भोंदू खरातचे नेटवर्क उद्ध्वस्त होईल?

अंधश्रद्धेच्या विळख्यातील 'हायप्रोफाईल' वास्तव!
Ashok Kharat case |
भोंदू खरातचे नेटवर्क उद्ध्वस्त होईल?
Published on
Updated on

भोंदू अशोक खरात प्रकरणातून उघड होणारे हायप्रोफाईल नेटवर्क आणि सामाजिक वास्तवता ही समाजासाठी गंभीर इशारा देणारी आहे.

गेले वीस दिवस राज्यभर गाजत असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण केवळ एक गुन्हेगारी प्रकरण राहिलेले नाही. ते सत्तेच्या, पैशाच्या, अंधश्रद्धेच्या आणि सामाजिक ढोंगीपणाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचे नकारात्मक प्रतीक बनले आहे. खरातपाठोपाठ एरंडे नावाच्या व्यक्तीचे सेक्स स्कँडल समोर आले; परंतु त्याची व्याप्ती मर्यादित ठरली. याउलट खरात प्रकरणाने राज्यव्यापी खळबळ उडवली. हा फरक नेमका कशामुळे? याचे उत्तर स्पष्ट आहे. खरात प्रकरणात गुंतलेली नावे. राजकीय वर्तुळातील प्रभावशाली व्यक्ती, प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, तसेच प्रतिष्ठित कुटुंबांतील महिलांचा सहभाग या प्रकरणाला केवळ गुन्हा न ठेवता ‌‘हायप्रोफाईल नेटवर्क‌’चे स्वरूप देतो.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मनी लाँडरिंगचा गुन्हा. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ लैंगिक शोषण किंवा अंधश्रद्धेपुरती मर्यादित राहत नाही, तर आर्थिक गुन्हेगारीच्या खोल गर्तेतही ती पोहोचते. काळी जादू, पैशांची अफाट उलाढाल, महिलांची फसवणूक, गैरवापर आणि सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध या सर्व घटकांनी मिळून हे प्रकरण अधिकच गूढ आणि गंभीर बनवले आहे. त्यामुळे हा एका व्यक्तीचा गुन्हा नसून, संघटित रॅकेट असल्याची शक्यता अधिक बळकट होत आहे.

अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा दावा केला. या आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून असली, तरी अशा प्रकारचे आरोप समोर येणे अत्यंत चिंताजनक आहे. याचा अर्थ असा की, या प्रकरणाचे धागेदोरे केवळ सामाजिक किंवा आर्थिक स्तरावर मर्यादित नसून, राजकीय वर्तुळातही अधिक संवेदनशील असू शकतात.

या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे योग्य आणि अधिकृत माहितीचा अभाव. पोलिसांकडून आणि एसआयटीकडून अधिकृत माहिती दिली जात नसल्यामुळे अफवा आणि अटकळींना कमालीचे उधाण आले आहे. तपासाच्या दृष्टीने काही माहिती गुप्त ठेवणे आवश्यक असते, हे मान्य; परंतु संपूर्ण मौन पाळल्याने लोकांच्या मनात संशय अधिकच वाढतो. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जे काही समोर आले आहे, ते केवळ ‌‘हिमनगाचे टोक‌’ आहे. हे खरे असेल, तर या प्रकरणाचा खरा विस्तार किती भयावह असू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी! दरम्यान, खरातच्या प्रकृतीबाबत समोर येणाऱ्या बातम्याही चिंताजनक आहेत. वीस दिवसांत त्याचे सात किलो वजन घटल्याची माहिती समोर येते. आरोपीचे आरोग्य टिकवणे, हेही तपास यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, या प्रकरणातील अनेक गुपितांची किल्ली कदाचित त्याच्याकडेच असू शकते. खरातने न्यायालयात तोंड उघडलेले नाही, हेदेखील नोंद घेण्यासारखे आहे.

दुसरीकडे, एरंडे प्रकरणाकडे पाहिले, तर तेथेही व्हिडीओ समोर आले; परंतु ते व्हायरल झाले नाहीत आणि समाजाचे लक्षही त्या दिशेने गेले नाही. याचा अर्थ असा की, आपल्या समाजात न्यायाची मोजपट्टी अजूनही व्यक्तीच्या ‌‘स्टेटस‌’वर अवलंबून आहे. खरात प्रकरणात उच्चभ्रू महिलांचा सहभाग असल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढते, तर एरंडेसारख्या प्रकरणांकडे दुर्लक्ष होते, ही मानसिकता धोकादायक मानायला हवी. कायद्याचा धाक आणि कारवाईची तीवता ही व्यक्तीच्या सामाजिक स्तरावर अवलंबून नसून गुन्ह्याच्या स्वरूपावर ठरायला हवी.

अशाप्रकारची अनेक स्कँडल्स शहरोशहरी दडलेली आहेत. ती समोर येण्यासाठी तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तक्रारदारांनी शेवटपर्यंत ठाम राहणे गरजेचे आहे. कारण, अशा प्रकरणांमध्ये दबाव, धमक्या, बदनामी आणि प्रलोभने यांचा सामना करावा लागतो. शेवटी, खरात प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यापुरते मर्यादित राहणार की संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश होणार, हा खरा प्रश्न आहे. तपासाची दिशा, पोलिसांची पारदर्शकता आणि समाजाची जागरूकता या तिन्ही गोष्टींवर या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रकरणातून खरोखरच मोठे रॅकेट उघडकीस आले, तर ते समाजासाठी डोळे उघडणारे ठरेल. अन्यथा, हेही प्रकरण काळाच्या ओघात विस्मरणात जाईल आणि ‌‘भोंदूपणा‌’चे जाळे पुन्हा नव्याने विणले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news