

आपल्यासारख्या बस आणि रेल्वेतून प्रवास करणार्या सामान्य लोकांना विमान प्रवासाचे मोठे कुतूहल असते. ते पायलट, त्या हवाई सुंदर्या, ती विमाने, त्यांचे ते आकाशात झेपावणे हे सर्व आपण अनिमीष नेत्रांनी जमिनीवरून पाहत असतो. गेले आठ दिवस झाले असंख्य विमाने रद्द करण्यात आली आणि अक्षरशः लाखोंनी प्रवासी विमानतळांवर ताटकळत बसलेले आपण पाहिले. असे आपल्या आयुष्यात कधीही झाले नव्हते. म्हणजे एखाद्या गावाला जाणार्या सगळ्या बसेस रद्द झाल्या, असे कधी झालेले नाही. अगदीच तशी स्थिती उद्भवली तर वडाप असायचे. आजही कुठेकुठे असते. असा कोणता ना कोणता मार्ग सापडतो आणि एकदाचे आपण मार्गस्थ होतो. भले त्यासाठी आपल्याला दोन किंवा तीन ठिकाणी उतरावे लागेल.
विमान प्रवासाचे वेगळेच असते. बस किंवा रेल्वेसारखी त्यांची तिकिटे फिक्स नसतात. ज्या दिवशी तुम्ही बुकिंग कराल त्या दिवशीचे जे तिकीट असेल तेवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतात. बरे, पैसे मोजल्यानंतर एकदाचे रिझर्व्हेशन होऊन तुम्हाला विशिष्ट सीट किंवा बर्थ रेल्वेसारखी मिळेल अशी शक्यता नसते. त्यासाठी विमानतळावर गेल्यानंतर बोर्डिंग पास काढावा लागतो आणि त्या बोर्डिंग पासवर असेल तो सीट क्रमांक आणि मिळेल तो घ्यावा लागतो. नवरा-बायकोबरोबर प्रवास करत असतील, तर नवरा एका सीटवर आणि त्याच्यापासून अत्यंत दूर अंतरावर दुसर्या जागेमध्ये त्याची बायको बसलेली असते. असाही विमान प्रवास कंटाळवाणा असतो.
एसटी प्रवासात जसे प्रवासी कंडक्टर, ड्रायव्हरसोबत भांडतात तसे हवाई प्रवासी लोक विमान कंपनीशी भांडायला लागले. अर्थात, त्यांचा संताप योग्यच आहे; पण त्यातून बस किंवा रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळाला की, हे लोक आपल्यापेक्षा काही वेगळे नाहीत. जशी रेल्वे अचानक दोन-तीन तास लेट होते किंवा एखादी बस आली नाही, तर आपण पर्याय शोधतो तसा कोणताही पर्याय विमान कंपन्यांच्या प्रवाशांकडे नव्हता. त्यांना रद्द झालेले विमान मान्य करून थेट घराकडे जावे लागते. त्यामुळे गड्या आपली रेल्वे बरी किंवा गड्या आपली बस किंवा लालपरी बरी असे म्हणून सामान्य लोक सुस्कारा टाकत आहेत.
पण, मनात एक विचार येऊन गेला. हवाई वडाप सेवा असती तर... विमानसेवा देणार्या कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली असती... तिकीट दरही कमी झाले असते... सगळ्या प्रवासी लोकांचे हालही कदाचित वाचले असते... दाटीवाटीने प्रवासाची थोडी अडचणही झाली असती; पण तेवढं चालवून घेतलं असतं... लहान मुलांना तिकीट न काढता मांडीवर घेऊन जाता आले असते... झालंच तर वडापची टिपिकल गाणी ऐकत जाता आलं असतं... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्टॉपला विमान थांबत गेले असतं... काय म्हणता?