

तानाजी खोत
अमेरिका, जो देश स्वतःला लोकशाही आणि मानवाधिकारांचा सगळ्यात मोठा तारणहार म्हणवतो, त्याच देशात अलीकडे घडलेल्या दोन गंभीर घटनांनी येथील समाजातील वाढती हिंसा आणि कोसळत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेची दाहकता समोर आणली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची झालेली हत्या आणि भारतीय कर्मचारी चंद्रमौली नागम्मलैया यांची झालेली निर्घृण हत्या होणे हे अमेरिकेतील वास्तव आहे आणि हीच जगाला मानवाधिकार आणि सभ्यतेचे धडे देणार्या अमेरिकेची काळी बाजू आहे.
ट्रम्प यांच्या मागा आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेल्या चार्ली किर्क यांची हत्या ही केवळ एक सामान्य गुन्हेगारी घटना नव्हती, तर ती अमेरिकेतील वाढत्या राजकीय ध्रुवीकरणाचे आणि द्वेषाचे भयाण रूप आहे. या हत्येनंतर अमेरिकेतील सोशल मीडियावर जी प्रतिक्रिया उमटली, ती विषारी होती. ट्रम्प यांच्या विरोधकांनी विशेषतः सोशल मीडियावर शोक व्यक्त करणे तर सोडा, चक्क आनंद साजरा केला. किर्क यांच्या मृत्यूचा आनंद झाला, अशा प्रकारच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. या विखारी प्रतिक्रियांचा अमेरिकेतील उजव्या आणि ट्रम्प समर्थक गटांनी तीव्र निषेध केला. यातूनच अनेक प्रमुख कंपन्यांनी तत्काळ कारवाई करत अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला. यात एका गुप्तहेर सेवेतील कर्मचार्याचा व नॅस्डेकमध्ये काम करणार्या एका अधिकार्याचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे अमेरिकन समाज किती खोलवर विभागला गेला आहे आणि राजकीय लढाईत सामान्य मानवी जीवन मूल्यांच्या मर्यादा ओलांडून एक हिणकस पातळी गाठली आहे. हे दिसून येते.
नागम्मलैया यांची झालेली हत्याही तेथील वाढत्या सामाजिक अराजकाचे भयाण वास्तव आहे. ते एका हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांच्याच एका सहकार्याने शुल्लक वादातून त्यांच्या कुटुंबीयांच्या समोरच धारदार शस्त्राने त्यांचे शिर धडावेगळे केले. शुल्लक कारणांवरून गाठलेला कू्ररतेचा कळस म्हणजे सलोखा, सहनशीलता आणि मानवी मूल्यांचा टोकाचा र्हास झाल्याचा पुरावाच नाही काय?
यासोबतच अमेरिकेतील ‘गन कल्चर’ हा एक तितकाच गंभीर मुद्दा आहे. देशभरात शेकडो लोक गोळीबाराच्या घटनांमध्ये बळी पडत आहेत. शस्त्रे सहज उपलब्ध होत असल्याने लहानसहान वादही जीवघेणे ठरतात. शाळा, मॉल्स, कामाच्या ठिकाणी होणारे गोळीबार हे अमेरिकेतील सामाजिक अस्थिरतेचे प्रतीक बनले आहेत. अमेरिकन समाजात हिंसक प्रवृत्ती, राजकीय द्वेष आणि सामाजिक अराजक मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वर्षानुवर्षे अमेरिका जगाला मानवी अधिकारांवर प्रवचने देत आहे; पण स्वतःच्याच देशात मानवी जीवनाचा आदर होत नाही, याची कल्पना या महासत्तेला असेल काय?