गुंडाळले रील

गुंडाळले रील
पालक नावाची जी एक संस्था कधी काळी अस्तित्वात होती, ती आज मोबाईलबरोबर संघर्ष करत आहे.
पालक नावाची जी एक संस्था कधी काळी अस्तित्वात होती, ती आज मोबाईलबरोबर संघर्ष करत आहे. गुंडाळले रील
कलंदर

मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया घरात, दारात आणि थेट खिशात आल्यापासून आयुष्य पार बदलून गेले आहे. विशेषत: तरुण मुले-मुली अभ्यास कधी करत आहेत, हा एक संशोधनाचाच विषय झाला आहे. तुम्ही घराबाहेर पडा की घरामध्ये असा, प्रत्येक जण मोबाईलमध्ये काही ना काही पाहत आहे .काही लोक मोबाईलमध्ये काहीच्या बाही पाहत असतात. या सर्वाचे महत्त्वाचे कारण म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून भरमसाट काही ना काही तरी मोबाईलवर येत असते आणि ते पाहण्यात आपण गुंगून जात असतो.

पालक नावाची जी एक संस्था कधी काळी अस्तित्वात होती, ती आज मोबाईलबरोबर संघर्ष करत आहे. विशेष म्हणजे हा संघर्ष पालक पण स्वतःच्या हातात मोबाईल घेऊनच करीत आहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे! सासरी जाणारी नवी नवरीही विदाईच्या वेळीही चित्र विचित्र अंगविक्षेप करून जेव्हा रील बनवताना आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही जे थक्क झालो ते अजूनही तसेच आहोत. सर्वजण रडत असताना ती नववधू पण रडत होती; पण रडता रडता हातात मोबाईल घेऊन रील काढत होती, हे पाहून आमच्या हाताची चारी बोटे जी तोंडात गेली ती अजून बाहेर निघायला तयार नाहीत. या रील नावाच्या प्रकरणाने आमच्या आयुष्याचा दोरा पूर्ण गुंडाळला जाऊन त्याचा असा गुंता होऊन बसला आहे की, तो सोडवणे अशक्यप्राय आहे.

तुम्ही जर मोबाईलवर एकदा रील पाहायला सुरुवात केली की, हजारोंनी रील्स तुमच्यापुढे येत राहतात व देहभान हरपून तुम्ही ते पाहत राहता. या हजारो रील्स पाहून होईपर्यंत आणखी चार पाचशे रील्स तुमच्या मोबाईलमध्ये येऊन पोहोचलेल्या असतात. याचा अर्थ तुम्ही 24 तास पाहत बसला तरी संपणार नाहीत, इतका कन्टेंट या मोबाईलवर येत असताना मुलांनी अभ्यास करायचा तरी कधी आणि कसा, हा मोठाच प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गेलात, तर एकदाची आपली बस किंवा रेल्वेमध्ये जागा पकडली की, ती व्यक्ती जे मोबाईलमध्ये डोके घालते की, बरेचदा गंतव्य ठिकाण म्हणजे उतरायचे स्टेशन येऊन गेले तरी त्याला कळत नाही. म्हणजे देहभान हरपून घेऊन या रील्सनी तुम्हाला-आम्हाला गुंडाळून ठेवले आहे.

कधी काळी चित्रपटांची रिळे असायची. आता चित्रपटही सॅटेलाईटवरून प्रदर्शित होतात. या रिळांच्या ऐवजी रील्स तुम्हाला-आम्हाला गुंडाळायला बघत आहेत. रील्स गुंडाळायला बघत आहेत म्हणण्यापेक्षा त्यांनी गुंडाळणी करून आयुष्याचा गुंता अवघड करून ठेवलेला आहे.

या रील करणार्‍या तरुण-तरुणींचे हावभाव कधी-कधी भीती वाटायला लागावी, असे असतात. पूर्वी भानामती नावाचा प्रकार केला जायचा म्हणे. त्या वेळेला केलेले चित्र विचित्र अंगविक्षेप व हातवारे यांची या रील हिरोईनी पाहताना आठवण येते. पुढे जेव्हा या रीलकन्या संसाराला सुरुवात करत असतील, तेव्हा यांच्या नवर्‍याची व सासू-सासर्‍यांची होणारी तारांबळ कुणीतरी शूट केली पाहिजे. रील बनवण्याची इतकी क्रेझ वाढली आहे की, कोणालाही आपल्या जीवाची पर्वा नाही. काळाच्या बरोबर चालले पाहिजे; पण काय घ्यावे आणि काय नाही, याचे भान तरी आजच्या तरुण पिढीने ठेवायला नको काय?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news