
महादेवबुवा शहाबाजकर - वरळी कोळीवाडा दिंडीचे अध्यक्ष
माझे बाबा भजनरत्न दिनकरबुवा पोशा शहाबाजकर मुळात वारकरी संप्रदायाचे असल्याने रोजचा हरिपाठ, अभंगगायन यांचा परिपाठ ठरलेला होता. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार होतच होते. त्यामुळेच हरिभजनाचा छंद मलाही लागला. 1976 सालापासून मी संगीत, भजन शिकायला लागलो आणि पुढच्याच वर्षी पहिल्यांदाच आळंदीला आलो.
जेव्हा श्री माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन झाले तेव्हापासूनच मी माउलीमय झालो. त्यानंतर 1980 मध्ये पहिल्यांदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेलो. श्री पांडुरंगाच्या दर्शनाने श्री पांडुरंगाची ओढच लागत गेली. मग आळंदीची महिनावारी आणि महिना-दोन महिन्याला पंढरपूरला जाणे होत राहिले.
आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मुंबईच्या वरळी कोळीवाडा येथून बैलगाडीत सामान भरून निघत होती. त्या दिंडीचे यावर्षी 73 वे वर्ष आहे. मी त्या दिंडीत 1984-85 मध्ये पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर पायी वारीला निघालो आणि पहिली पायी वारी पूर्ण केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतून निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी नंबर एकला मानाचे स्थान आहे. श्री माउलींच्या रथासमोर श्री हैबतबाबा यांची दिंडी आळंदीकर दिंडी म्हणून ओळखली जाते.
पायी वारी म्हणजे विश्वातील चालते-बोलते विद्यापीठ; त्यातली शिस्त पाहण्यासारखी अन् अनुभवण्यासारखी असते. आध्यात्मिक, भौतिक, वैज्ञानिक जीवन कसे जगावे, याचे ते ज्ञानपीठच आहे.
मी संगीत भजनगायक असल्यामुळे वारीतील बुजुर्ग वारकरी माझ्यावर फार प्रेम करीत असत. त्यांच्या सांप्रदायिक चाली फार गोड असायच्या आणि तेव्हापासूनच अभंग, गवळणींना चाली बांधत गेलो. त्या चालींना देखील शास्त्रीय संगीताच्या वेगळ्या अंगाने गायन करीत असल्यामुळे त्या चाली देखील वारकरी आवडीने गात असत.
माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥
वारी हा दोन अक्षरी शब्द आहे. परंतु, प्रवासात बरेच खटनट सहन करावे लागतात. ते म्हणजे, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो... सर्व ऋतूंवर मात करून मार्गक्रमण करावे लागते, ते वारकरी सहज करतात. वारी म्हणजे, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी, असा 35 दिवसांचा केलेला प्रवास म्हणजे 365 दिवसांची बॅटरी चार्ज होण्याचे मंगलमय साधन. सर्वांनी एकदा वारी अवश्य करावी. आपला सर्वस्वी भार श्री विठ्ठल व श्री माउली वाहत असतात, असा आमचा दृढ विश्वास आहे.
मागील 25 वर्षे मी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी नंबर 1 वरळी कोळीवाडाचा अध्यक्ष या नात्याने काम करताना काहीवेळा साम, दाम, दंड, भेद या उक्तीप्रमाणे वागावे लागले; परंतु आमच्या दिंडीमध्ये बहुतांश वारकरी कोळी बंधू-भगिनी असल्यामुळे आणि त्यांचा मूळ व्यवसाय मासेमारी किंवा मासे विक्रीचा असल्यामुळे तसेच ते वारकरी माळकरी असल्यामुळे स्वभावाने प्रेमळ असतात. सतत नामस्मरण करीत ते आपला दिनक्रम चालवीत असतात. वारीतील बरेच चांगले-वाईट अनुभव घेऊन त्याचा आपल्या जीवनामध्ये व समाज घडविण्यासाठी, समाजप्रबोधनासाठी वेळोवेळी उपयोग होत असतो.
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे म्हणतात, ज्या देशातले लोक पंढरपूरची वारी करतात ते महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. पण, या वारीचा इतिहास काही हजार वर्षांपूर्वीचा आहे. सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे पंढरपूरचा परब्रह्म श्री विठ्ठल आहे. भगवंत श्रीकृष्ण हे रुसलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले होते. परंतु, ते माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाच्या भेटीसाठी पोहचले.
