

एकीकडे सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्यासारखे भारतीय नेतृत्व जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचा विशाल डोलारा यशस्वीपणे हाताळत आहेत. दुसरीकडे सिलिकॉन व्हॅलीच्या त्याच सागरात एक तरुण भारतीय जागतिक टेक साम्राज्यांनाच आव्हान देत आहे. या 31 वर्षीय तरुण तंत्रज्ञाचे नाव आहे अरविंद श्रीनिवास. चेन्नईच्या आयआयटी-मद्रासमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या श्रीनिवास पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. जगाची दिशा निश्चित करणार्या कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात करिअर करायचे त्यांनी ठरवले. त्यांनी ओपनएआय, गुगल ब्रेन आणि डीपमाईंड यांसारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधून अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी या कंपन्यांमध्ये केवळ एक कर्मचारी म्हणून न राहता, स्वतःच्या स्वतंत्र स्वप्नांचा पाठलाग करायचे ठरवले.
स्वतःच्या क्षमतांवर प्रचंड विश्वास आणि दूरद़ृष्टी असल्याशिवाय असे निर्णय घेता येणे शक्य नाही. त्यांनी ध्येय निश्चित केले आणि 2022 मध्ये ‘परप्लेक्सिटी एआय’ या स्टार्टअपचा जन्म झाला. त्यांच्या सोबत त्यांचे काही मित्र देखील होते. हे पारंपरिक ‘सर्च इंजिन’ नसून, थेट आणि पुराव्यांसह उत्तरे देणारे ‘आन्सर इंजिन’ आहे. या नावीन्यपूर्ण कल्पनेने अल्पावधीतच तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवून दिली होती.
मात्र, श्रीनिवास यांनी जगाचे लक्ष वेधले ते त्यांच्या एका धाडसी ऑफरने. सध्या अमेरिकेत गुगलवर मक्तेदारीचे आरोप होत आहेत. त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. अशा स्थितीत अरविंद यांनी गुगलचा मुख्य प्रॉडक्ट असलेल्या गुगल क्रोम ब्राउझर 34.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची सार्वजनिक ऑफर दिली. ही केवळ एक व्यावसायिक खेळी नव्हती, तर ते एकाधिकारशाहीला दिलेले आव्हान होते. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात या ऑफरची मोठी चर्चा सुरू आहे. अरविंद यांनी दिलेली ही ऑफर तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक तर आहेच. भारतीय तरुण आता केवळ जागतिक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन करणार नाहीत, तर आता जागतिक तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारे ‘गेम चेंजर’ बनले आहेत हा संदेश देणारी आहे.
गुगल क्रोमसाठी दिलेली ही ऑफर केवळ एक व्यावसायिक प्रस्ताव नव्हती, तर ती एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली ‘पीआर मास्टरस्ट्रोक’ होती. या एका घोषणेने परप्लेक्सिटी एआयचे नाव जगभरात पोहोचले आणि कंपनीचे मूल्यांकन दुप्पट झाले. हे केवळ व्यावसायिक यश नसून, यामागे अरविंद यांची अचूक बाजारपेठेची जाण, विलक्षण दूरद़ृष्टी आणि प्रतिस्पर्ध्याला अचंबित करणारा उद्योजकीय चाणाक्षपणा दडलेला आहे. यामुळे हे सिद्ध होते की, आजच्या युगात एक धाडसी आणि कल्पक पाऊल अब्जावधींच्या मार्केटिंग बजेटपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकते.