Amazon Investment | विकासाला बूस्ट!

 Amazon Investment
Amazon Investment | विकासाला बूस्ट!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जगातील एक विशाल देश असलेल्या भारतात क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. साक्षरता प्रसार वाढला असून, उच्च शिक्षितांच्या संख्येतही भर पडत आहे. ज्या देशाची क्रयशक्ती चांगली आणि जेथील कौशल्ये विकसित झालेली असतात, त्या देशाचे भविष्य उज्ज्वलच असते. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रातील अ‍ॅमेझॉन या महाकाय कंपनीने आगामी पाच वर्षांत भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा नुकतीच केली. देशात एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी गुगल 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेच्या म्हणजेच ‘एआय’च्या विकासाला चालना देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी व्यापक पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी ‘एआय’ क्षेत्रात दोन कोटी भारतीयांना कौशल्य विकासाचे धडे ही कंपनी देणार आहे.

सध्या जगभरात मायक्रोसॉफ्टची 70 पेक्षा अधिक विभागीय डेटा सेंटर्स आहेत. या वाटचालीत मायक्रोसॉफ्ट ही कॉग्निजंट, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी करणार आहे. या क्षेत्रातील कंपनीची 17.5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आतापर्यंतची भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. त्यातून ‘एआय’साठी आवश्यक अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील. भारत जगातील सर्वात गतिमान डिजिटल बाजारपेठांपैकी एक आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक सध्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीचे लक्ष राज्याकडे वळणार, हे स्वाभाविकच होते.

आता मायक्रोसॉफ्टसोबत जीसीसी किंवा ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे राज्य सरकारने ठरवले असून, राज्याच्या प्रगतीच्या द़ृष्टीने ही सुवार्ताच! 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले हे केंद्र सुमारे 20 लाख चौरस फुटांवर उभारले जाणार आहे. त्यातून एकूण 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारताकडे लक्ष केंद्रित केले असतानाच महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, अशी विनंती फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी सत्या नाडेला यांना केली होती. ही गुंतवणूक यावी, यासाठी फडणवीस यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय म्हणावे लागतील. त्यासाठी त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट एआय टूर’ कार्यक्रमात सहभागही घेतला. नाडेला यांनी राज्य सरकारसोबत विकसित केलेल्या या विशेष प्लॅटफॉर्मचे खास प्रदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले.

महाराष्ट्राने तयार केलेल्या ‘मार्बल’ प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे तीन-चार महिन्यांऐवजी फक्त 24 तासांत शोधता येऊ लागेल आहेत. गुन्हेगारांचा शोध जलदगतीने घेतला गेल्यामुळे लोकांचे पैसेही वाचत आहेत. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फसवणुकीसह समाजमाध्यमांवरून बदनामी, अकाऊंट हॅक करून पैसे मागणे, सेक्सटॉर्शन आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या काळात सायबर पोलीस ठाण्यात 466 तक्रारी प्राप्त झाल्या. समाजमाध्यमांच्या वापरामुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याचे, तसेच अन्य प्रकारे संबंधित व्यक्तीला त्रास होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याचे काम वाढत चालले आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. गेल्या वर्षभरात डिजिटल अरेस्टसह ‘एपीके’ फाईल डाऊनलोड करून सर्वसामान्यांना फसवण्याच्या, गंडवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय भर पडली.

दसरा-दिवाळीला ऑनलाईन वस्तू खरेदीवर डिस्काऊंटच्या बहाण्यानेही अनेकांना गंडा घालण्यात आला. पूर्वी आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्यासाठी लिंक पाठवण्यात येत होती किंवा महावितरणचे बिल थकले आहे, अशी बतावणी करून फसवणूक करण्यात येत होती. यंदा आरटीओ चलन, वाहतूक पोलिसांचे चलन आले आहे, अशीही कारणे समोर आली. हा ऑनलाईन धोका टाळण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत राज्य सरकारने सायबर क्षेत्राचा सहकार्य करार केला. त्याचा गुन्हे तातडीने शोधण्यासाठी उपयोग होऊ शकेल. जागतिक गुंतवणूक कंपनी ब्रुकफिल्ड प्रॉप्रटीज हीदेखील महाराष्ट्रात जीसीसी सुविधा स्थापन करण्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

हे नवे सेंटर जगातील सर्वात मोठे असेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. ब्रुकफिल्डचे हे केंद्र पवईत होईल. मुंबईत सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या मे महिन्यात कंपनीने पुढील पाच वर्षांत भारतातील तिच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता तिप्पट करून, त्या 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक ‘ब्रुकफिल्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट’ या जगातील नामवंत कंपनीच्या भारतातील वाढत्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे. सामान्यतः जीसीसीमध्ये तंत्रज्ञान, संशोधन, विकास, आयटीसेवा आणि डेटा विश्लेषण यासारखी कामे केली जातात. महाराष्ट्र ही जगातील 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 2028 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची करण्याचा मनोदय महायुती सरकारने व्यक्त केला आहे.

वाहनांची निर्मिती व सुट्या भागांच्या क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या जीडीपीत 13.60 टक्के वाटा आहे. परकीय गुंतवणुकीतही राज्य देशात अग्रस्थानी आहे, तर निर्यातीत गुजरातनंतर क्रमांक लागतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई महानगर प्रदेशाच्या अगदी केंद्रस्थानी असल्याने तो संपूर्ण राज्यासाठी एक मॅग्नेट ठरत आहे. अटल सेतू, सागरी महामार्ग, मेट्रोचा विस्तार, प्रस्तावित बुलेट ट्रेन या विकास प्रकल्पांमुळे महानगर प्राधिकरण क्षेत्राचे आकर्षण वाढत आहे. येत्या पाच वर्षांत 400 जीसीसी उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली असून, यात पुणे शहराला प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. देशात जीसीसी चालवण्याचा खर्च कमी येतो, हे महत्त्वाचे असून, त्यामुळेच गुंतवणूक केली जात आहे. राज्यात उच्चशिक्षितांची संख्या वाढत असून, तरुण-तरुणींना यामुळे चांगला रोजगार मिळण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे प्रगतीच्या योजना प्रभावी ठरण्यात अडचणी येत असताना या प्रकल्पांमुळे उद्योग क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. महाराष्ट्राचा चेहरा खर्‍याअर्थाने बदलण्याच्या या योजना विकासाला चालना देतील, अशी आशा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news