

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान सुरुवातीला माणसाचे जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम करण्यासाठी समोर आले होते. मात्र, आता हाच एआय अनेक प्रकारे माणसांसाठी धोकादायक ठरत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेषतः, जनरेटिव्ह एआयच्या उदयानंतर याचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे निर्माण होणार्या मानसिक, सामाजिक आणि नैतिक प्रश्नांनी चिंता वाढवली आहे. त्यामुळे एआयचा वापर जपून करायला हवा.
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात घडलेल्या एका दु:खद घटनेमुळे एआयमुळे उद्भवणारा संभाव्य धोका अधिक गडद झाला आहे. गेल्यावर्षी फेब—ुवारी महिन्यात केवळ 14 वर्षांच्या सेव्हेल सेत्झर नावाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या आईने दावा केला आहे की, एआयआधारित चॅटबॉटशी झालेल्या संवादामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. मेगन गार्सिया या मुलाच्या आईने गुगल आणि कॅरॅक्टर डॉट एआय या एआय कंपनीवर खटला दाखल केला होता. आता अमेरिकेच्या कोर्टाने या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईला मंजुरी दिली आहे. मेगन गार्सियाच्या म्हणण्यानुसार, तिचा मुलगा सतत कॅरॅक्टर डॉट एआय या चॅटबॉटशी संवाद साधत होता. या संवादादरम्यान त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. आईचा आरोप आहे की, चॅटबॉटने त्याला अप्रत्यक्षरीत्या आत्महत्येस प्रवृत्त केले. अमेरिकेत एआयमुळे मानसिक इजा झाल्याप्रकरणी अधिकृतरीत्या आरोप झालेले हे पहिलेवहिले प्रकरण आहे.
कोर्टाने सांगितले की, टेक कंपन्यांनी असा कोणताही पुरावा सादर केला नाही की, अमेरिकन संविधानातील ‘स्वतंत्र अभिव्यक्तीचा अधिकार’ त्यांना या खटल्यातून मुक्त करू शकतो. न्या. अॅनी कॉन्वे यांनी गुगल आणि कॅरॅक्टर डॉट एआय या दोघांनाही जबाबदार ठरवले आहे. कारण, कॅरॅक्टर डॉट एआय हे गुगलच्या लार्ज लँग्वेज मॉडेलवर आधारित आहे आणि या कंपनीचे संस्थापक हे गुगलचेच माजी अभियंते आहेत.
सध्या सोशल मीडियावर एआयच्या मदतीने बनवलेले बनावट फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे चुकीची माहिती पसरवली जाते. काही कंपन्यांनी आता अशा फोटोंवर ‘एआय जनरेटेड’ असा टॅग लावण्यास सुरुवात केली आहे; पण तरीही सामान्य लोकांसाठी अशा बनावट गोष्टी ओळखणे कठीण आहे. एआय टूल्स डेव्हलप करणार्या कंपन्या सांगतात की, एआय निष्पक्ष असतो आणि तो फक्त डेटाआधारे उत्तर देतो; पण अनेकवेळा असे आढळले आहे की, वापरलेला डेटा अपूर्ण किंवा चुकीचा असतो. त्यामुळे मिळणारी माहितीही चुकीची असते. उदाहरणार्थ, गुगलच्या जेमिनी मॉडेलने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे कंपनीला माफी मागावी लागली होती.
एआयच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या काही रोबोटिक यंत्रणांमध्ये बिघाड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मध्यंतरी चीनमध्ये एक एआयआधारित रोबो बिघडल्यानंतर गर्दीवर हल्ला करण्यासाठी पुढे आला होता. याशिवाय, एका एआय रोबोने आत्महत्या केल्याचेही वृत्त समोर आले होते. यावरून एआयमध्ये विनाशक वर्तन तयार होण्याची शक्यता असते. एका सर्व्हेनुसार, एआयमुळे लोक अधिक आळशी बनत चालले आहेत. विशेषतः, बहुतांश लोक एआयवर इतके अवलंबून आहेत की आता स्वतः रिसर्च करायला किंवा विचार करायला कमी वेळ देताहेत. त्यामुळे एआय हा मानवी विचारशक्ती आणि निर्णयक्षमता यावरही विपरीत परिणाम करत आहे. सारांशाने सांगायचे झाल्यास, एआयचे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी आणि उपयुक्त असले, तरी ते नियंत्रित स्वरूपात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत:, लहान मुले, किशोरवयीन मुले आणि मानसिकद़ृष्ट्या संवेदनशील व्यक्ती यांच्यासाठी सुरक्षित एआय डिझाईन करणे ही काळाची गरज आहे.