AI Weighing Scale | एआय वजन काटा देईल आरोग्याची माहिती!

AI Weighing Scale |
AI Weighing Scale | एआय वजन काटा देईल आरोग्याची माहिती!
Published on
Updated on

आशिष शिंदे

अरे बापरे! माझे वजन तर कमी झालेय; पण शरीरातली ताकद का नाहीशी झालीये? वेगाने वजन नियंत्रित करण्याच्या नादात आजकाल अनेकजण आधुनिक वैद्यकीय उपचार, डाएट किंवा नवनवीन औषधांचा आधार घेत आहेत. मात्र, वजन कमी होत असताना आपण नक्की शरीरातील अतिरिक्त चरबी घटवतोय की, आरोग्यासाठी आवश्यक असणारे स्नायू, हे समजणे कठीण असते. वजनाचा काटा खाली जाताना शरीरातील ऊर्जा टिकून राहावी, यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एका अत्यंत प्रगत आणि स्मार्ट वजन काट्याची एन्ट्री झाली आहे. हे भन्‍नाट वेईंग स्केल केवळ तुमचे एकूण वजनच मोजत नाही, तर शरीराच्या अंतर्गत रचनेचा संपूर्ण एक्स-रे तुमच्यासमोर मांडते. इतकेच नव्हे, तर घरच्या घरी तुम्हाला तुमच्या हृदयाची लय (ईसीजी) योग्य आहे की नाही, हेदेखील सांगते.

स्मार्ट वजन काट्याचे डिझाईन इतर साध्या डिजिटल काट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. याच्या बेसमध्ये चार इलेक्ट्रोडस्‌ आहेतच; पण सोबतच वर खेचता येणारा एक विशेष रिट्रॅक्टेबल हँडल बार दिला आहे, ज्यामध्ये आणखी चार इलेक्ट्रोडस्‌ बसवले आहेत. जेव्हा तुम्ही काट्यावर उभे राहून हे हँडल कंबरेच्या उंचीवर दोन्ही हातांनी पकडता, तेव्हा अवघ्या १० सेकंदांत हा काटा तुमच्या संपूर्ण शरीरातून एक सुरक्षित आणि सूक्ष्म विद्युत प्रवाह सोडतो. या तंत्रज्ञानाला बायोइलेक्ट्रिकल इम्पेडेन्स स्पेक्ट्रोस्कोपी असे म्हणतात. हे यंत्र वेगवेगळ्या १३ फ्रिक्वेन्सीजचा वापर करून शरीराचे ६ वेगवेगळ्या भागांत वर्गीकरण करते आणि स्नायू, चरबी व पाण्याचे प्रमाण अचूक मोजते.

या उपकरणाची सर्वात मोठी तांत्रिक खात्री म्हणजे, याची वैद्यकीय पातळीवरील अचूकता. हॉस्पिटल किंवा मोठ्या क्रीडा केंद्रांमध्ये शरीरातील हाडांची घनता आणि चरबी मोजण्यासाठी डेक्सा स्कॅन नावाचे महागडे एक्स-रे तंत्रज्ञान वापरले जाते. एका प्रसिद्ध स्पोर्टस्‌ क्लिनिकच्या मदतीने या गॅजेटची चाचणी घेण्यात आली असून, हा स्मार्ट काटा स्नायूंच्या बाबतीत ९८ टक्के आणि चरबीच्या बाबतीत चक्क ९९ टक्के अचूक निष्कर्ष देतो, असा दावा करण्यात आला आहे.

सुरक्षा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी या गॅजेटमध्ये एका विशेष फीचरचा समावेश करण्यात आला आहे, तो म्हणजे सिंगल-लीड ईसीजी. वजन मोजता मोजता हा काटा तुमच्या हृदयाचे ठोके आणि लयदेखील तपासतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित काही गुंतागुंत असल्यास त्याची पूर्वकल्पना येऊ शकते. एकाच सेशनमध्ये हे यंत्र शरीराचे तब्बल ४० हून अधिक डेटा पॉईंटस्‌ गोळा करते. या काट्यावर एक छोटा रंगीत डिस्प्ले दिला आहे, ज्यावर तुम्हाला वजनाचे चालू ट्रेंडस्‌ लगेच दिसतात. हा सर्व डेटा ब्लूटूथ आणि वाय-फायद्वारे मोबाईल ॲपशी सिंक होतो. हे ॲप तुम्हाला तुमच्या वजनाचे ध्येय, कॅलरीजचे प्रमाण आणि वजन शाश्वत पद्धतीने कसे कमी करावे, याचे डिजिटल कोचिंगदेखील देते. किमतीचा विचार केला, तर हे हाय-टेक वेईंग स्केल आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २८० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे २५ हजार ते २६ हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news