बँकिंग क्षेत्रात एआय क्रांती

AI revolution in the banking sector
बँकिंग क्षेत्रात एआय क्रांतीPudhari File Photo
Published on
Updated on
महेश यादव, बँकिंग अभ्यासक

‘एआय’ तंत्रज्ञानयुक्त मशिन माणसाला कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करते. याप्रमाणे निर्णय घ्यायचा की नाही या निष्कर्षाप्रत मनुष्य पोहोचतो. एआय आधारित चॅटबॉटचा वापर केल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा मिळत राहील आणि प्रभावीपणे समस्यांचा निपटारा होईल, अशी योजना आता बँकिंगविश्वातही अवतरत आहे.

आर्टिफिशियल इंटिलिजन्सचे (एआय) प्रस्थ हे बँकिंग क्षेत्रासह जगातील सर्वच क्षेत्रात वेगाने वाढत आहे. म्हणूनच व्यावसायिक निर्णय घेण्यात बँका अन्य क्षेत्रांच्या तुलनेत आघाडी घेताना दिसून येतात. आज बँकांत बहुतांश आर्थिक आणि बिगर आर्थिक सेवा एआयच्या मदतीने पूर्ण होत आहेत. यात खात्यातील व्यवहाराची तपासणी, स्टेटमेंट, पासबुक प्रिंटिंग, खाते सुरू करणे, पैसे भरणे आणि काढणे, कर्जाची पात्रता, ताळेबंद, एनपीए खात्याचे विवरण आदींचा समावेश आहे. एआययुक्त मशिन कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे आकलन करते आणि नंतर कोणता उपाय चांगला ठरेल, यासंदर्भात माणसाला सल्ला देते. शेवटी ग्राहक एआयच्या मदतीने समस्या निकाली काढतात. बँकेच्या मते, एआय आधारित चॅटबॉटचा वापर केल्यास ग्राहकांना अधिक परिणामकारक सेवा उपलब्ध करून देता येईल. चॅटबॉटच्या माध्यमातून बँका ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचा वेगाने निपटारा करण्यात सक्षम राहू शकतात. वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस, कर्ज अंडररायटिंग, कस्टमर अनॅलिटिक्स, गैरव्यवहाराचा मागोवा आणि बँकिंग सेवेशी संबंधित अन्य प्रकरणे मार्गी लावण्यात चॅटबॉट महत्त्वाची भूमिका बजावतात. बँकिंग प्रणालीच्या कक्षेत एखादा गैरव्यवहार होत असेल, तर त्याचा शोध लावणे सोपे नसते; परंतु एआययुक्त मशिन बनावट व्यवहारांना सहजपणे पकडू शकते. त्याच्या मदतीने फसवणुकीची प्रक्रिया कधी आणि कोठे सुरू झाली, याचा थांगपत्ता लागू शकतो. शिवाय सुरक्षित व्यवहार प्रदान करण्याचे काम देखील एआय करते.

आजघडीला देशात सुमारे 114 कोटींपेक्षा अधिक नागरिक स्मार्ट फोनचा वापर करत आहेत. स्मार्ट फोनची संख्या वाढल्याने बँकिंग क्षेत्रात एआयचा वापरदेखील वाढला आहे. सध्याचे स्मार्ट फोन एआय फिचरयुक्त आहेत. आजघडीला स्टेट बँकेच्या सर्वच खातेदारांच्या स्मार्ट फोनमध्ये योनो अ‍ॅप इन्स्टॉल आहे. यात पैसे काढणे, पैशाचे व्यवहार, बिल भरणे आदी सुविधा आहेत. भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी एआय पॉवर चॅट असिस्टंट फिचर सुरू केले. याला एसबीआय इंटिलिजन्स असिस्टंट किंवा एसआयए असेही म्हटले जाते. तो ग्राहकांना बँकिग व्यवहारात मदत करेल. शिवाय फसवणूक रोखणे आणि त्याचा शोध घेणे, आकड्यांचे विवरण करणे, कर्जाचे व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीही मदत करतो. ‘एसआयए’मुळे ग्राहक सेवेत सुधारणा झाली आहे. दुसरीकडे बँकांच्या खर्चात घट होत आहे आणि विविध योजना आणि सेवेशी संबंधित समस्यांचेदेखील तातडीने निराकरण होत आहे. बँकाच्या अनेक कामांत रोबोचादेखील वापर होत आहे. बँकेत ग्राहकांचे स्वागत करणे, योग्य काऊंटरवर घेऊन जाणे, ग्राहकांना क्रेडिट कार्ड, गृह कर्ज यासारख्या गोष्टींची माहिती देण्याचे काम रोबो करत आहे. पारंपरिक रूपातून आर्थिक जगात तज्ज्ञांना विशेष महत्त्व राहिलेले आहे. हे तज्ज्ञ गुंतवणूक, बचत आदींसंदर्भात सल्ला देतात; पण या क्षेत्रात स्टार्टअप आणि मोठमोठ्या कंपन्या आल्याने मानवी हस्तक्षेप कमी होत एआययुक्त मशिनचा वापर वाढत आहे. म्हणून एआय मशिन हे एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे काम करत आहेत.

पूर्वी कर्ज देण्याचे काम बँक अधिकारी आणि सहायकाच्या मदतीने केले जात होते. आता या जागी आकड्यांवर आधारित मॉडेल्स आलेले आहेत. यासाठी अल्गोरिदम विकसित केले आहे आणि ते वेळ आणि प्रासंगिकतेच्या आधारावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊ शकतील. यात मानवी भावनांना जागा नसते आणि म्हणून तेथे गैरप्रकार आणि पक्षपात होण्याची शक्यता राहत नाही. यापूर्वी कर्जाचे प्रकरणे मंजूर करताना गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने बँकेकडे येत असत; पण आता एआययुक्त प्रक्रिया अंगीकारली जात असल्याने कर्ज मंजुरी आणि नामंजुरी हे माणसाच्या हातात राहिलेले नाही. साहजिकच तेथे भ्रष्टाचाराला वाव राहत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news