

आशिष शिंदे
घरात झाडू मारणे, फरशी पुसणे, कपड्यांची घडी घालणे, वस्तू इकडून तिकडे ठेवणे अशी छोटी-मोठी कामे म्हणजे खूप मोठी डोकेदुखी असते. दिवसभर ऑफिसमधील धावपळ, ट्रॅफिक, कामाचा ताण सहन केल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा हीच कामे डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यामुळे अनेकांना याचा प्रचंड कंटाळा येतो. यावरून अनेक घरांमध्ये खटकेही उडतात. स्मार्ट स्पीकर, स्मार्ट लाईटस्, रोबोट व्हॅक्यूम क्लिनर यांसारखी साधने एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरतात; मात्र आता सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये घरकामाची व्याख्याच बदलून टाकणारे तंत्रज्ञान पुढे आले आहे. घरात माणसासारखा चालणारा, बोलणारा आणि काम करणारा एआय ह्युमनॉईड रोबोट प्रत्यक्षात तयार झाला आहे. हा होम रोबोट घरात राहून तुमच्या दैनंदिन कामांना हातभार लावणारा एक एआय सहकारी आहे. यामध्ये दिलेली भन्नाट फिचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील.
या रोबोटची खरी ताकद आहे. त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता. व्हिजन सिस्टीम, मेमरी आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा वापर यामध्ये केला आहे. त्यामुळे तो केवळ आदेश पाळत नाही, तर संदर्भ समजून घेऊन उत्तर देतो. आज घर आवर असे सांगितले, तर तो आधी काय करायचे, कुठून सुरुवात करायची हे ठरवतो. वस्तू ओळखतो, शेल्फ नीट लावतो, कपडे उचलून योग्य ठिकाणी ठेवतो. तो तुमच्या सवयी लक्षात ठेवतो. म्हणजेच तुम्ही कुठे वस्तू ठेवता, काय आवडते, काय नको, हे तो शिकत जातो.
दिसायला माणसासारखा असला, तरी त्याची रचना मुद्दाम मऊ आणि सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सॉफ्ट बॉडी, लवचिक हालचाली आणि हळुवार ग्रिपमुळे तो घरातील काचेच्या वस्तू, फर्निचर किंवा लहान मुलांच्या आसपास काम करताना धोका निर्माण करत नाही. चालताना, वाकताना किंवा वस्तू उचलताना त्याच्या हालचाली अगदी नैसर्गिक वाटतात. साधारण 30 किलो वजनाचा हा रोबोट घरात सहज फिरू शकतो, जिणे टाळतो, अडथळे ओळखतो आणि स्वतःचा मार्ग शोधतो. पूर्णपणे स्वयंचलित असला, तरी काही अवघड कामांसाठी एक्स्पर्ट मोडची सुविधा देखील यात आहे. म्हणजे रोबोटला एखादे नवे किंवा क्लिष्ट काम करायचे असेल, तर माणूस त्याला मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन करतानाच ते काम तो शिकतो. पुढच्या वेळी ते स्वतः करण्यास सक्षम होतो. यामुळे रोबोटची क्षमता हळूहळू वाढत जाते.
बॅटरी आणि चार्जिंगचा विचार केला, तर हा रोबोट स्वतःच चार्जिंग स्टेशनपर्यंत जातो. वापरकर्त्याला काहीच करावे लागत नाही. मोबाईल अॅपमधून किंवा आवाजाद्वारे त्याला सूचना देता येतात. आज संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, असे सांगितले, तर तो घराची तयारी सुरू करू शकतो. साध्या भाषेत सांगायचे, तर हा रोबोट घरातील कामांसाठी तुमचा कायमचा मदतनीस बनतो. अर्थात, ही तंत्रज्ञान क्रांती अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सध्या या रोबोटची किंमत साधारण 20 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 16 ते 17 लाख रुपयांच्या घरात आहे. भविष्यात घरकाम केवळ माणसांचे काम राहणार नाही, याची झलक हा एआय रोबोट देतो.