

आशिष शिंदे
आपल्या क्रिकेटवेड्या देशात आबालवृद्धांपासून प्रत्येकालाच क्रिकेटचे वेड आहे. या खेळात प्रत्येक बॅटस्मनचे आपल्या बॅटवर जीवापाड प्रेम असते. ती बॅट म्हणजे केवळ लाकडाचा तुकडा नसतो, तर त्याच्या मेहनतीचा, स्ट्रोक्सचा आणि स्वप्नांचा साथीदार असतो. काळ बदलत गेला तसे क्रिकेटही बदलले आणि आता सध्याच्या ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये क्रिकेट बॅटही स्मार्ट होऊ लागली आहे. आता तुमच्या आवडत्या क्रिकेट बॅटवर तुम्ही एआयच्या साहाय्याने तयार केलेले छोटेसे स्टीकर चिटकवले की, तुमची बॅट तुम्हाला तुम्ही फ्रंट ड्राईव्ह कसा खेळलात, कट शॉटमध्ये बॅटचा वेग किती होता, बॉल बॅटच्या कुठल्या भागावर लागला, इम्पॅक्ट किती जोरदार होता, हे सांगू लागेल.
हे स्मार्ट सेन्सर स्टीकर दिसायला अगदी साधे असले, तरी त्यामागे असलेले तंत्रज्ञान मात्र अफाट आहे. बॅटवर चिटकवल्यानंतर हे स्टीकर तुमच्या प्रत्येक फटक्याची नोंद ठेवते. हा सगळा डेटा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो. या स्मार्ट स्टीकरची खासियत म्हणजे त्यात कोणताही कॅमेरा नाही, तरीही अचूक विश्लेषण मिळते. बॅटचा वेग, स्विंग अँगल, टाईमिंग, बॅलन्स आणि इम्पॅक्ट झोन यासारखी माहिती हे सेन्सर रिअल टाईममध्ये टिपतात. त्यामुळे खेळाडूला केवळ हा शॉट चांगला खेळला असे वाटत नाही, तर तो नेमका का चांगला खेळला, हेही कळते. आजवर हे विश्लेषण फक्त प्रोफेशनल खेळाडूंना, मोठ्या अॅकॅडमीजमध्ये उपलब्ध होते; पण हेच तंत्रज्ञान सामान्य खेळाडूपर्यंत पोहोचेल.
हे स्मार्ट सेन्सर स्टीकर वापरणेही तितकेच सोपे आणि खेळाडूसाठी सोयीचे आहे. हे स्टीकर क्रिकेट बॅटच्या मागील बाजूला, हँडलच्या जवळ ठराविक जागी चिटकवले जाते. एकदा लावल्यावर ते बॅटचा भागच असल्यासारखे बसते आणि खेळताना कुठलाही अडथळा निर्माण करत नाही. या स्टीकरमध्ये इनबिल्ट रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली असून, ती यूएसबी चार्जिंगद्वारे चार्ज करता येते. साधारणपणे मोबाईल चार्जर किंवा पॉवर बँकला जोडून काही वेळात ते पूर्ण चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर हे स्टीकर अनेक नेट सेशन्स किंवा मॅचेससाठी वापरता येते.
खेळाडूने फक्त मोबाईलमधील संबंधित अॅप ओपन करून ब्लूटूथद्वारे स्टीकर कनेक्ट करायचे. त्यानंतर तुम्ही बॅटने खेळलेला प्रत्येक शॉट, बॅटचा वेग, स्विंग अँगल आणि इम्पॅक्टची माहिती आपोआप अॅपमध्ये रेकॉर्ड होते. खेळ संपल्यानंतर हा सगळा डेटा अॅपवर पाहता येतो आणि त्यावरून आपल्या खेळातील चुका आणि ताकद सहज ओळखता येतात. या स्मार्ट स्टीकरचे आणखी एक आकर्षण म्हणजे त्याचे कस्टमायझेशन. खेळाडू आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे डिझाईन्स निवडू शकतो. परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम म्हणजे हे स्मार्ट क्रिकेट स्टीकर. जिथे एकीकडे बॅटस्मनचा नैसर्गिक खेळ जपला जातो, तिथे दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने खेळ अधिक समजून घेता येतो. अशा स्मार्ट एआय स्टीकर्सच्या किमती आठ ते दहा हजार रुपयांपासून सुरू होतात.