

आटपाटनगर होतं. त्याचं नाव बारामती. तेथे श.प., अ.प. आणि सु.ता. हे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. शेतीवाडी बक्कळ होती. सत्ता त्यांच्या उशापाशी लोळण घेत होती. काकाला पुतण्या आणि पुतण्याला काका खूपखूप मानत होते. काही कमी-अधिक झालं, तर ताई शिष्टाई करत. शिष्टाईच्या बाबतीत त्या कधी कमी पडल्या नाहीत. वेळोवेळी काकांनी पुतण्याच्या सुवर्णसंधीचे दरवाजे बंद करून ठेवले. शेवटी वैतागून पुतण्याने काकाचा पक्ष फोडला आणि घड्याळावर ताबा मिळविला. काकांची मोठी पंचाईत झाली. रात्री-अपरात्री ‘तुतारी’ वाजू लागली; पण वेळ नेहमी एकसारखी नसते. कधी गाडी नावेत असते, तर कधी नाव गाडीवर असते.
महापालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले आणि घड्याळाने तुतारीला साद घातली. तुतारीने घड्याळाच्या गजरात आपला सूर मिसळला.
आता काय? मिले सूर हमारा तुम्हारा ऽऽ
पण, पत्रकारांना कोण गप्प बसविणार? एका पत्रकाराने पुतण्याला विचारले. ही युती पुढेही चालू राहील काय? त्यावर पुतणे काय म्हणतात पाहा... ‘तुझ्या तोंडात साखर पडो!’
म्हणजे आता झाले गेले गंगेला मिळाले. शेवट गोड तर सगळे गोड! पाण्यावर काठी मारली, तरी पाणी दुभंगत नाही. दिलजमाई झाली. कुटुंब प्रसन्न झाले. आटपाटनगरही प्रसन्न झाले. शेवटी किती एकमेकाला दूषण द्यायचे!
राज्यातील जनता पण कंटाळून गेली होती यांच्या भाऊबंदकीला! त्या भाऊबंदकीचे बंधुभावात रूपांतर झाले.
महाराष्ट्रात आता चुलता-पुतण्या एक होत आहेत. भाऊ-भाऊ एक होत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. निवडणुकीचे किती साईड इफेक्टस् होत असतात बघा! महाराष्ट्रातही ही दोन-चार घराणी राजकारणात मातब्बर आहेत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र आज स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यांची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होत राहो! तुमच्या-आमच्या पोरांना नोकर्या काय, आज ना उद्या कधीही मिळतील.
नाही तर अधून-मधून निवडणुका लागतातच. त्यात नाचायचे कुणी? म्हणून निवडणुका लावणार्यांच्या तोंडात साखर पडो! तेवढाच रोजगार भेटतो आपल्या लेकरांना आणि बायाबापड्यांना!