मांडली होती. त्यावेळी मोठ्या मुस्लिम जनतेला जिना इस्लामी नायक वाटत होते; पण जिना यांच्या मृत्यूनंतर त्या देशाचे स्वप्न भंगले. पाकिस्तानची सर्वाधिक राजकीय ऊर्जा भारतविरोधी धोरणांमध्ये आणि कृत्यांमध्येच खर्च झाली. आजवर देश म्हणून पाकिस्तान आपली नीती, कायदा किंवा घटनात्मक अधिष्ठान प्रस्थापित करू शकलेला नाही. जनरल मुनीर ज्याप्रकारे धर्मांधतेचा शंख फुंकून पाकिस्तानला एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा इतिहास संपूर्ण अपयशाचा आहे. 1971 मध्ये, अशाच प्रयत्नांमुळेच बांगला देश वेगळा झाला; पण तरीही पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ हे जनरल मुनीर यांच्या भाषणावर तशाच उन्मादी टाळ्या वाजवत होते, जशा काही वर्षांपूर्वी जिना यांच्या सभांमध्ये वाजवल्या जात असत.
काश्मीरबाबत पाकिस्तानचा दुटप्पीपणा आता इस्लामी जगतालाही दिसून आला आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात उईगर मुस्लिमांवर अत्याचार होतात. तेथे रोजा ठेवण्यास मनाई आहे. स्त्रियांना बुरखा घालू दिला जात नाही, सार्वजनिक ठिकाणी नमाजबंदी आहे; तरी पाकिस्तान यावर मौन बाळगतो. त्याउलट भारत हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांनाही इतर भारतीय नागरिकांप्रमाणे धर्मपालनाचा पूर्ण अधिकार, तसेच मूलभूत सुविधा दिल्या जातात. मध्य पूर्वेतील मुस्लिम राष्ट्रांसाठी भारत हा अधिक विश्वासार्ह आणि आर्थिकद़ृष्ट्या महत्त्वाचा भागीदार आहे. संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार, ओमान, बहरिनसारख्या देशांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. इराण तर अनेकदा या मुद्द्याबाबत भारताच्या बाजूने उभा राहतो. कारण, पाकिस्तानची सुन्नी कट्टरता शिया समाजाचा छळ करणारी आहे. आज ज्या सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक रसद दिली त्या देशासोबत भारताची आर्थिक भागीदारी वाढत आहे. सुमारे 60 लाख भारतीय सौदीत राहत असून, तेथील प्रगतीत मोठा सहभाग देत आहेत. हे भारताचे मोठे यश आहे..