

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त...
एक खूप सुंदर म्हण आहे, वृक्षकबहुँ नहिं फल भखै, नदी न संचै नीर।
परमारथ के कारने, साधुन धरा शरीर।।
याचा अर्थ असा की, वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाही आणि नदी स्वतःचे पाणी स्वतः साठवून ठेवत नाही. दोन्ही इतरांच्या कल्याणासाठीच अस्तित्वात असतात. संत आणि ऋषीमुनीदेखील अनंत काळापासून हीच शिकवण देत आलेत की, लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले जीवन हे वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरते. आपल्या जगण्यात सातत्याने याच भावनेचे प्रतिबिंब असलेली अशी एखादी व्यक्ती कोण असेल, तर ते अशोक सिंघल होते. २७ सप्टेंबरपासून आपण आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक प्रबोधन आणि अनेक दशकांचे समर्पित संघटनात्मक कार्याचे एकात्मीकरण घडवून आणणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत.
अशोकजी यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या स्नेहाची अनुभूती घेण्याच्या अगणित संधी मला लाभल्या, हा मी माझा बहुमानच मानतो. १९८१ मध्ये मला त्यांनी स्वतः हाताने पत्र लिहिले होते. या पत्रातून त्यांनी एका महत्त्वाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल लिहिले होते आणि काही कामे माझ्यावर सोपवली होती. मी त्यांना अहोरात्र काम करताना पाहिलेय. गुजरातच्या आदिवासी भागांमध्ये प्रवास करण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्यात कायम दिसायची. त्यांचे मन सतत कुठे ना कुठे धावत असायचं. ते सतत समाजातील वंचित घटकांसाठी आणखी काय करता येईल, याचाच विचार करत असायचे. जेव्हा देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडायच्या, त्या त्यावेळी अशोकजी हे एकतर तिथे स्वतः पोहोचणाऱ्या किंवा बाधितांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पहिल्या लोकांमधले एक असायचे. कच्छला २००१ मध्ये आलेल्या भूकंपाच्या भीषण परिस्थितीच्या काळात त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव, तर मी कधीच विसरू शकत नाही.
ते एका अत्यंत प्रतिष्ठित आणि संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले होते. त्यांचे वडील महावीरजी नामवंत प्रशासक होते. त्यांचे एक बंधू बी. पी. सिंघल पोलीस दलात उच्च पदापर्यंत पोहोचले आणि नंतर खासदारही झाले. दुसरे बंधू व्ही. पी. सिंघल त्रिपुराचे मुख्य सचिव होते. अशोकजी तरुण वयापासून एका वेगळ्याच ध्येयाकडे आकर्षित झाले होते. ते म्हणजे, भारतमातेच्या लेकरांना त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देण्याच्या आणि राष्ट्राचे पुनरुत्थान घडवण्याच्या ध्येयाकडे. प्रयागराजमध्ये लहानाचे मोठे होत असताना अशोकजी संगमाच्या काठावर तासन्तास बसायचे. नदीविषयी त्यांना आकर्षण होते; पण संगमावर येणारे संत, साधू आणि भाविकही त्यांचे लक्ष वेधून घेत असत. या सगळ्या वातावरणातून भारताच्या सांस्कृतिक जीवनमूल्यांची त्यांना ओळख होत गेली आणि समाजासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा बळकट झाली. इतरांसाठी जगण्याची हीच भावना त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे घेऊन गेली. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा एखादी जबाबदारी सोपवली, तेव्हा ती त्यांनी उत्साहाने, शिस्तीने आणि कर्तव्यभावनेने स्वीकारली.
