Ajit Pawar plane crash | धडाडीचा नेता
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर हळहळ व्यक्त होणे साहजिकच आहे. ते कमालीचे लोकप्रिय आणि जनाधार असलेले नेते होते. दिल्ली, मुंबईपासून राज्याच्या गावागावांतील राजकारणाची खडा न् खडा माहिती असणारा, अफाट जनसंपर्क आणि सर्वसामान्य कार्यकर्ता, माणसाशी नाळ असणारा, त्याच्या प्रश्नांची जाण असणारा, नावानिशी कार्यकर्त्यांची नावे माहिती असणारा, त्याच्या सुख-दु:खात सहभागी होणारा, त्याची त्याच कळकळीने चौकशी करणारा असा नेता विरळच. यामुळेच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अवघा महाराष्ट्र हळहळला. असंख्य सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. अनेक जण सुन्न झाले आणि अनेकांना हुंदकेही आवरता आले नाहीत.
राज्याच्या कानाकोपर्यापर्यंत हजारो कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारे नेते अपवादानेच आढळतात. त्यात अजितदादांचे स्थान वरचे होते. त्या अर्थाने ते लोकनेते होते. त्यांच्या राजकारणाचा पाया ग्रामीण होता. पंचायत राजकारणापासून सहकारापर्यंत त्यांनी आपल्या पक्षाचा पाया भक्कम केला. त्यांना पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांची नाडीही तितकीच कळली होती. पवार घराण्याचा वारसा पुढे नेताना एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचे जाणतेपण त्यांच्यात मूलतःच रुजले होते. 1982च्या आसपास त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि सहकारी साखर कारखान्याच्या संचालकापासून राजकारणाच्या प्रत्येक पायरीचा अनुभव त्यांनी घेतला. 1991 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले. या पदावर ते 16 वर्षे होते. माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अशा अनेक संस्थांमध्ये काम करून त्यांनी ग्रामीण परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला. ‘1991 मध्ये राजीव गांधी यांनी मला लोकसभेचे तिकीट दिले’, असा उल्लेख ते आवर्जून करत; परंतु राष्ट्रीय राजकारणात त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर ते विधानसभेवर निवडून आले आणि सत्तेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, अर्थ अशी वेगवेगळी खाती त्यांनी मंत्री म्हणून हाताळली. प्रत्येक खात्यात आपली छाप उमटवली. ग्रामविकासमंत्री म्हणून काम करताना खेड्यापाड्यांतील रस्ते, विहिरी आणि अन्य सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी लक्षणीय भर दिला. ऊर्जामंत्री असताना अपारंपरिक व शाश्वत ऊर्जा विकासाला गती दिली. ते तसे उत्तम शेतकरी. त्यांनी काटेवाडीत स्वतः टोमॅटोची लागवड केली होती. जनावरांची खरेदी करून दुधाचाही व्यवसाय त्यांनी केला. कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा जोडधंदा म्हणून कसा करता येतो, हेही त्यांनी स्वतःच्या प्रयोगातून दाखवून दिले. त्यामुळे कृषी खाते हाताळताना दादांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. एक प्रगतिशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, चेअरमन, उपमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा प्रवास दादांनी टप्प्याटप्प्याने केला आणि प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपली योग्यता आणि गुणवत्ता सिद्ध केली. काका शरद पवार यांचा वारसा असल्यामुळे पहिल्यापासून पहाटे उठून कामाला लागणे, शिस्त, वक्तशीरपणा हे गुण त्यांनी अंगी बाणले. शरद पवार लोकसभेत गेल्यापासून बारामतीची सर्व जबाबदारी अजितदादा सांभाळत होते.
बारामतीतील अनेक संस्थांना त्यांनीच आकार दिला. बारामतीचे विमानतळ, एस.टी. स्टँड, रस्ते, प्रेक्षागृह, मैदाने या सर्व गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. केवळ बारामतीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तालुका अथवा जिल्हाधिकार्यांची कचेरी, पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा बँकेचे कार्यालय, ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असावे, याकडे दादांचे लक्ष असे. स्वतः आर्किटेक्ट वा इंजिनिअर नसूनही सरकारी इमारतींच्या बांधकामाबाबत अत्यंत उत्तम अशा सूचना ते देत असत. सरकारी कार्यालयाच्या आवारात साधा कागदाचा कपटा पडलेला असला, तरीदेखील त्यांना ते चालत नसे, ते स्वतः तो उचलून कचर्याच्या टोपलीत टाकत. महाराष्ट्राच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळताना त्यांनी वित्तीय शिस्तीवर सातत्याने भर दिला. राजकीय गरजेपोटी काहीवेळा शिस्तीला मुरड घालावी लागली, हेदेखील ते मनमोकळेपणे मान्य करत. विविध मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना त्यांच्याशी जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या सर्वांशी त्यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असतानादेखील त्यांनी सत्ताधार्यांबद्दल कधीही अभद्र शब्द काढले नाहीत. महाविकास आघाडी सरकार असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहिले. ते सत्तेत असोत वा विरोधी बाकावर, राज्यातील विरोधक, लोकचळवळी, आंदोलने, युवा आणि महिला, शेतकरी आंदोलने या सार्यांशीच बांधिलकी मानणारा हा नेता होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणुकीच्या प्रचार सभेत शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली; परंतु त्यानंतरच्या काळात चुकीचे परिमार्जन करताना आपल्यामागे काकांची पुण्याई असल्याचेही ते आवर्जून सांगत राहिले. अनेक वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत आपल्या पक्षाची सत्ता आणण्याची कर्तबगारीही त्यांनी दाखवली आणि या दोन्ही शहरांत त्यांनी खूप चांगल्या सुधारणा राबवल्या. पक्षात फूट पडल्यानंतरही पवार कुटुंबातील एकोपा टिकावा, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. महायुतीत असूनदेखील आम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचाच वारसा मानतो, अशी खंबीर भूमिका अजितदादांनी घेतली. ‘एक घाव, दोन तुकडे’ असा त्यांचा स्वभाव होता. काम होणार असेल, तर ‘हो’ आणि होणार नसेल तर थेट ‘नाही’ म्हणण्याची त्यांची शैली होती. आपल्यावर कोणी टीका केली, तरीदेखील लोकशाहीत प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे, असे ते म्हणत असत. कोणतीही टीका आणि टीकाकार याचे कधी मनावर न घेण्याचा मोठेपणा दाखवताना लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी नेहमीच आदर केला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उमदा, धडाडीचा, मनमोकळा आणि दिलदार नेता गमावला आहे.

