

आशिष शिंदे
सध्याच्या या तंत्रयुगात क्षणागणीक नवनवे गॅजेटस् अवतरत आहेत. ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये आपण स्मार्ट चष्म्याबद्दल वाचलेच आहे; पण हे स्मार्ट चष्मे आता आणखी स्मार्ट होत चालले आहेत. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ मिळाल्याने डोळ्यांवर चष्मा ठेवताच हॉलीवूड चित्रपटातील एखाद्या सुपरहीरोप्रमाणे तुमच्याकडे अद्भुत शक्ती आल्याचा भास हे चष्मे देतील. दिसायला अगदी स्टायलिश आणि स्पोर्टी असणार्या या चष्म्यामधून तुम्ही यूपीआय पेमेंटदेखील करू शकता. याशिवाय यामध्ये देण्यात आलेले इतर अनेक भन्नाट फिचर्स तुम्हाला थक्क करतील.
या स्मार्ट ग्लासेसची मोठी ताकद म्हणजे एआय थेट फ्रेममध्येच बसवले आहे. ‘हे ए आय’ उच्चारताच एआय जागे होते आणि तुमच्या आज्ञा पूर्ण करते. बाहेरील हवामान विचारणे असो, फोटो काढणे असो, गाणे बदलणे असो किंवा एखाद्याला कॉल लावणे असो, ही सर्व कामे केवळ तुमच्या एका आवाजावर पूर्ण होतील. त्यातही सर्वात खास बाब म्हणजे, आता एआय हिंदीत बोलते आणि त्याला हिंदी समजते.
या स्मार्ट चष्म्यांचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे यूपीआयचे इंटिग्रेशन. ‘हे एआय स्कॅन अँड पे’ म्हटले की, हे ग्लासेस क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करतील. फोन काढण्याची गरज नाही, हात मोकळे, डोळ्यांतच पूर्ण पेमेंट सिस्टीम. भारतातील वापरकर्त्यांसाठी हे फिचर नक्कीच गेमचेंजर ठरू शकते. कारण भारतात यूपीआय पेमेंट करणार्यांची संख्या मोठी आहे. आणि ते भारतीयांच्या अगदी सवयीचेही झालेले आहे.
फिटनेसप्रेमींसाठीही हे ग्लासेस एकदम परफेक्ट आहेत. फिटनेसचा लेखाजोखा ठेवणारी अनेक अॅप्स?आणि गॅझेट्स आता अनेकांकडे असतात. पण, हे गॅझेट त्यातही आपले वेगळेपण जपून आहे. तुम्ही धावत असताना, सायकलिंग करताना किंवा वर्कआऊट करताना रिअलटाईम परफॉर्मन्स यातून समजतो. स्पीड, अंतर, कॅलरीज, वेळ हे सर्व अपडेटस् तुम्हाला कानात ऐकू येतात. याचा फायदा वापरणार्याला निश्चित्त्त होतो. वॉटर रेसिस्टन्स असल्यामुळे घाम, पाऊस किंवा धूळ यांची चिंता नाही.
या ग्लासेसमध्ये दिलेला इनबिल्ट कॅमेरा व्हिडीओ शूट करतो. फक्त ‘टेक व्हिडीओ’ म्हणा आणि द़ृश्य तुमच्या नजरेतून थेट कॅप्चर होईल. कंटेंट क्रिएटर्स, ट्रॅव्हलर्स आणि लाईफस्टाईल ब्लॉगर्ससाठी हे फिचर भन्नाट आहे. दिवसभर वापरायला पुरेल अशी 8 तासांची बॅटरी आणि 48 तासांचा अतिरिक्त बॅकअप देणारा चार्जिंग केस असल्यामुळे वापरात खंड पडत नाही. डिझाईनबाबत बोलायचे झाले, तर हे ग्लासेस अगदी प्रीमियम लेव्हलचे आहेत. सहा रंग आणि लेन्स कॉम्बिनेशन्समध्ये उपलब्ध आहेत. नंबरचा चष्मा वापरणार्यांनाही कोणतीच अडचण नाही. अशा या स्मार्ट चष्म्याच्या किमती 40 ते 45 हजार रुपयांपासून सुरू होतात.