अशोकजींनी सातत्य आणि अथक परिश्रमाने अनेक संस्था आणि चळवळी उभ्या केल्या. त्यांचा आवाज भारदस्त होता. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाने संपूर्ण सभा भारावून जायची. देशभरातील संत आणि साधू-महंतांमध्ये त्यांना मोठा मान होता. ते त्यांच्या सल्ल्याला महत्त्व देत आणि म्हणणेही आदराने ऐकून घेत. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १९९३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत अधिवेशन आयोजित केले होते. परदेशात असे अधिवेशन, त्यामागचे नियोजन, विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न यातून अशोकजींचे विलक्षण संघटनकौशल्य दिसून आले. २००० मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे जागतिक हिंदू अधिवेशन आयोजित केले होते. यात सहभागी प्रतिनिधींमध्ये अशोकजींच्या उपस्थितीने किती उत्साह निर्माण झाला, हे मला तिथे पाहायला मिळाले. माझे भाषण झाल्यानंतर अशोकजींनी केलेले कौतुक माझ्यासाठी खूप भावणारे होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असे, हे मी पुन्हा एकदा अनुभवले.
अशोकजींचा उल्लेख करताना रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९९१ मध्ये बोट क्लबवर झालेल्या सभेतील त्यांचे भाषण कोण विसरू शकेल? आंदोलन ऐन भरात असताना जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील अशोकजींचे ते चित्र आजही कुणीच विसरू शकत नाही. आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे आहे. हे शक्य होण्यासाठी अशोकजींसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्य वाहून घेतले. अयोध्येत राम मंदिर साकारताना पाहून अशोकजींना खूप आनंद झाला असता.
अशोकजींना विचारांची असाधारण स्पष्टता लाभली होती. समाजात सौहार्दपूर्ण वातावरण हवे, बंधुभावाचा संदेश सातत्याने अधोरेखित झाला पाहिजे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. सामाजिक एकोपा आणि समतेची भावना दृढ करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजात भेदभाव असता कामा नये आणि प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी त्यांची ठाम धारणा होती. बिहारमधील वंचित घटकातून आलेले आणि विश्व हिंदू परिषदेचे तळागाळातील कार्यकर्ते असलेले कामेश्वर चौपालजी यांच्या हस्ते राम मंदिराच्या पहिल्या विटेचे पूजन करावे, अशी त्यांची भूमिका होती. काशी येथे आयोजित धर्मसंसदेत त्यांनी डोम राजांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विविध सामुदायिक उपक्रमांमध्ये त्यांनी डोम राजांसोबत काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान, प्रतिष्ठा आणि स्थान मिळाले पाहिजे, या त्यांच्या दृढ विचारांचे हे कृतीतून दिसून आलेले उदाहरण होते.
त्यांच्या जिव्हाळ्याचे आणखी दोन विषय होते. एक म्हणजे शिक्षण. विशेषतः वैदिक शिक्षण आणि दुसरे संगीत. वाराणसीचा खासदार म्हणून मला विशेष अभिमान वाटतो की, मी प्रतिनिधित्व करत असलेली शाश्वत काशीनगरी अशोकजींच्या जीवनाशी एका महत्त्वपूर्ण नात्याने जोडलेली आहे. त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. विद्यार्थीदशेत अभ्यासू आणि गुणवंत, अशी त्यांची ओळख होती. दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत विशेषतः आदिवासी समाजापर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘एकल विद्यालय’ उपक्रमाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ते विपुल वाचन करणारे तसेच उत्तम श्रोतेदेखील होते.
अशोकजींना जवळून ओळखणाऱ्यांना त्यांच्या उत्तम गायनकौशल्याची निश्चितच जाणीव होती. नागपूर येथील बैठकींमध्ये ते ‘एकल गीत’ सादर करत आणि त्यांच्या गायनाने उपस्थित मंत्रमुग्ध होत. त्यांच्या गायनामुळे बैठकीचे वातावरण उत्साहाने भारून जायचे. २०१५ मध्ये त्यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित करत 'हे मातृभूमि मेरी, हे पितृभूमि मेरी” हे गीत गायले. त्यांच्या या अनपेक्षित आणि उत्स्फूर्त गायनाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अधिकाधिक तरुणांना त्यांच्या महान कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याचा आपण संकल्प करूया, तसेच आपल्या राष्ट्राच्या आणि देशवासीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया!