

डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अभ्यासक
जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून व समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजेच शाहीर अण्णाभाऊ साठे. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्या भाषणाच्या परिणामस्वरूप अण्णा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊ लागले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा व समृद्धी अण्णाभाऊंनीच मिळवून दिली. अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे होते. त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी होते.
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने..!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वसामान्यांच्या जीवनसंघर्षाची चूड पेटविणारा हा जनसामान्यांमधील असामान्य प्रतिभावंत. ज्याने जगणे, जगण्यामागच्या वेदना आणि जगण्यामागचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध केले. ज्याने विश्वरूपी गणाला सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आवाहन केले. लोककलेच्या क्षेत्रातील तमाशा आणि त्यातील गण, गवळण, बतावणी आदी लोकशैलींची मोडणी करून त्यात नव्या युगाचा आशय भरला. असा युगप्रवर्तक शाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे! कथा, कादंबरी, लोकनाट्य, आत्मकथन, लोकगीत अशा मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील विविध दालनांना ज्यांच्या लोकप्रतिभेचा स्पर्श झाला, अशा अण्णाभाऊंच्या योगदानाबद्दल थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी म्हटले आहे, “अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, ही जगण्यासाठी लढणार्या माणसाची कथा आहे. ही कच खाणारी, हार मानणारी माणसं नाहीत. या सर्वांना मानाने जगायचे आहे आणि आक्रमक वृत्तींशी निकराने लढून त्या सामन्यात त्यांना जिंकायचेही आहे.” वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, विचार कार्य व प्रतिभा यांच्या मदतीने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे अण्णाभाऊ निश्चितच प्रेरणास्थानी असणारे असे होते. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्या भाषणाच्या परिणामस्वरूप अण्णा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊ लागले. चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत त्यांनी छोटी-मोठी कामे केली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमांत, आंदोलनांत सहभागी होत असत. ‘चले जाव’ चळवळीच्या काळात वाटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली.
यावेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणून त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे 15 वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली. अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे होते. व्यक्तिगत जीवनातील उपेक्षेचा झंझावात आणि आर्थिक विपन्नावस्थेचे वादळ झेलूनही अण्णाभाऊ सतत सर्वसामान्यांसाठी संघर्षरत राहिले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान मांडत साम्यवादाचे प्रवर्तक म्हणून कार्यरत राहिले. त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी होते.