पुंडलिकाने सेवेत असल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि भगवंताला दारात तिष्ठत उभे केले. आदरातिथ्य म्हणून उभे राहण्यासाठी वीट मागे फेकून दिली. का रे पुंड्या मातलासी। उभे केले विठ्ठलासी॥ ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट॥ माता-पित्यांची सेवा झाल्यावर, पुंडलिकरायांनी त्यांना वंदन केले. भगवंतांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिक म्हणाला देवाने या रूपात इथे असेच उभे राहावे व अज्ञानी, मुढ, पापी लोकांचा उद्धार करावा.
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले॥ मुढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि॥
या भक्त पुंडलिकाचे स्मरण म्हणून आजही वारकरी ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष करतात. परब्रह्म श्री विठ्ठल तेथे भक्तांसाठी विटेवर उभे राहिल्यामुळे पुढे त्या क्षेत्रास तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आणि पंढरपूर म्हणून नावारूपास आले. या पंढरपूरची वारी हजारो वर्षांपासून चालू आहे. अनेक आचार्य, साधू संत, साधक आणि वैष्णवांनी पंढरपूरची वारी केली. कैलासावरून येऊन भगवान शंकरांनी पार्वती माता, पुत्र श्रीगणेश आणि वाहन नंदीसमवेत सर्वांत प्रथम पंढरपूरची वारी केली.
याबरोबरच श्रीकृष्ण बंधू बलरामजी, राधाराणी, सत्यभामा यांनी देखील पंढपूरला येऊन चंद्रभागेत स्नान केले. द्वापार युगाच्या शेवटी पांडवांनी या तीर्थक्षेत्री भेट दिली. आठव्या शतकात अद्वैतवादाचे उद्गाते आद्य शंकराचार्यांनी काही दिवस पंढरपूर क्षेत्रात वास्तव्य केले. चंद्रभागेचे स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन, असा त्यांचा नित्यक्रम होता. भगवंताच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्यांनी भगवंताचे वर्णन करणार्या पांडुरंगाष्टकम्ची रचना केली.
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः ।
समागत्य तिष्ठंतमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥
अकराव्या शतकात श्रीपाद रामानुजाचार्य पंढरपूरला आले आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले. वैष्णवांसाठी त्यांनी भक्ती आणि पंढरपूरचे माहात्म्य विशद केले. बाराव्या शतकात श्रीपाद निम्बरकाचार्य आणि अनुयायांनी अनेकवेळा पंढरपूरची वारी केली. त्यांचा मठ आजही पंढरपूरमध्ये आहे.
श्रीपाद मध्वाचार्य यांनी चातुर्मासात चार महिने पंढरपुरात राहून भागवत कथा, चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाचे दर्शन, असा नित्यक्रम चालू ठेवला. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात रामानंदाचार्य यांनीही मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरची वारी केली. हे ज्ञानेश्वर माउलींचे वडील विठ्ठलपंतांचे काशीक्षेत्री गुरू होते. महावैष्णव ज्ञानदेवांच्या घराण्यात त्यांचे पणजोबा त्र्यंबकपंतांपासून पंढरीची वारी चालू होती. हीच वारीची परंपरा पुढे ज्ञानदेवादी संतांनी चालू ठेवली. तुकोबारायांच्या आधी काही पिढ्या त्यांच्या पूर्वजांमध्ये वारीची परंपरा अव्याहतपणे चालू होती.
त्यांचे आठवे पूर्वज संत ज्ञानेश्वर माउलींचे समकालीन असलेले विश्वंभरबाबा यांनी त्यांच्या आईच्या आज्ञेने पूर्वापार चालत आलेली पंढरीची वारी चालू केली होती, असा महिपतीलिखित चरित्रामध्ये उल्लेख सापडतो. तुझ्या वडीलो वडीली निर्धारी । चालविली पंढरीची वारी॥ त्यासी सर्वथा अंतर न करी । तरीच संसारी सुफळ पणा ॥-(महिपती) विश्वंभर बाबांच्या वृद्धापकाळातील निरपेक्ष भक्तीला प्रसन्न होऊन श्री विठ्ठल-रखूमाई देहूमध्ये मूर्तिरूपात अवतीर्ण झाले. तेव्हापासून पंढरीत जगाला नांदवणारा पांडुरंग
देहूमध्ये त्यांच्या घरी नांदू लागला. साडेसातशे वर्षांपूर्वी विश्वंभरबाबांकडून जगातील पहिल्या एकत्रित विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना देहूच्या वाड्यात करण्यात आली. धन्य देहूगाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग॥ यानंतर त्यांच्या घराण्यात ही वारी हरी-विठ्ठल-पदाजी-शंकर-कान्होबा यांच्याकडून वंशपरंपरेने निरंतर चालू राहिली. तुकोबारायांचे वडील बोल्होबा यांनी चाळीस वर्षे वारी केली. पुढे त्यांचे चिरंजीव संत तुकाराम महाराज ही वारी करू लागले. ज्ञान-भक्ती-वैराग्य याचा त्रिवेणी संगम असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांनी 1400 टाळकरी घेऊन विठुनामाचा गजर करीत सामूहिक स्वरूपाच पंढरीची वारी पूर्ववत चालू केली.
पंढरीची वारी आहे माझे घरी॥ आणिक न घरी तीर्थ व्रत॥ तुकोबारायांच्या या वारीमध्ये भेदाभेद विसरून अठरापगड जाती आणि स्त्री-पुरुषांनी गात-नाचत संघटित व्हावे, हे मोठे परिवर्तनीय आणि लोकोद्धाराचे कार्य तुकोबांनी हाती घेतले होते. यारे यारे लहान थोर । याती भलती नारीनर॥ समता, बंधुता आणि एकता, या त्रिसूत्रीचा तुकोबारायांनी आधार घेतला. त्यांना नेहमीच वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद विसरून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असलेला समाज अभिप्रेत होता. आजचा लाखोंचा सोहळा त्याचीच फलश्रुती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेत सर्वांना एका ध्वजाखाली आणण्यात तुकोबारायांचे वारकरी संस्कार आध्यात्मिक पातळीवर साहाय्यक ठरले. शेतीच्या कष्टातून गुजराण करणारा नांगरधारी शेतकरी, वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी म्हणून प्रवाहित झाला. वेळ प्रसंगी तोच वारकरी स्वधर्म रक्षणासाठी सहेतुक तलवारधारी वार-करी बनला. मुघलशाहीचे प्राबल्य असताना देखील भक्ती-शक्तीचा हा अभूतपूर्व संगम होता. पाईकाच्या अभंगातून तुकोबारायांनी छत्रपतींना आणि मावळ्यांणा मोलाचे मार्गदर्शन केले.
जीवाचे उदार शोभती पाईक। मिरवती नाईक मुकुटमणी॥
जगद्गुरु संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमना नंतर वारीची परंपरा त्यांचे अनुग्रहित असलेले त्यांचे धाकटे बंधु कान्होबा यांनी अखंडित चालू ठेवली. कालपरत्वे तुकयाबंधु कान्होबांनी वारी च्या परंपरेची ही धुरा तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांच्या खांद्यावर दिली.त्यांनी भागवत धर्माचा पाया ज्ञानोबाराय माऊली आणि कळस तुकोबाराय यांच्या पादुका गळ्यात किंवा पालखीत ठेऊन जेष्ठ वद्य सप्तमी 1685 या वर्षी परिपूर्ण आणि भक्तीरसपूर्ण पालखी सोहळा चालू केला.
देहूत जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका घेऊन, नंतर आळंदीत माऊलींच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपुर कडे मार्गस्थ होत असे. ’ज्ञानोबा-तुकाराम’ हा वारकर्यांचा श्वास आणि उच्छवास असणारा भाव भक्तीचा गजर या पालखी सोहळ्यात तेव्हा पासून चालू झाला.परंतू काही कारणास्तव 1832 या वर्षी संत ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा विभक्त झाला. काळानुरूप दोन्ही पालखी सोहळ्यांना राजाश्रय प्राप्त झाला. मुघलांचा पालखी सोहळ्याला उपद्रव होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती राजाराम महाराजांनी पालखी सोहळ्याला संरक्षण प्रदान केले होते. शिंदे आणि शितोळे सरकार यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला मोठा हातभार लावला होता.