

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे म्हणजेच फेडरल रिझर्व्हचे तब्बल १९ वर्षे नेतृत्व करणारे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन यांचे २२ जून रोजी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ एका अर्थतज्ज्ञाचा अस्त झालेला नाही, तर जागतिक वित्तीय व्यवस्थेला आकार देणाऱ्या एका युगाचाही पडदा पडला आहे.
ग्रीनस्पॅन हे जागतिक अर्थकारणातील असे व्यक्तिमत्त्व होते की, त्यांच्या एका वक्तव्याने शेअर बाजारात उसळी यायची किंवा गुंतवणूकदारांमध्ये धास्ती निर्माण व्हायची. त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेचे सूत्रधार म्हणून ओळखले जाई. १९८७ ते २००६ या कालावधीत त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अनेक संकटांतून वाचवले. त्यांच्या कार्यकाळात महागाई नियंत्रणात राहिली, आर्थिक वाढ कायम राहिली आणि तुलनेने स्थैर्य टिकून राहिले. अर्थशास्त्रात या कालखंडाला ‘ग्रेट मॉडरेशन’ म्हणून संबोधले जाते. ग्रीनस्पॅन यांची काम करण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती. केवळ सांख्यिकीय मॉडेल्सवर अवलंबून न राहता, ते विविध आर्थिक संकेत, बाजारातील मानसशास्त्र आणि स्वतःच्या अनुभवाधारित आकलनाचा वापर करत. त्यांच्या भाषणशैलीलाही एक वेगळीच ओळख होती. जाणीवपूर्वक संदिग्ध आणि गूढ भाषेचा वापर करून बाजाराला आवश्यक ते संकेत देण्याची त्यांची कला इतकी प्रसिद्ध होती की, तिला ‘फेडस्पीक’ असे नाव मिळाले होते. १९९६ मध्ये त्यांनी शेअर बाजारातील अतिउत्साही गुंतवणुकीबाबत ‘इरॅशनल एक्झ्युबरन्स’ अर्थात ‘अविवेकी उत्साह’ असा इशारा दिला होता. हा इशारा आजही वित्तीय इतिहासातील महत्त्वाच्या इशाऱ्यांपैकी एक मानला जातो.
ग्रीनस्पॅन यांच्या कार्यकाळातच भारताने १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाची वाट धरली. ग्रीनस्पॅन यांनी अमेरिकेत कमी व्याज दर आणि पुरेशी जागतिक तरलता उपलब्ध ठेवण्याचे धोरण आखले. त्यामुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे भांडवलाचा ओघ वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेशी अधिकाधिक जोडली जात असताना अमेरिकन वित्तीय व्यवस्थेतील घडामोडींचा प्रभाव भारतावरही पडला. विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह, भांडवली बाजारातील तेजी आणि जागतिक व्यापारातील वाढ, या सर्व घडामोडींना ग्रीनस्पॅन यांच्या धोरणांमुळेच अप्रत्यक्ष हातभार लागला. तथापि, त्यांच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध वादग्रस्त ठरला. बाजार स्वतःचे नियमन करू शकतो, या विश्वासामुळे वित्तीय क्षेत्रातील नियंत्रण सैल करण्यास त्यांनी पाठिंबा दिला. याच धोरणामुळे २००८ मधील जागतिक आर्थिक संकटाची बीजे पेरली गेली, असा आरोप नंतर अनेक अर्थतज्ज्ञांनी केला.
भारतीय धोरणकर्त्यांसाठी हा मोठा धडा ठरला. भारतीय मध्यवर्ती बँकेने नेहमीच सावध आणि नियमनप्रधान भूमिका घेतली. कर्जवाटप, बँकिंग क्षेत्रावरील देखरेख आणि भांडवली नियम, याबाबत भारताने तुलनेने अधिक कठोर धोरणे स्वीकारली. परिणामी, २००८ च्या जागतिक आर्थिक धक्क्याचा भारतीय बँकिंग क्षेत्रावर परिणाम झाला असला, तरी अनेक पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात सिस्टिमिक कोलॅप्स झाले नाही. ॲलन ग्रीनस्पॅन यांचे आयुष्य हे मध्यवर्ती बँकांच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या मर्यादांचेही जिवंत उदाहरण आहे. एकेकाळी आर्थिक समृद्धीचे शिल्पकार म्हणून गौरवले गेलेले ग्रीनस्पॅन यांना पुढे प्रणालीअंतर्गत जोखमींना कारणीभूत ठरल्याची टीका सहन करावी लागली. एका बाजूला जागतिक अर्थकारणाचे सूत्रधार आणि दुसऱ्या बाजूला संकटांना जबाबदार, अशी टीका सहन करावे लागलेले ग्रीनस्पॅन इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहतील.