

एक डास किती त्रस्त देऊ शकतो, हे सांगायला नकोच. रात्रीच्या शांततेत कानाजवळ आवाज करणारा डास, झोप उडवतो. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचे सावट वाढवतो. डासांचा खात्मा करण्यासाठी बाजारात अनेक उपाय उपलब्ध असले, तरी रोजची डासांची डोकेदुखी ही काय टाळता येत नाही. अशावेळी वाटते क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करणार्या इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ सिस्टीमसारखे डासांचा खात्मा करणारे एखादे उपकरण हवे, जे डासांना चुन-चुन के मारेल.
तुमच्या स्वप्नातील ही कल्पना सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये सत्यात उतरली आहे. ऐकून गंमत वाटेल; पण हे आता शक्य झाले आहे. एक असे भन्नाट गॅजेट तयार झाले आहे, जे तुमच्या अंगणात, खोलीत किंवा कॅम्पिंगच्या ठिकाणी तुमचे डासांपासून संरक्षण करेल. यामध्ये दिलेले सेन्सर्स डास हवेत शोधतात व त्याच्या टप्प्यात येताच यातील लेसर डासांचा खात्मा करून टाकतात.
डासांचा खात्मा करण्यासाठी तयार केलेल्या या डिव्हाईसमध्ये लेसर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. अत्याधुनिक सेन्सर्स, विशेषतः ‘एलआयडीएआर’ (लाईट डिटेक्शन अँड रेंजिग), डासांच्या हालचाली ट्रॅक करतात. डास टप्प्यात आला की, दुसर्या क्षणी उच्चगती गॅल्व्हनोमीटरद्वारे चालवल्या जाणार्या लेसरच्या किरणांनी त्याचा खात्मा केला जातो. हे सर्व अगदी काही मिलिसेकंदांमध्ये घडते. अशा पद्धतीने, हे उपकरण एका सेकंदात सुमारे 30 डास मारू शकते. या डिव्हाईसचे कार्यक्षेत्रही प्रभावी आहे. बेसिक मॉडेल सुमारे 3 मीटरपर्यंत काम करते, तर प्रीमियम मॉडेल जवळपास 6 मीटरचा झोन कव्हर करते.
यामुळे तुम्हाला तुमच्या बागेत, अंगणात, कॅम्पिंग साईटवर किंवा गच्चीवरही डासांपासून संरक्षण मिळेल. त्यातच हे डिव्हाईस अंधारातही कार्यक्षमतेने काम करते, त्यामुळे रात्रीही सुरक्षितता हमखास मिळते. सर्वात विशेष बाब म्हणजे, हे डिव्हाईस केवळ डास ओळखते. कोणत्याही दुसर्या कीटक, पाळीव प्राणी किंवा माणसाला यातून धोका होत नाही. याशिवाय हे उपकरण पोर्टेबल असून, कोणत्याही पॉवर बँकच्या साहाय्याने चालवता येते. मोठ्या पॉवर बँकेसह हे यंत्र 16 तास चालू शकते. हे वॉटरप्रूफ असून, कोणत्याही हवामानात कार्यक्षम आहे. त्याचबरोबर, तुमच्या छतावर किंवा खिडकीजवळ स्थिर ठेवण्यासाठी यामध्ये स्टँड आणि ब्रॅकेट देण्यात आले आहेत. इच्छेनुसार फिरणारे बेस आणि अतिरिक्त पॉवर बँकही याला जोडता येते. तांत्रिक उपकरणांच्या या युगात हे लेसर डिव्हाईस म्हणजे डासांवरील ‘आयर्न डोम’च म्हणावे लागेल. कॉईल, पॅड, अगरबत्तींच्या धुराचेही टेन्शन नाही. सध्या हे गॅजेट केवळ पाश्चात्त्य देशांमध्ये उपलब्ध असून, त्याच्या किमती 50 हजार ते 60 हजार रुपयांच्या घरात आहेत.