Ahmedabad Plane Crash |विमान दुर्घटनेची शोकांतिका

या भीषण दुर्घटनेमुळे देश अक्षरश: हादरला
air-india-ahmedabad-london-flight-crash-265-killed
विमान दुर्घटनेची शोकांतिकाPudhari File Photo
Published on
Updated on

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेमुळे देश अक्षरश: हादरला, नि:शब्द झाला. अनपेक्षित घटनेने सारे जगच हळहळले. उड्डाणानंतर केवळ 30 ते 40 सेकंदांमध्ये हे विमान नजीकच्या गजबजलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले. त्यात तेथील होस्टेलमधील 25 डॉक्टर मृत्युमुखी पडले. त्यांना दुपारचा अन्नाचा घासही अर्ध्यावर सोडावा लागला. बोइंग-787 ड्रीमलायनर या वर्गातील हे विमान अतिशय सुरक्षित समजले जाणारे होते. कंपनीच्या बोइंग-737 प्रकारातील अन्य विमानांच्या अलीकडील तीन दुर्घटनांची सध्या चौकशी सुरू असून, ड्रीमलायनर या लौकिकप्राप्त विमानाला झालेला हा पहिलाच भीषण अपघात. या अगोदर 2013 आणि 2024 मध्ये बोइंग विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळले होते. अनेक विमानांच्या लिथियम-आयर्न विद्युत संचांमध्ये बिघाड होत असल्याचे दिसले होते.

जपान एअरलाइन्सच्या बोइंग विमानात धावपट्टीवर उभे असताना, विद्युत संचाला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर युनायटेड एअरलाइन्सचे विमान याच पद्धतीने नादुरुस्त झाले; तर जपानच्या निप्पॉन एअरलाइन्सच्या बोइंग विमानात विद्युत विभागात अचानक धूर येत असल्याचे आढळल्यामुळे ते तत्काळ उतरवण्यात आले होते. जपान आणि निप्पॉन एअरलाइन्सने त्यांच्याकडील बोइंग 787 विमानांची उड्डाणे स्थगित केली; तर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने चौकशीचे आदेश देत, सर्वच बोइंग-787 विमानांची उड्डाणे स्थगित केली. एखाद्या कंपनीच्या विशिष्ट विमानांची सर्वच उड्डाणे स्थगित होण्याची ही तीन दशकांतील पहिलीच घटना. त्यामुळे अहमदाबाद दुर्घटनेनंतर साहजिकच बोइंग कंपनीचे समभाग धडाधड कोसळले. एवढेच नव्हे, तर या विमानाचा सांगाडा बनवणारी स्पिरिट एअरोसिस्टिम्स आणि इंजिन तयार करणारी जी. ई. एअरोस्पेस यांच्या समभागांनी आपटी खाल्ली.

2013 मध्ये अमेरिका आणि युरोपने ड्रीमलायनरचे उड्डाण बंद केले होते. एवढ्या तक्रारी असताना, ‘डीजीसीए’ने ड्रीमलायनरला परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ड्रीमलायनर विमानांचे उड्डाण यापुढे सरकारने बंद करावे, ही आता होत असलेली मागणी चुकीची नाही. अपघातामागे दोन्ही इंजिनांत बिघाड होणे किंवा उड्डाणानंतर लगेचच पक्षी धडकणे, ही काही कारणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय अन्य कारणांचाही तपास यथावकाश होईलच. अहमदाबाद असो वा मुंबई, तेथे पक्षी विमानाला अनेकदा धडकतात. मुंबईत तर विमानतळाचे परिसर असुरक्षित बनले असून विमानतळांच्या आणि विमानांच्या उड्डाणांचा धोका वाढला आहे. यावर वेळीच उपाय योजला पाहिजे. अपघातामागे असलेल्या संभाव्य कारणांची चर्चा सुरू आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञ शक्यतांचा मागोवा घेत आहेत. एका इंजिनातील बिघाडामुळे विमान हेलकावे खाऊ शकते; पण गुरुवारच्या दुर्घटनेत विमान स्थिर होते. याचा अर्थ, दोन्ही इंजिनांमध्ये बिघाड झालेला असू शकतो. इंजिनांची नीट पाहणी झाली नव्हती का, हा प्रश्न येथे उद्भवतो. जाणकारांच्या मते, उड्डाण करताना आवश्यक ताकद न मिळाल्यानेही ते कोसळले असू शकते. उड्डाणानंतर एक इंजिन कदाचित निकामी झाले आणि लँडिंग गिअर खुला राहिल्याने दुसर्‍या इंजिनातून आवश्यक तेवढी ताकद न मिळाल्याने ते कोसळले असावे. शिवाय विमानाचे वजन विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक असल्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. उड्डाण करताना विमानाच्या पंखांच्या फ्लॅप्सची स्थिती ही एक समस्या असू शकते. या घटनेत फ्लॅप्स पंखांशी समांतर होते आणि ते उड्डाणानंतर इतक्या लवकर अशा स्थितीत असणे आश्चर्यकारक होते. लँडिंग गिअर खाली असूनही फ्लॅप्स मागे घेतलेले दिसले. ते विस्तारलेले दिसत नाहीत आणि तेच विमानोड्डाण व्यवस्थितपणे न होण्याचे एक करण असू शकते. तसे घडले असेल तर ती मानवी चूकच ठरेल.

19 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबई-अहमदाबाद फ्लाइट 113 हे इंडियन एअरलाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळापासून 5 किलोमीटर अंतरावर कोसळले होते. त्यात 130 प्रवासी ठार झाले होते. हे विमान खराब हवामानामुळे कोसळले होते, त्यावेळी धुके व अंधूक उजेड होता आणि त्याची कल्पना वैमानिकाला वेळीच दिली गेली नाही, त्यामुळे कित्येकांना जीव गमावावा लागल्याची टीका तेव्हा झाली होती. न्यायालयाने इंडियन एअरलाइन्सच्या हलगर्जीपणावर कडक ताशेरे ओढले होते आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेशही दिला होता. एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट 812 या दुबई-मंगळूर प्रवासी बोइंग विमानास 2010 मध्ये भीषण अपघात झाला होता. त्यात 158 प्रवाशांचा बळी गेला होता. मुख्य वैमानिकाने निष्काळजीपणाने विमान उतरवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे चौकशी समितीने तेव्हा म्हटले होते.

आता अहमदाबाद दुर्घटनेचीही निष्पक्षपातीपणे चौकशी होणार असून, जगभरातील विमान अपघातांबाबत चौकशी करणारी अमेरिकेची संस्था यासंदर्भात भारताला मदत करणार आहे. दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू झाला. एका राजकीय नेत्याच्या आणि सच्चा कार्यकर्त्याच्या जाण्याने या राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे, आंध्रचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी तसेच सीडीएस बिपिन रावत प्रभृतींचे विमान दुर्घटनांत निधन झाले. टाटा समूह आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, रतन टाटा यांची माणुसकीची परंपरा जागी ठेवली आहे. दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अपघातस्थळी भेट दिली आणि संबंधित अधिकार्‍यांना दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करण्याची सूचना दिली. यात देशाने गमावलेला प्रत्येक जीव महत्त्वाचा होता. या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, चूक कोणाची हे स्पष्ट झाले पाहिजेच, काही बेफिकिरी झाली असल्यास, संबंधितांना कठोर शासन झाले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news