पहिला चहा | अमर, अकबर, अँथनी...

 पहिला चहा | अमर, अकबर, अँथनी...
पहिला चहा | अमर, अकबर, अँथनी...
Published on: 
Updated on: 

जगाच्या राजकारणात सध्या अमर, अकबर आणि अँथनी यांचा नवा शो सुरू आहे. हे अमर-अकबर-अँथनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग. तिघेही आपापल्या देशांचे सुपरस्टार! फरक एवढाच की, हिंदी सिनेमात तिघे मिळून खलनायकांना धडा शिकवतात, इथे हे तिघेच नायक आहेत की खलनायक, हे प्रेक्षकांना (जगाच्या भरातील नागरिकांना) अजून समजत नाही.

तर, या तिघांची दीड तास चर्चा झाली आणि जगाला एक महान संदेश मिळाला. तो म्हणजे - अणुयुद्ध जिंकता येत नाही, त्यामुळे ते लढूच नये!

व्वा! काय शोध लावला आहे! एवढा साधा सिद्धांत समजायला जगाला हजारो अणुबॉम्ब आणि काही दशके लागली. आणि आता या तिघांनी तो सिद्धांत केवळ दीड तासांत शोधून काढला.

विज्ञानाने एवढी प्रगती केलीय की, माणसाला स्वतःच्या विनाशाचा शोध लावण्यासाठीही आता परिषदा घेण्याची गरज पडते.

खरं म्हणजे अण्वस्त्रांच्या शर्यतीत याच तिघांच्या देशांचा सर्वात मोठा वाटा आहे. एकाने अणुबॉम्ब बनवला, दुसऱ्याने त्यापेक्षा मोठा बनवला आणि तिसऱ्याने आपणही मागे नाही, हे दाखवून दिले. आता तिघेही सांगताहेत की, अणुयुद्ध नको. म्हणजे आधी घराला आग लावायची आणि मग अग्निशमन दलाला शांततेचे आवाहन करायचे!

तिघांची शांततेची व्याख्याही भारी आहे. आपण दुसऱ्याला धमकावले तर ती मुत्सद्देगिरी आणि दुसऱ्याने आपल्याला उत्तर दिले तर तो जागतिक शांततेला धोका! आपण शस्त्रसाठा वाढवला तर राष्ट्रीय सुरक्षा आणि दुसऱ्याने वाढवला तर अणुयुद्धाची तयारी!

या तिघांच्या भेटीनंतर जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कारण ज्यांच्या हातात माचिस आहे, त्यांनीच आता जगाला आग लावू नका, असा सल्ला दिला आहे.

आता फक्त एकच प्रार्थना. या तिघांनी पुन्हा भेटावे. पण यावेळी दीड तास चर्चा करण्याऐवजी दीड तास एकमेकांचे ऐकावे. कारण जगाला त्यांची भाषणे नकोत, त्यांचे शहाणपण हवे आहे!

अखेर, जगाचा विनाश करण्याची ताकद असणे ही महासत्ता; पण त्या ताकदीचा वापर न करण्याचे शहाणपण असणे ही खरी महत्ता! नाही का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.