

सध्या राजकारणामध्ये नेमके काय चालले आहे, हे तुम्हाला आम्हालाच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही समजेनासे झाले असावे. एकदाची महापालिकेचे फॉर्म भरण्याची तारीख गेली. आता तरी चित्र स्पष्ट होईल, असे वाटले होते; परंतु तसे घडताना दिसत नाही. काल राज्यभर आणि विशेषत: महानगरपालिका परिसरात नाराजीचा उद्रेक होता. इतकी वर्षे ज्या पक्षात काम केले, त्याचे तिकीट मिळत नाही, हे समजल्याबरोबर अनेक उमेदवारांनी पक्षाच्या कार्यालयातच अंग टाकले. संध्याकाळपर्यंत एबी फॉर्म मिळाले नाहीत, तर आत्मदहनाचे इशारेदेखील दिले गेले. आपले तिकीट कापणार्या नेत्याविरुद्ध जोरदार आवाजात घोषणाही दिल्या गेल्या.
नाराजीचा उद्रेक वेगळ्या प्रकारे हँडल करणारेही काही उमेदवार होते. आपल्या वॉर्डातून उमेदवारी मिळत नाही, हे लक्षात आल्याबरोबर तातडीने त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दुसर्या पक्षाचे कार्यालय गाठले आणि तिथे तिकीट मिळते का, यासाठी खटपट सुरू केली. काही ठिकाणी तर संध्याकाळी अर्ज भरण्याची वेळ संपण्यापूर्वी अर्धा तास आधी क्षेत्रीय कार्यालयामध्ये एबी फॉर्म दिले गेले. पक्षाअंतर्गत होणारी बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय नेत्यांनीही भरपूर प्रयत्न केले.
बंडखोराचे व्यक्तिमत्त्व फार वेगळे असते. आपल्या पक्षाने तिकीट न दिल्यामुळे आलेली नाराजी लक्षात ठेवून ते अपक्ष म्हणून उभे राहतात आणि निवडून आलो नाही, तरी बेहत्तर; पण पक्षाच्या उमेदवाराला पाडणारच अशी प्रतिज्ञा घेतात. बंडखोर असो की पक्षाचे उमेदवार असोत, प्रत्येकाने गेली पाच वर्षे वॉर्डात भरपूर जनसंपर्क वाढवलेला असतो. जमेल तशी समाजसेवेची कामे केलेली असतात. तोरणापासून मरणापर्यंत प्रत्येकाच्या घरी हजेरी लावलेली असते. काहीही करून या वेळेला नगरसेवक व्हायचेच, हे काही लोकांचे स्वप्न असते. हे स्वप्न तुटण्याची वेळ आल्याबरोबर त्या व्यक्तीचा तोल सुटतो आणि तो बंडखोरी करायला सज्ज होतो. बंडखोरी करून निवडून आला, तर त्याची चांदी असते. कारण, महापौरपदासाठी त्याचे मत अत्यंत महत्त्वाचे असते. पुढील पाच वर्षे तो खरा मनपाचा राजा असतो. त्याचा तोल सांभाळणे महापौरालाही आवश्यक असते. कारण, बंडखोरांच्या मतांवरच महापौर महोदयांनी खुर्ची पटकावलेली असते.
जागांसाठी रस्सीखेच आता संपलेली आहे आणि पक्षाचे उमेदवार ठरलेले आहेत. एकदाचे सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन आपण नेमके कुठे आहोत, कोणत्या पक्षात आहोत, हे जाहीर केले, तर आपल्यासाठी म्हणजे सामान्य जनतेसाठी सोपे होईल. कोण कोणत्या पक्षात आहे, कोणाची युती आहे आणि कोणाची कुठे आघाडी आहे, हे समजण्यास अजून तरी काही मार्ग नाही.